॥ बायोस्कोप ॥ व्हॅल्यू ऍडिशन

0
65
  • प्रा. रमेश सप्रे

संस्कार, चांगल्या सवयी, आरोग्यपूर्ण आहारविहार, निरनिराळे गुण यांचं जणू उच्चाटनच झालं शिकवण्या-शिकण्यातून. म्हणून कथा, कविता, छंद, कृतीवर आधारित हस्तव्यवसाय, प्रत्यक्ष जीवनानुभव अशा माध्यमातून मुलांच्या विकासात मूल्यसंवर्धनाचा विचार सुरू झाला. खरं मूल्यवर्धन ते हेच.

काही शब्द शिक्षणाच्या किंवा संस्कारांच्या संदर्भात जेवढे वापरले जात नाहीत तेवढे व्यापार, बाजार अशा संबंधात वापरले जातात. अलीकडे असा एक शब्दप्रयोग प्रचारात आला तो म्हणजे मूल्यवर्धन – व्हॅल्यू ऍडिशन! खरंतर शिक्षणाच्या अभ्यासक्रमातली प्रत्येक गोष्ट ही विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकास किंवा चारित्र्याची जडणघडण या बाबतीत मूल्य वाढवणारी असली पाहिजे. शिक्षकांचं अध्यापन, विद्यार्थ्यांचं अध्ययन, घरी करण्यासाठी दिलेला स्वाध्याय किंवा गटागटानं एकत्र करावयाचे प्रकल्प (प्रोजेक्ट्‌स) या सार्‍या गोष्टीत मूल्यवर्धनाची गरज नि संधी असते.
पण हल्ली ‘मूल्यवर्धन’ (व्हॅल्यू ऍडिशन) हा शब्द त्याच्याशी संबंधित असलेल्या कराच्या (टॅक्स) संदर्भात वापरण्यात येऊ लागलाय. वॅट (व्हॅल्यू ऍडेड टॅक्स)! आहे किनई गंमत! त्याचबरोबर मूल्यवर्धन म्हणजे शुल्कवर्धन नव्हे. पुस्तकांवर किंवा इतर वस्तूंवर नवीन लेबलं चिकटवून त्यांची किंमत वाढवली जाते. शुल्क म्हणजे अशी किंमत – ज्याला इंग्रजीत म्हणतात – प्राइस! आणि मूल्य म्हणजे व्हॅल्यू.
काही उदाहरणं पाहू या-

