सायना नेहवालचे आव्हान आटोपले

0
127

चायना ओपनमध्ये काल बुधवारी भारताच्या सायना नेहवाल हिला स्थानिक खेळाडू कान यान यान हिच्याकडून केवळ २४ मिनिटांत २१-९, २१-१२ असा पराभव पत्करावा लागला. या पराभवासह सायनाचे ७००,००० युएस डॉलर्स बक्षीस रकमेच्या या बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर सुपर ७५० स्पर्धेतील आव्हान आटोपले. सायनाचा पती व प्रशिक्षक पारुपल्ली कश्यप याने मात्र पुरुष एकेरीत विजय नोंदविताना थायलंडच्या सित्तिकोम थामासिन याचा २१-१४, २१-१३ असा पाडाव केला. हा सामना ४३ मिनिटे रंगला. दुसर्‍या फेरीत कश्यपचा सामना डेन्मार्कच्या सातव्या मानांकित व्हिक्टर एक्सेलसन याच्याशी होणार आहे. विश्‍व अजिंक्यपद स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या बी. साई प्रणिथ यानेदेखील दुसरी फेरी गाठताना इंडोनेशियाच्या टॉमी सुगियार्तो याचा १५-२१, २१-१२, २१-१० असा पराभव केला. जागतिक क्रमवारीत ११व्या स्थानावर असलेल्या प्रणिथसमोर पुढील फेरीत चौथ्या स्थानावरील डेन्मार्कचा अँडर्स आंतोनसेन असेल. मिश्र दुहेरीत प्रणव जेरी चोप्रा व सिक्की रेड्डी यांना पहिल्याच फेरीत बाहेर व्हावे लागले. तैवानच्या वांग ची लिन व चेंग ची या यांनी भारतीय जोडीचा २१-१४, २१-१४ असा पराभव केला. पुरुष दुहेरीत मनू अत्री व सुमिथ रेड्डी यांना मलेशियाच्या ऍरोन चिया व सूह वोई यिक यांनी २३-२१, २१-१९ असे पराजित केले.