हैदराबादविरुद्ध बॅरेरोची पेनल्टी नॉर्थईस्टसाठी निर्णायक

0
101

इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) नॉर्थईस्ट युनायटेड एफसीने बुधवारी हैदराबाद एफसीवर एकमेव गोलने मात केली. केवळ चार मिनिटे बाकी असताना अर्जेंटिनाचा बदली खेळाडू मॅक्सिमिलियानो बॅरैरो याने पेनल्टीवर केलेला गोल निर्णायक ठरला. या विजयासह नॉर्थईस्टने गुणतक्त्‌यात आघाडी सुद्धा घेतली.

नॉर्थईस्टचा हा चार सान्यांतील दुसरा विजय आहे. त्यांनी दोन बरोबरी साधल्या आहेत. या अपराजित कामगिरीसह त्यांचे आठ गुण झाले. त्यांनी जमशेदपूरला (३ सामन्यांतून ७) मागे टाकत आघाडी घेतली. एटीकेचे ३ सामन्यांतून ६, तर एफसी गोवाचे ३ सामन्यांतून ५ गुण आहेत. हैदराबादला ४ सामन्यांत तिसरा पराभव पत्करावा लागला. एका विजयासह त्यांचे ३ गुण आहेत. त्यांचे नववे स्थान कायम राहिले.
अंतिम टप्यात नॉर्थईस्टचा मध्यरक्षक ज्योस लेऊदोला पेनल्टी क्षेत्रालगत चेंडू मिळाला. त्यावेळी हैदराबादच्या बचाव फळीची ढिलाई कारणीभूत ठरली. लेऊदोने मारलेला चेंडू रोखण्यासाठी शंकर सॅम्पीग्राज झुकला, पण चेंडू त्याच्या डोक्याला लागण्याआधी दंडाला लागला. परिणामी पंच ओमप्रकाश ठाकूर यांनी नॉर्थईस्टला पेनल्टी बहाल केली. शंकरला यलो कार्डही दाखविण्यात आले. पेनल्टी बहाल करण्यावर हैदराबादच्या खेळाडूंनी वाद घातला, पण पंचांचा निर्णय कायम राहिला. बॅरैरोने ही सुवर्णसंधी निसटू दिली नाही. त्याने हैदराबादचा गोलरक्षक कमलजीत सिंगला चकविले. बॅरैरो दुसर्‍या सत्रात मैदानावर उतरला होता.

सामन्यातील पहिला कॉर्नर नॉर्थईस्टला दुसर्‍याच मिनिटाला मिळाला. त्यावर निखील कदमने मारलेला क्रॉस पास निखील पुजारीने रोखला. त्यानंतर पुन्हा एक कॉर्नर मिळाला, जो मार्टीन चॅव्हेजने घेतला. त्याने मारलेला चेंडू जेथे गेला तेथे कुणीच सहकारी नव्हता. त्यामुळे चेंडू गोल कीकसाठी बाहेर गेला. ही संधी हुकणे नॉर्थईस्टसाठी निराशाजनक ठरले.

हैदराबादने पहिला प्रयत्न पाचव्या मिनिटाला केला. त्यात अभिषेक हलदरने उजवीकडून पुजारीला पास दिला. त्यातून पास मिळताच मार्सेलिनीयोने पेनल्टी क्षेत्रात मुसंडी मारत चेंडू मारला. त्यावर नॉर्थईस्टचा गोलरक्षक शुभाशिष रॉयने खाली वाकत चेंडू थोपविला, जो बाहेर गेल्याने हैदराबादला कॉर्नर मिळाला. मार्को स्टॅन्कोविचने कॉर्नरवर चेंडू मारला, जो नॉर्थईस्टच्या बचाव फळीने थोपविला. हा चेंडू आपल्यापाशी येताच हलदरने फटका मारला. त्यावर गुरतेज सिंगने हेडिंग केले, पण त्यात अचूकता नव्हता.
हैदराबादला १२व्या मिनिटाला आणखी एक कॉर्नर मिळाला. मॅथ्यू किल्गॅलॉनने पेनल्टी क्षेत्रात लांबून चेंडू मारला, जो हलदरला नीट मिळू शकला नाही. मिस्लाव कोमोर्स्कीने बचाव केला, पण तो चेंडू रॉयकडे पाठवू शकला नाही.
१६व्या मिनिटाला महंमद यासीरने उजवीकडे पेनल्टी क्षेत्राबाहेर रेडीम ट्लांगला पाडले. त्यामुळे नॉर्थईस्टला फ्री किक मिळाली. चॅव्हेजने पुजारीच्या मारलेला क्रॉस शॉट पुजारीने हेडिंगद्वारे रोखला.
१९व्या मिनिटाला मार्सेलिनीयोला चेंडू मिळताच त्याने पेनल्टी क्षेत्रात मुसंडी मारली. त्याने गनी अहमद निगमच्या दिशेने चेंडू मारला, पण राकेश प्रधानने नॉर्थईस्टसाठी बचाव केला. त्यात राकेश आणि निगम यांच्या डोक्यापाशी धडक झाली. दोघे पडले, पण कुणाला लागले नाही.

हलदरने २५व्या मिनिटाला पास देताच स्टॅन्कोविचने मारलेला फटका थोडक्यात नेटबाहेरून गेला. हैदराबादच्या किल्गॅलॉनने यासीरला २९व्या मिनिटाला डावीकडे पास दिला, पण अवघड कोनामुळे यासीर ताकदवान फटका मारू शकला नाही. हा प्रयत्न रोखणे रॉयला सहज शक्य झाले. ३२व्या मिनिटाला हैदराबादच्या शंकर सॅम्पीग्राजने उजवीकडून हवेत चेंडू मारला. त्यावर निगमने प्रयत्न केला. त्याने रॉयच्या डोक्यावरून चेंडू मारला, पण तो नेटमध्ये जाऊ शकला नाही.
४०व्या मिनिटाला स्टॅन्कोविचचा प्रयत्न रॉयने रोखला. ग्यानने पूर्वार्धातील अखेरच्या मिनिटाला चॅव्हेजच्या साथीत आगेकूच केली. ग्यानने प्रयत्नही केला, पण चेंडू नेटवरून गेला.

दुसर्‍या सत्राच्या प्रारंभी रेडीमला बदली खेळाडू मॅक्सिमिलियानो बॅरैरो याच्याकडून पास मिळाला. त्याचा जोरदार प्रयत्न कमलजीतने थोपविला. चेंडू बाहेर गेल्याने मिळालेल्या कॉर्नरवरही फार काही घडले नाही. नॉर्थईस्टला ५१व्या मिनिटाला मोठा धक्का बसला. ग्यानला घोट्याच्या दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले. त्याच्याऐवजी पॅनोगिटोटीस ट्रीयाडीसला पाचारण करण्यात आले. पुढच्याच मिनिटाला रिगन सिंगने उजवीकडून ट्रीयाडीसला पास दिला. कमलजीतने अचूक अंदाज घेत वेळीच हालचाल करीत ट्रीयाडीसने उजव्या पायाने मारलेला फटका रोखला.