हेरगिरीचे जाळे

0
104

पाकिस्तानी उच्चायोगाच्या राजनैतिक छत्रछायेखालून चालवल्या जाणार्‍या आयएसआयच्या हेरगिरीच्या जाळ्याचा पर्दाफाश ही अतिशय गंभीर घटना आहे. पठाणकोट, उरीसारख्या तळांवर हल्ले चढवताना त्यांची इत्यंभूत माहिती दहशतवाद्यांना कशी असते या आजवर जनतेला सतावत आलेल्या प्रश्नांचे एक उत्तर यात दडले आहे. देशाशी गद्दारी करणार्‍यांची आपल्या देशात उणीव नाही. भरपूर पैशाच्या मोबदल्यात अशा हस्तकांकडून संरक्षणविषयक गोपनीय माहिती मिळवून ती थेट आयएसआयला पोहोचवणार्‍या अशा गद्दारांमुळेच आज आपल्या जवानांचे आणि नागरिकांचे प्राण धोक्यात आहेत. पाकिस्तानी उच्चायोगाच्या आडून ही हेरगिरी चालत असे आणि त्याचा थांगपत्ताही पाकिस्तानच्या भारतातील उच्चायुक्तांना वा वरिष्ठ अधिकार्‍यांना नव्हता असे मानणे भोळेपणाचे ठरेल. व्हिएन्ना परिषदेतील निर्णयानुसार राजनैतिक अधिकार्‍यांना असणार्‍या कायदेशीर अभयाचा यथास्थित फायदा उठवीत आयएसआयने तेथे आपले जाळे विणले होते असे दिसते. जे पाकिस्तानी उच्चायुक्त आजवर काश्मिरी फुटिरतावाद्यांशी उघडउघड हातमिळवणी करीत असत, ते या हेरगिरीमध्येही सामील नव्हते असे कसे मानावे? शिवाय पकडला गेलेला महमुद अख्तर हा तर त्यांचा वैयक्तिक कर्मचारी आहे. त्यामुळे हे सगळे राजरोस चालत होते आणि संरक्षण मंत्रालयाशी संबंधित गोपनीय माहिती आयएसआयपर्यंत पोहोचत होती असे दिसते. आयएसआयला या माहितीत रस होता यातून भारताविरुद्ध ज्या दहशतवादी कारवाया आजवर होत आल्या आहेत, त्यामागे आयएसआय आहे हेच तर सिद्ध होते. या सगळ्या गोपनीय माहितीच्या आधारे दहशतवादी हल्ल्यांचे नियोजन आयएसआय करायची आणि त्यासाठी जैश ए महंमद, लष्कर ए तोयबा, जमात उद दावा आदींची साथ घ्यायची आणि त्यांना भारतीय सीमेत घुसखोरी करायला लावून घातपात घढवायची. हेरगिरीचे हे एक जाळे पकडले गेले याचा अर्थ यापुढे हे हल्ले थांबतील असा नव्हे. हेरगिरीची अशा प्रकारची किती खोल जाळी आयएसआयने एवढ्या वर्षांत भारतात विणलेली असतील याची आपण कल्पनाही करू शकणार नाही. सध्या उजेडात आलेली हेरगिरीच गेले दीड वर्ष चालली होती. मध्यंतरी ‘हनीट्रॅप’ची फार चर्चा झाली. भारतीय सैन्यातील जवानांना सोशल मीडियावर मोहात पाडून त्यांच्याकडून गोपनीय माहिती गोळा करण्याचे एक व्यापक षड्‌यंत्र असल्याचे उघडकीस आले. पठाणकोट, उरीसारखे हल्ले होतात, तेव्हा ते केवळ नकाशांवर वा जीपीएसवर विसंबून होत नाहीत, तर त्यामागे अशा गद्दारांकरवी प्राप्त केलेली अधिकृत गोपनीय माहिती असते, म्हणूनच ते अशा अतिसंरक्षित तळांमध्ये सहजपणे प्रवेश करू शकतात आणि मृत्यूचे तांडव करतात. प्रस्तुत हेरगिरीच्या जाळ्यामध्ये पकडल्या गेलेल्या हस्तकांपाशी लष्कर आणि सीमा सुरक्षा दलाच्या अधिकार्‍यांच्या नेमणुकीच्या जागा, सैन्य दलांच्या तुकड्यांदरम्यान आदानप्रदान होणारे सांकेतिक शब्द, सांकेतिक धोरणे ही सगळी माहिती आढळली आहे. म्हणजेच या हस्तकांनी आपल्या संरक्षण यंत्रणेमध्ये खोलवर शिरकाव केलेला आहे, अन्यथा सामान्यतः बाहेरच्या व्यक्तीला एवढी गोपनीय माहिती हस्तगत करणे शक्यच झाले नसते. या हेरांकडून अधिकार्‍यांचे घरचे पत्ते, कौटुंबिक माहिती मिळवली जात होती याचा अर्थ कच्च्या दुव्यांना आर्थिक लालूच दाखवून आपल्या जाळ्यात ओढून घेण्याचा प्रयत्न सतत सुरू होता. हे सगळे धक्कादायक तर आहेच, परंतु राष्ट्रीय सुरक्षेसमोरील महाकाय आव्हानांची जाणीव देणारेही आहे. अशा हेरगिरीसंदर्भात अधिक सजगता ठेवल्याविना आता तरणोपाय नाही हेच यातून प्रकर्षाने सिद्ध झाले आहे.