Home Featured होम क्वारंटाइन रुग्णांसाठी ऍप सेवा

होम क्वारंटाइन रुग्णांसाठी ऍप सेवा

0

राज्यातील होम आयसोलेशनमधील कोरोना रुग्णांना योग्य उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी उद्या शनिवारपासून नवीन आरोग्य संपर्क सेवा कार्यान्वित केली जाणार आहे. अशी माहिती आरोग्य सचिव रवी धवन यांनी काल पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

पाच प्रश्‍नांतून आढावा
या नवीन सेवेअंतर्गत होम आयसोलेशनमधील रुग्णांशी मोबाईलच्या माध्यमातून संपर्क साधला जाणार आहे. त्यांना पाच प्रश्‍न विचारून त्यांच्या आरोग्य स्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. या संभाषणातून मिळणार्‍या माहितीच्या आधारे होम आयसोलेशनमधील रूग्णाला तातडीच्या वैद्यकीय सेवेची गरज भासल्यास त्याला त्वरित उपलब्ध करून दिली जाणार आहे, असे आरोग्य सचिव धवन यांनी सांगितले.
होम आयसोलेशनमधील रुग्णांना संपर्क साधण्यासाठी खास एजन्सीची निवड करण्यात आली आहे. सदर एजन्सी ११ राज्यांत होम आयसोलेशन रुग्णांना अशा प्रकारची सेवा देत आहे. राज्यात साडेअठरा हजार रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. मागील काही दिवसांत होम आयसोलेशनमधील रुग्ण उशिराने इस्पितळात येत असल्याचे आढळून आले आहे. होम आयसोलेशनमधील रुग्णांना योग्य वैद्यकीय उपचार मिळवून देण्यासाठी नवीन सेवा कार्यान्वित केली जाणार आहे. या कामासाठी नियुक्त केलेल्या एजन्सीकडून होम आयसोलेशनमधील रुग्णांशी संपर्क साधून त्यांना पाच प्रश्‍न विचारले जाणार आहेत. या प्रश्‍नांची उत्तरे होय किंवा नाही, अशा वाक्यात द्यायची आहेत. या एजन्सीकडून होम आयसोलेशनमधील कोरोना रुग्णाशी २ ते १० व्या दिवसांपर्यंत संपर्क केला जाणार आहे. इंग्रजी, हिंदी आणि कोकणी या तीन भाषेतून प्रश्‍न विचारले जाणार आहेत. होम आयसोलेशनमधील रुग्णांना आपला अचूक मोबाईल क्रमांक द्यावा, असे सचिव धवन यांनी सांगितले.

म्युकर मायकोसीसचा
गोमेकॉत नवा रुग्ण नाही
गोमेकॉमध्ये म्युकर मायकोसीसचा (ब्लॅक फंगस) नवीन रूग्ण आढळून आलेला नाही. राज्यातील खासगी इस्पितळातील म्युकर मायकोसीस रुग्णांबाबत आकडेवारी उपलब्ध नाही. एका खासगी इस्पितळाने औषध पाठविण्याची विनंती केली होती. गोमेकॉमध्ये ६ रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला असून पाच रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ब्लॅक फंगस रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक औषध उपलब्ध आहे, असे डीन डॉ. बांदेकर यांनी सांगितले. बांबोळी येथे गोमेकॉमध्ये उपचारांसाठी प्रवेश घेणार्‍या कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. गोमेकॉमध्ये उपचारासाठी प्रवेश घेणार्‍या रुग्णांची संख्या अर्ध्यावर आली आहे. चोवीस तासांत नव्या ६८ रुग्णांना दाखल करून घेण्यात आले आहेत, अशी माहिती डीन डॉ. एस. एम. बांदेकर यांनी पत्रकार परिषदेत काल दिली.

नवीन रुग्णसंख्येत घट
गोमेकॉमध्ये यापूर्वी एकाच दिवशी जास्तीत जास्त १३५ रुग्णांना दाखल करून घेण्यात आलेले आहेत. सुपर स्पेशालिटी ब्लॉकमधील सुमारे ३० खाटा रिक्त आहेत. गोमेकॉमध्ये एकूण ७६८ रुग्ण उपचार घेत आहेत. नवीन रुग्णांच्या संख्येत घट झाल्याने आता एकाही रुग्णाला स्ट्रेचर किंवा जमिनीवर झोपवावे लागत नाही. कोरोनाच्या दुसरी लाटेतील रुग्णांची संख्या कमी होत असली तरी अजून दुसरी लाट संपलेली नाही. आणखी काही दिवस वाट पाहण्याची गरज आहे, असे डॉ. बांदेकर यांनी सांगितल

खासगी इस्पितळांतील खाटांच्या
माहितीसाठी हेल्पलाईन
राज्य सरकारने खासगी इस्पितळातील खाटांच्या माहितीसाठी हेल्पलाईन क्रमांक ०८३२ – २४९४५४५ सुरू केला आहे. खासगी इस्पितळात कोरोनासाठी उपचार घेणार्‍यांनी वरील हेल्पलाईऩवर संपर्क साधावा. खासगी इस्पितळाशी थेट संपर्क साधल्यास वेगवेगळी उत्तरे मिळण्याची शक्यता आहे, अशी माहिती नोडल अधिकारी निखिल देसाई यांनी दिली.