वैभव-समृद्धीची देवता लक्ष्मी

0
312

– सौ. पौर्णिमा केरकर

दिवाळीला लक्ष्मीपूजन सोहळ्यात धनदौलतीच्या या देवतेचे पूजन करण्याची परंपरा आपल्या समाजात रूढ आहे. महाकाली, महासरस्वती आणि महालक्ष्मी अशा तीन रूपांत पुजली जाणारी ही महामाया सत्य, सुंदर, मंगलाचे प्रतीक आहे. विद्या, ज्ञान, चारित्र्य, पावित्र्य आणि धनदौलत यांच्या प्राप्तीसाठी पुजली जाणारी ही शक्तिरुपिणी तेजस्वी दिव्यांच्या माध्यमातून आम्हाला सत्कार्याची प्रेरणा देत असते.

पाऊस आताच ओसरू लागलेला आहे. उबदार थंडीची चाहूल… ओलावा मातीत पसरलेला… परिसराला वेढून राहिलेला हिरवा तजेला… भातखाचरांतील सोनसळी सळसळ… पारिजातक, जाईजुईचा सुगंध हलकेच घरात प्रवेश करता होतो… आश्‍विनातली कोजागिरी आसमंताला रुपेरी वर्ख चढवते आणि पुढे येऊ घातलेल्या दिवाळीच्या प्रकाशपर्वाची जाणीव करून देते.

