हॉटेल उद्योगातील करिअर्स…

0
289

नागेश एस. सरदेसाई

हॉटेल्समध्ये तसेच इतर सेवा क्षेत्रांत मार्केटिंग आणि सेल्स एक्झिक्युटिव्हज् म्हणून काम करणे हा दुसरा पर्याय आहे. जर कुणामध्ये शिकवण्याची उत्तम कला असेल तर त्याला इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटमध्ये किंवा फूड क्राफ्ट इन्स्टिट्यूटमधील शाखेत शिकवण्याची संधी मिळू शकते. ‘स्किल इंडिया’ कार्यक्रमाद्वारे कुणीही व्यवसाय करून स्वयं-रोजगाराची संधी मिळवू शकतो.

अनेक दशकांपासून पर्यटनाच्या क्षेत्रात सतत वाढ होताना जाणवते आहे आणि जगातील सर्वात गतीने वाढणारे आर्थिक क्षेत्र म्हणून वर येण्यासाठी मोठे बदलही घडताना दिसताहेत. पर्यटन हा जोमाने वाढणारा जागतिक व्यवसाय बनलेला असून त्यात विकसनशील देशांना आकार देण्याची शक्ती आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत ही चौथी सर्वांत मोठी इंडस्ट्री म्हणून नावारुपाला येत आहे. हॉटेल इंडस्ट्री आणि हॉटेल व्यवस्थापन (मॅनेजमेंट) हे एक गतीने वाढणारे करिअर आहे ज्यात असंख्य कामाच्या संधी आहेत. हे एक गतिमान आणि भरभराटीचे कार्यक्षेत्र असून त्यात जागतिक पातळीवर तुमची निर्मिती क्षमता, कल्पनाशक्ती आणि आवड दाखवण्याची संधी आहे. २०१५ साली ७,७५७ दशलक्ष पर्यटक भारतात येऊन गेले, ज्यामुळे भारत एक सर्वांचं आवडतं पर्यटनस्थळ असल्याचं सिद्ध झालं आहे. पर्यटनात मोठी वाढ झाल्यामुळे या क्षेत्राशी थेट तसेच अपरोक्ष संबंध असलेल्या क्षेत्रांमध्येही नोकरीच्या अनेक संधी निर्माण झालेल्या आहेत.