  • गीता – बायबल- कुराण यासारख्या ग्रंथांच्या किमती खूप कमी असतात. पण त्यांचा मनाजीवनावर किती प्रभाव पडतो! जीवन बदलण्याचं, जीवनाच्या दर्जात मूल्यवर्धन करण्याचं सामर्थ्य या ग्रंथात असतं.
  • औषधांची किंमत कितीही असली तरी ते देऊन किंवा घेऊन वाचणार्‍या व्यक्तीच्या प्राणांची, जीवनाची किंमत अमूल्य असते. वाचलेली व्यक्ती कोणत्याही क्षेत्रातली असामान्य प्रतिभावंत असेल तर नव्यानं मिळालेल्या जीवनात नवीन कलाकृती निर्माण करू शकते, हे खरं मूल्यवर्धन!
  • शिक्षणक्षेत्रात मूल्यांकन (इव्हॅल्युएशन) नावाची एक सर्वांगीण प्रक्रिया असते. परीक्षेद्वारा (थिअरी अँड प्रॅक्टिकल) विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या तयारीचं मूल्यमापन केलं जातं. पण गुण, कौशल्यं यांचं मोजमाप (मूल्यांकन) संख्या किंवा सरासरी किंवा पर्सेंटेज, रँक्स, ग्रेड्‌स यात करणं शक्य नसतं. म्हणून खर्‍या अर्थानं मुलाचं मूल्य (व्हॅल्यू ऑफ द चाइल्ड) कळत नाही. मग मूल्यवर्धनही अवघडच. म्हणून आजचं शिक्षण हे संख्यात्मक बनलंय. गुणात्मक – मूल्यात्मक राहिलेलं नाही.
  • डॉ. अब्दुल कलाम यांनी मूल्यवर्धनाचं अप्रतिम उदाहरण दिलंय- कचर्‍याचं केवळ व्यवस्थापन नव्हे तर मूल्यवर्धन. ओल्या कचर्‍याचं बागेतल्या जमीनीत उत्कृष्ट खत होतं तर कोरड्या कचर्‍यातल्या प्लॅस्टिकचे तुकडे रस्त्यांचं डांबरीकरण किंवा हॉटमिक्स करताना वापरता येतात. बाकीच्या कागद, कापडाचे तुकडे अशा कचर्‍यांचे बारीक तुकडे करून, त्यांचं खत करून उद्यानं फुलवता येतात. कचर्‍यासारख्या टाकाऊ वस्तूंमध्ये कितीतरी मूल्यवर्धन, जसं गांधीजींनी मैल्याचं सोनखत बनवलं.
  • गुरू नानकांच्या चरित्रात एक मार्मिक प्रसंग आहे. नानक उन्मनी अवस्थेत मुक्तपणे फिरत. एकदा ते मूळ स्थान या पवित्र क्षेत्राच्या जवळ येऊन पोचले. मूळस्थान ही भक्त प्रल्हाद नि नृसिंह यांच्या भक्तिप्रसंगानं पवित्र झालेली भूमी. तिथं सर्व संप्रदायांचे महंत मठपती होते. त्या सर्वांचा एक प्रमुख महंत होता. त्याच्या शिष्यानं त्याला नानक मूळस्थानजवळ पोचलेयत असं कळवलं. नानक आल्यावर आपलं महत्त्व कमी होणार याची त्याला जाणीव झाली. पण नानकांना येऊ नका म्हणून कसं सांगायचं? म्हणून त्यानं एक सांकेतिक निरोप नानकांना पाठवला. त्यानं एक पेला दुधानं काठोकाठ भरला आणि त्या शिष्याद्वारे नानकांकडे पाठवला. ‘हा आमच्या सद्गुरूंनी आपल्यासाठी निरोप पाठवलाय. त्याचं उत्तर त्यांना हवंय.’ असं त्या शिष्यानं म्हटल्यावर नानकांनी त्याला थांबवलं. तो काठोकाठ भरलेला पेला घेतला. त्यात साखर टाकून ती अलगद विरघळवली. नंतर वेलची नि थोडं केशर घातलं. तो पेला त्या शिष्याकडे देताना एक टवटवीत गुलाबाचं फूल द्यायला गुरूनानक विसरले नाहीत. ‘हे माझं तुझ्या गुरूंच्या निरोपाला दिलेलं उत्तर म्हणून त्यांना दे.’ ते पाहून त्या महंताला गुरूनानकांच्या म्हणण्याचा अर्थ कळला. जरी आधीच मूळस्थान गुरु-सद्गुरूंनी भरून गेलंय, तरीही निराळ्या कल्पक रीतीनं उपदेश करायला अजून बराच वाव आहे हे गुरूनानकांना सुचवायचं होतं. हेही मूल्यवर्धनाचं उत्तम उदाहरण आहे. दूध तेच पण साखर- केशर- वेलची- गुलाबपुष्प हे मूल्यवर्धन मोलाचं आहे.
  • दोन मित्र असतात. एकानं आपल्या व्यक्तिमत्त्वात योग्य आहार- विहार- व्यायाम यांच्या द्वारा खूप मूल्यवर्धन, विकास केला होता तर दुसर्‍यानं व्यसनं, नको त्या खाण्यापिण्याचा अतिरेक अशा गोष्टींनी स्वतःच्या जीवनाची नासाडी केली.
  • मूल्यशिक्षणावर योग्य भर देण्याचा आग्रह शिक्षकांना केला जातो. तो योग्यही आहे. मुलांचं मूल्यवर्धन मूल्यशिक्षणातून किंवा संस्कार घडवण्यातून साधता येतं. पूर्वी संस्कार हेच शिक्षण आणि शिक्षण हाच संस्कार होता. पण त्यांची फारकत होऊन फक्त अभ्यासक्रम आणि परीक्षा यावरच भर दिला जाऊ लागला. संस्कार, चांगल्या सवयी, आरोग्यपूर्ण आहारविहार, निरनिराळे गुण यांचं जणू उच्चाटनच झालं शिकवण्या-शिकण्यातून. म्हणून कथा, कविता, छंद, कृतीवर आधारित हस्तव्यवसाय, प्रत्यक्ष जीवनानुभव अशा माध्यमातून मुलांच्या विकासात मूल्यसंवर्धनाचा विचार सुरू झाला. खरं मूल्यवर्धन ते हेच.
    सध्या आपद्धर्म म्हणून ऑनलाइन शिक्षणाचा सर्व पातळ्यांवर प्रयोग केला जातोय. यात माहितीचं ज्ञान होत नाही. मुलं आणि शिक्षक यांच्यात चैतन्यपूर्ण संबंध निर्माण होत नाहीयेत. असलेले अस्तंगत होऊ लागलेयत याचा मुख्य परिणाम म्हणजे मुलांची व्यक्तिमत्त्व नि चारित्र्य (पर्सनॅलिटी अँड कॅरेक्टर) यांचं मूल्यवर्धन होण्याऐवजी मूल्यघसरण होत चाललीय.
  • या प्रवाहाची दिशा बदलली पाहिजे. लवकरात लवकर! *