लुईझिन फालेरोंचा कॉंग्रेसला रामराम

0
34

>> आमदारकीसह कॉंग्रेस प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा

ज्येष्ठ कॉंग्रेस नेते, गोव्याचे माजी मुख्यमंत्री तथा नावेलीचे विद्यमान आमदार लुईझिन फालेरो यांनी आमदारकीचा, तसेच कॉंग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा काल राजीनामा दिला. सायंकाळी त्यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. आपण कॉंग्रेस पक्षाच्या विचारधारेशी बांधील असून, अनेक पक्षांत विभागल्या गेलेल्या कॉंग्रेसला एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे फालेरो यांनी यावेळी सांगितले.

लुईझिन फालेरो हे ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे वृत्त रविवारी पसरले होते. त्या पार्श्‍वभूमीवर सोमवारी दुपारी १२.३० च्या दरम्यान फालेरो यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा सभापती राजेश पाटणेकर यांच्याकडे सुपूर्द केला; मात्र जशी अपेक्षा केली जात होती, तसा काल त्यांचा अधिकृतपणे तृणमूल कॉंग्रेस पक्षात प्रवेश झाला नाही.

फोलेरो यांनी सायंकाळी ४.३० वाजता मिरामार येथे पत्रकार परिषद घेतली. आपण आमदारकीचा तसेच कॉंग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला असल्याचे फालेरो यांनी स्पष्ट केले; पण त्याचबरोबर आपण कॉंग्रेससोबतच असल्याचे सांगत त्यांनी सर्वांनाच बुचकळ्यात टाकले. आगामी विधानसभा निवडणूक लढवावी की नाही, याचा आपण अद्याप विचार केलेला नाही; मात्र समाजामध्ये दुही माजवणार्‍या भाजप सरकारचा पराभव करण्याची आवश्यकता असून, त्यासाठी उभारल्या जाणार्‍या आंदोलनाचे नेतृत्व आपण करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

पक्ष सोडलेला नाही
आपण कॉंग्रेस पक्ष सोडला असल्याचा इन्कार करताना ते म्हणाले की, ममता बॅनर्जी यांचा तृणमूल कॉंग्रेस, शरद पवार यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस व वायएसआर जगन मोहन रेड्डी यांचा वायएसआर कॉंग्रेस हे तीन मूळ कॉंग्रेस पक्षातून फुटून बाहेर पडलेल्या नेत्यांनी तयार केलेले पक्ष आहेत. त्यामुळे या दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन कॉंग्रेस पक्षाचे हात बळकट करण्याची गरज आहे.

दिग्विजय सिंहांवर आरोप
२०१७ साली गोव्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर कॉंग्रेस पक्षाकडे बहुमत असतानाही पक्षाचे तत्कालीन गोवा प्रभारी दिग्विजय सिंह यांनी राज्यात सरकार स्थापनेसाठीचे पत्र राज्यपालांना देऊ दिले नाही, असा आरोपही यावेळी लुईझीन फालेरो यांनी केला. गेल्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाला १७ जागा मिळाल्या होत्या. त्याशिवाय निकाल जाहीर झाल्यानंतर अन्य काही आमदारांनीही आम्हाला पाठिंबा दर्शविला होता. त्यामुळे पक्षाकडे २१ आमदारांचे संख्याबळ होते; मात्र, पक्षाकडे बहुमत असतानाही दिग्विजय सिंह यांनी आपणाला सरकार स्थापनेसाठीचे पत्र राज्यपालांना सादर करू दिले नाही. दिग्विजय सिंह यांनी २४ आमदारांचा पाठिंबा मिळेपर्यंत थांबा, अशी सूचना केल्याने आपणला थांबावे लागले. पक्षाच्या दिल्लीतील नेत्यांनी व पक्षाच्या कायदा विभागाने सरकार स्थापनेसाठीचे पत्र राज्यपालांना सादर करण्यासाठीची सूचना करून देखील त्यांनी खोडा घातला, असे फालेरो म्हणाले.

कॉंग्रेसच्या अपयशामुळे दु:खी
कॉंग्रेसला कौल दिलेला असताना पक्षाला राज्यात सरकार स्थापन करण्यात अपयश आल्याने राज्यातील जनतेची घोर निराशा झाली होती. पक्षाच्या त्या अपयशामुळे आपणही दुःखी झालो होतो. सरकार स्थापनेसाठीचे पत्र राज्यपालांना देण्याचा आपण निर्णय घेतला होता; पण दिग्विजय सिंह यांनी आपणास सरकार स्थापनेसाठीचे पत्र राज्यपालांना देण्याबाबत रोखले आणि त्यामुळेच सरकार स्थापनेची संधी निसटली, असेही फालेरो यांनी सांगितले.