हॉटेल व्यवस्थापन हा सर्वांत जास्त संधी देणारा करिअरचा पर्याय असून आपल्या देशातील भरभराटीला येणार्‍या पर्यटन व्यवसायामुळे त्याने मागील काही दशकांपासून बरीच लोकप्रियता मिळवलेली आहे. आज केवळ पर्यटनासाठीच हॉटेल्स उपयोगात आणली जात नाहीत तर सेमिनार आणि परिषदा, व्यवसायासंबंधी मिटींग्ज आणि मुलाखती घेण्यासाठीही हॉटेल्सचा वापर आज सर्रास केला जातो. हॉटेल मॅनेजमेंटसाठी विविध कोर्सेस आहेत त्यांपैकी काही डिप्लोमा व सर्टिफिकेट प्रकारचे आहेत तर काही डिग्री कोर्सेस आहेत. उच्चपदवी कोर्सेस जसे मास्टर्स ऑफ बिझिनेस ऍडमिनिस्ट्रेशन, मास्टर ऑफ सायन्स इन हॉटेल मॅनेजमेंट, मास्टर ऑफ सायन्स इन हॉस्पिटॅलिटी ऍडमिनिस्ट्रेशन इथे उपलब्ध आहेत.
भारत सरकारच्या ‘‘इन्क्रेडिबल इंडिया’’मुळे पर्यटन क्षेत्राची प्रतिमा बदलण्यास निश्‍चितपणे हातभार लागणार असून त्यामुळे निरोगी पर्यटनाचे काय फायदे असतात ते स्थानिकांना कळेल. तीन वर्षाच्या बी.एससी. इन हॉस्पिटॅलिटी व हॉटेल व्यवस्थापन पदवी कोर्सेसमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी द नॅशनल कौन्सिल ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेक्नॉलॉजी (एन्‌सीएच्‌एम्‌सीटी) ही पर्यटन मंत्रालय, भारत सरकारची संस्था आणि इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी, भारत सरकारचे लोक विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रवेश परीक्षा घेतली जाते व त्याद्वारे भारतातील सर्वोत्कृष्ट हॉटेल मॅनेजमेंट शिक्षणसंस्थांच्या (ज्यामध्ये एकूण ५४ संस्था आहेत) मोठ्या साखळीतील भारतातील कुठल्याही संस्थेमध्ये शिकण्याची संधी मिळते. हा पूर्ण वेळाचा नोकरी मिळवून देणारा कोर्स असून यातील ९०% विद्यार्थ्यांची कँपस निवड होऊन त्यांना भारतातच नव्हे तर भारताबाहेरही नोकरी मिळते. कुठल्याही प्रवाहामधील १०+२ – बारावी उत्तीर्ण विद्यार्थी परीक्षेला बसण्यास पात्र ठरतात. बारावीमध्ये इंग्रजी विषय असणे गरजेचे आहे. जनरल, ओ.बी.सी आणि पी.एच. श्रेणीतील विद्यार्थ्यांचे वय त्या त्या वर्षीच्या १ जुलै रोजी २२ वर्षे तर एस.सी. आणि एस.टी. श्रेणीतील विद्यार्थ्याचे २५ वर्षे वय असणे आवश्यक आहे. यामध्ये १५% एस.सी.; साडे-सात टक्के एस.टी. आणि २७% ओ.बी.सी.(केंद्रीय यादी) यांनुसार केंद्रीय संस्थांमध्ये आरक्षण आहे. शारीरिक अपंगत्व (विकलांग) असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ३% जागा बोर्डाच्या कायद्यानुसार आरक्षित केल्या आहेत. प्रवेश अर्ज (अप्लिकेशन फॉर्म)आणि माहिती पुस्तिका डिसेंबरमध्ये एनसीएचएमसीटीच्या कार्यालयात – नोएडा (उत्तर प्रदेश) येथे आणि देशभरातील हॉटेल मॅनेजमेंटच्या संलग्न संस्थांमध्ये विकत मिळतात.
गोव्यातील बार्देश तालुक्यातील पर्वरी येथे इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज असून तेथे ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने उमेदवार अर्ज करू शकतात. संयुक्त प्रवेश परीक्षा (जॉइंट एंट्रन्स एक्झाम) ही सर्वसाधारणपणे एप्रिल महिन्याच्या शेवटच्या शनिवारी किंवा इंस्टिट्यूटने जाहीर केलेल्या दिवशी घेतली जाते. शुल्काबद्दल अधिक माहितीसाठी ुुु.पलहा.पळल.ळप या पत्त्यावर लॉग ऑन करा. तसेच सकाळी ९.०० ते सायंकाळी ५.३० या वेळेत टोल फ्री क्र- १८०० १८० ३१५१ वर संपर्क करा.
हॉस्पिटॅलिटीमध्ये पदवी घेणार्‍यांसाठी करिअरच्या संधी विपुल आहेत. त्यांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्टार हॉटेल्स, रेस्टॉरेन्ट्‌स आणि फास्ट फूड सेंटर्समध्ये नोकरी मिळू शकते. विमानामध्ये यांना विमानातील किचनमध्ये तसेच विमानतळावर सेवा करण्याची संधी मिळू शकते. हॉटेल्समध्ये तसेच इतर सेवा क्षेत्रांत मार्केटिंग आणि सेल्स एक्झिक्युटिव्हज् म्हणून काम करणे हा दुसरा पर्याय आहे. जर कुणामध्ये शिकवण्याची उत्तम कला असेल तर त्याला इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटमध्ये किंवा फूड क्राफ्ट इन्स्टिट्यूटमधील शाखेत शिकवण्याची संधी मिळू शकते.
‘स्किल इंडिया’ कार्यक्रमाद्वारे कुणीही व्यवसाय करून स्वयं-रोजगाराची संधी मिळवू शकतो. शिपिंग आणि क्रूझवरसुद्धा यांना नोकरी मिळते. डिफेन्स फोर्सेसमध्ये जाण्याची ज्यांची तयारी आहे ते इंडियन आर्मड् फोर्सेसमध्ये जाऊ शकतात. इंडियन रेल्वे हे सार्वजनिक क्षेत्रामध्ये सर्वांत मोठे नोकरी देणारे भारतातील क्षेत्र आहे. तिथे रेल्वेज हॉस्पिटॅलिटी आणि कॅटरींग सेवा क्षेत्र आहे जे फायदेशीर नोकर्‍या देऊ शकते. हॉटेल मॅनेजमेंट शाखेतील पदवीधरांना मोठे हॉटेल्स आणि कॉर्पोरेट हाऊसेसमध्ये गेस्ट किंवा कस्टमर रिलेशन एक्झिक्युटिव्ह म्हणून नोकरी मिळते. राज्य पर्यटन विकास महामंडळातही नोकरीच्या संधी असून इच्छुक विद्यार्थी हॉस्पिटॅलिटी कॅटरींगच्या भारतातील तसेच भारताबाहेरील विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षण जसे एम्‌एससी, एमबीए कोर्सेससाठी नोंदणी करू शकतात.
स्टार हॉटेल्समध्ये खालील विभागांमध्ये त्यांना प्रशिक्षित कर्मचार्‍यांची गरज असते- १) फ्रंट ऑफिस, २) हाऊस किपिंग, ३) फूड अँड बेव्हरेजेस विभाग, ४) हेल्थ क्लब, ५) ब्युटी सलून, ६) अकौंटिंग विभाग, ७) सेक्युरिटी विभाग, ८) बँक्वेट विभाग, ९) बिझिनेस सेंटर, १०) मार्केटिंग विभाग, ११) इंजिनिअरिंग किंवा मेंटेनन्स विभाग.
स्टार हॉटेल्समधील महत्त्वाच्या जागा – जनरल मॅनेजर, फूड अँड बेव्हरेज मॅनेजर, एक्झिक्युटिव्ह हाऊसकिपर, फ्रंट ऑफिस मॅनेजर इत्यादी.
हॉटेल मॅनेजमेंटच्या सर्व खाजगी तसेच सरकारी संस्थांना एआय्‌सीटीई किंवा युजीसीची मान्यता असणे क्रमप्राप्त आहे. कुणी म्हटले ते खरेच आहे की कुठल्याही इंडस्ट्रीमधील सुरुवात जर शिक्षण, शिस्त व केशभूषेद्वारे झाली असेल तर तुमचे व्यक्तिमत्त्व उठावदार बनते. मग तुम्ही बोलण्याआधी तुमचे व्यक्तिमत्त्व बरेच काही बोलून जाते. हॉटेल इंडस्ट्रीमध्ये मोठं काहीतरी करू इच्छिणार्‍या आजच्या उत्साही नवतरुणांना हार्दिक शुभेच्छा!!