हॉकी ः सुनीता लाक्रा कर्णधारपदी

0
97

अनुभवी बचावपटू सुनीता लाक्रा हिच्याकडे भारताच्या महिला हॉकी संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. कोरियातील डोंघे सिटी येथे १३ मेपासून खेळविल्या जाणार्‍या आशियाई चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत ती भारतीय संघाची जबाबदारी सांभाळणार आहे. नियमित कर्णधार राणी रामपाल हिला विश्रांती देण्यात आली आहे. गोलरक्षक सविता उपकर्णधार म्हणून काम पाहणार आहे. गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने तब्बल १२ वर्षांनंतर उपांत्य फेरीत स्थान मिळविले होते. संघाला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले असे तरी आपल्या या कामगिरीपासून प्रेरणा घेऊन चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा खेळाडूंना आहे.

२०१६ साली झालेल्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारताने अंतिम फेरीत चीनला नमवून जेतेपदाला गवसणी घातली होती. मागील वर्षीच्या आशिया चषकातही भारताने चीनचा हिरमोड करताना किताब आपल्या नावे केला होता. यावेळेस १३ मे रोजी जपानविरुद्धच्या सामन्याने भारत आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. १६ मे रोजी चीनविरुद्ध भारत आपला दुसरा सामना खेळेल. १७ मे रोजी मलेशिया व भारत यांच्यात लढत रंगणार आहे. तर १९ मे रोजी आपल्या शेवटच्या साखळी सामन्यात भारताला बलाढ्य कोरियाशी दोन हात करावे लागतील.

भारतीय संघ ः गोलरक्षक ः सविता, स्वाती, बचावपटू ः दीपिका, सुनीता लाक्रा (कर्णधार), दीप ग्रेस इक्का, गुरजीत कौर, सुमन देवी थोंडुदाम, मध्यरक्षक ः मोनिका, नमिता टोप्पो, निक्की प्रधान, नेहा गोयल, लिलिमा मिन्झ, नवज्योत कौर व उदिता. आघाडीपटू ः वंदना कटारिया, लालरेमसियामी, नवनीत कौर व अनुपा बार्ला.