…तेव्हा उरले केवळ १३ आमदार
दुसर्‍या दिवशी आपली कॉंग्रेस विधीमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली आणि आपणाला सरकार स्थापनेसाठीचा दावा करण्याची सूचना करण्यात आली; मात्र तेव्हा आपणाला केवळ १३ आमदारांचाच पाठिंबा असल्याचे दिसून आल्याने आपण सरकार स्थापनेसाठीचा दावा करण्यास नकार दिला. त्यामुळे पक्षाचे सरचिटणीस व अन्य नेत्यांनी आपणाला कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षपदावरून हटवण्याचा प्रयत्न केला. २४ तासांत कॉंग्रेस पक्ष राज्यात सरकार स्थापन करील, असे या लोकांनी आपणाला सांगितले होते; मात्र या नेत्यांनीच आपल्या पाठीत खंजीर खुपसल्याने नंतर आपण प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे फालेरो म्हणाले.

लवू मामलेदार यांचा आज तृणमूलमध्ये प्रवेश
मगो पक्षाचे माजी आमदार लवू मामलेदार हे आज तृणमूल कॉंग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. कोलकाता येथे आयोजित एका विशेष कार्यक्रमात ते रितसर ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल पक्षात प्रवेश करतील.
तीन पदाधिकार्‍यांचाही राजीनामे
लुईझिन फालेरो यांच्यासह प्रदेश कॉंग्रेस समितीचे सरचिटणीस यतीश नाईक, सरचिटणीस विजय पै आणि सचिव मारियो पिंटो यांनी कॉंग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

तृणमूल कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवारीवर तुम्ही निवडणूक लढवणार आहात का, असा प्रश्‍न पत्रकारांनी लुईझिन फालेरो यांना विचारला असता, निवडणूक लढवावी की नाही, याबाबत आपण अद्याप कोणताही विचार केलेला नाही. तृणमूल कॉंग्रेसमध्ये कधी प्रवेश करणार, हे सांगण्यास देखील त्यांनी नकार दिला.

पत्रातून कॉंग्रेस नेत्यांवर गंभीर आरोप
लुईझिन फालेरो यांनी काल आमदारकीचा व कॉंग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रातून स्थानिक कॉंग्रेस नेत्यांवर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. गोव्यात कॉंग्रेस पक्षात स्वार्थी नेत्यांचा गोतावळा असून, त्यांना पक्षापेक्षा स्वतःचीच जास्त चिंता आहे. तसेच कॉंग्रेसला गोव्यात एक प्रभावी विरोधी पक्ष म्हणून काम करण्यास पूर्ण अपयश आल्याचेही फालेरो यांनी पत्रात म्हटले आहे.

कॉंग्रेस पक्ष बुडते जहाज : मुख्यमंत्री
कॉंग्रेस पक्ष हे एक बुडते जहाज बनले आहे आणि बुडत्या जहाजात कुणाला राहायचे नसते. त्यामुळेच कॉंग्रेसमधील अनेक नेते पक्षाचा त्याग करू लागले असल्याची प्रतिक्रिया काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

गरजेच्या वेळीच फालेरोंनी
पक्ष सोडला : चोडणकर

लुईझिन फालेरो यांची कॉंग्रेस पक्षाला जेव्हा सर्वांत जास्त गरज होती, तेव्हाच त्यांनी पक्षाचा त्याग केल्याची खंत काल कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी व्यक्त केली. त्यांनी घेतलेल्या या निर्णयाबद्दल गोव्याची जनता त्यांना कधीही माफ करणार नसल्याचेही ते म्हणाले.
पणजीत काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कॉंग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडूराव देखील उपस्थित होते.

फालेरो यांनी पक्षातील सर्व उच्च पदे उपभोगली. फालेरो यांना राजकीय संन्यास घ्यायचा होता, तर त्यासंबंधीची तयारी त्यांनी निवडणुकीच्या बर्‍याच आधी अथवा निवडणुकीनंतर करायला हवी होती; मात्र निवडणूक तोंडावर आलेली असताना त्यांनी असा निर्णय घ्यायला नको होता, असेही चोडणकर म्हणाले.

ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेस पक्षाने गोवा विधानसभा निवडणूक रिंगणात उतरण्याचा जो निर्णय घेतला आहे, त्याबद्दल दिनेश गुंडूराव यांनी नाराजी व्यक्त केली. प्रत्येक पक्ष हा तळागाळातून उभारावा लागतो. कॉंग्रेसकडे प्रत्येक मतदारसंघातून लढण्यासाठी पक्षाकडे पर्यायी उमेदवार उपलब्ध आहे. मात्र जे कोण पक्ष सोडून जात आहेत, ते स्वार्थासाठी जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.