दरवर्षी आपण दिवाळी साजरी करतो. पण प्रत्येकच वर्षी ती नव्याने आपल्या समोर येते. लहानापासून थोरांपर्यंत सर्वांनाच स्वतःमध्ये सामावून घेणार्‍या या उत्सवाच्या स्वागतासाठी घरे पणत्यांच्या प्रकाशाने लखलखून उठतात. दिवाळीसारख्या गोड उत्सवाची सुरुवात कडू औषध प्राशन करूनच व्हायची. सातविणाची साल पाट्यावरवंट्यावर बारीक कुटून, तिचा रस काढून त्याच्यात मिरी घालून तो रस सर्वांनाच प्यायला दिला जायचा. कडुनिंबाची पानेसुद्धा खाल्ली जायची. सुरुवातीला कडू खाल्ले की नंतर खाल्लेल्या गोड पदार्थांचे व्यवस्थित पचन व्हायचे, हीच त्यामागे भावना होती. नरकासुराचा वध केला की वाईटावर चांगुलपणाचा विजय- सुगंधित उटण्याने स्नान, तुळशीसमोर कारीट फोडून- नंतर गोडधोडाच्या सेवनास सज्ज होणे व्हायचे. लक्ष्मीपूजन, पाडवा, नरकचतुर्दशी अशी सणांची गुंतावळ पुढे चालूच राहते आणि घराबरोबरीने सभोवतालच्या परिसरातसुद्धा चैतन्याचा साक्षात्कार घडतो. दिवाळीत लोकमनाला वेध लागतात ते लक्ष्मीपूजनाचे आणि पाडव्याचे. नरकचतुर्दशीला तर कवळ्याला पंचमूर्तीचे पूजन केले जाते. शांतादुर्गेच्या पाच रूपांचे दर्शन वर्षातून एकदाच या दिवशी करण्यात येते. सर्वत्र विखुरलेले या देवीचे भक्तगण या निमित्ताने मंदिरात मनोभावे येतात. काही काही ठिकाणी तर देवीच्या मुखकमलावर आरशाचा प्रकाश पाडण्याची परंपरा आहे. भाद्रपद-आश्‍विनातील तरारून आलेली भाताची रोपे कार्तिकात परिपूर्ण होतात. लक्ष्मीच्या पावलानी धनधान्य, फळेफुले यांनी घर भरून जाते म्हणूनही लक्ष्मीपूजनाची प्रतीकात्मकता लोकमनाने अंगिकारलेली आहे.
संस्कृती आणि निसर्ग यांचे नाते अगदी निकटचे तसेच ते उत्कटदेखील आहे. निसर्गाविषयीची आत्मीयता, आदरत्वाची भावना अभिव्यक्त करण्यासाठीच निसर्गातील वैविधतेची प्रतीकात्मक पूजा करण्याची परंपरा लोकसंस्कृतीमधून दिसते. ऋतुचक्राप्रमाणे बदलत जाणारे या मातीतील सण, उत्सव, सोहळे हे मानवी मनाला एकात्मतेचा संदेश देतात. या संस्कृतीत रुतलेल्या, रुजलेल्या आणि आजही तेवढ्याच श्रद्धेने टिकवून ठेवलेल्या या परंपरांमुळे तणावपूर्वक जीवनशैलीतही समाधानाची प्राप्ती होते. भूमी आणि स्त्री बहुप्रसवा. त्यांच्यातील एकरूपत्वामुळे स्त्रीची सर्जकता व सृजनशीलता शक्ती बनून रक्षणकर्ती झाली. आश्‍विनातील नवरात्रोत्सवातील नऊ रात्री या शक्तिरुपिणी मातांना वाहिलेल्या असतात. नवरात्रातील लक्ष्मी शक्तिदेवता म्हणून पुजल्या जातात, तर कार्तिकातील लक्ष्मीपूजनाला तिचं सौम्य-सतेज-स्निग्ध रूप वैभव-धनदौलत-संपत्तीचे प्रतीक बनून घराघरांत, व्यवसायांत स्थिरावताना अनुभवता येते. दिवाळीच्या दिवसांत तर लक्ष्मीपूजनाचा थाट अवर्णनीय असाच असतो. संपत्ती, वैभव, समृद्धी यांची देवता म्हणून शेकडो वर्षांपासून या मातीत जी स्थिरावली, लोकमनाने जिला मोठ्या श्रद्धेने, मनस्वीपणाने भजली, पुजली ती म्हणजे महालक्ष्मी. ग्रामीण गोव्यात तर ती ‘केळबाय’ म्हणूनच वंदनीय ठरली. तर भारतीय मूर्तीकलेत ‘गजलक्ष्मी’ रूपातील शक्तिरूपिणी ठरली. महालक्ष्मी हे जगदंबेचे रूप. शिवपत्नी दुर्गादेवी अशीही तिची ओळख आहे. देव-दानवांच्या युद्धात पराभूत झालेल्या देवांच्या सहकार्यासाठी शिव-विष्णू धावून आले. त्यांच्या मुखातील तेजातूनच एक शक्तिशाली स्त्रीदेवता अवतीर्ण झाली. तिने महिषासुर दैत्याचा वध करून देवांना भयमुक्त केले. त्यामुळेच ती महिशासुरमर्दिनी- महालक्ष्मी म्हणून लोकप्रिय बनली. चतुर्भुज रूपात असलेल्या महालक्ष्मीच्या हाती फळ, गदा, ढाल, वज्र, धनुष्य वगैरे आयुधे असतात. कोलासुर दैत्याचा नाशसुद्धा महालक्ष्मीनेच केला. कोलासुर म्हणजे रानडुक्कर. हे रानडुक्कर शेतीची मोठ्या प्रमाणात नुकसानी करायचे. शेतकरी चिंतेत-विवंचनेत सतत असायचे. महालक्ष्मीने या उपद्रवावर नियंत्रण मिळविले. त्यामुळे कृषक समाजाने लक्ष्मीला सन्मानाचे स्थान प्रदान केले. चतुर्थीला गौरीची पूजा, भाद्रपद शुद्ध अष्टमीला दूर्वाची पूजा ही महालक्ष्मीचीच पूजा मानली गेली आहे. चित्पावन ब्राह्मणात तर तांदळाच्या पिठाची उकड करून, महालक्ष्मीचा मुखवटा करून तिचे पूजन केले जाते. हा मुखवटा काजळ-कुंकवाने रंगवून सुशोभित मंडपीखाली एका भांड्याच्या उतरंडीवर घट्ट बसवून त्याला भगजरी लुगडे नेसवले जाते. सौभाग्य, संतती आणि संपत्तीच्या प्राप्तीसाठी तांब्याच्या घागरीत फुंकर घालून नृत्य केले जाते. ‘कळशी’ हे गर्भाशयाचे चिन्ह मानले जाते आणि कळशीत फुंकर मारणे म्हणजे प्राण ओतणे. महालक्ष्मी म्हणजे सृजन, संपत्ती आणि वैभव यांची देवता म्हणूनच महिला सृजनत्वाचे दान मागतात.
दिव्यांची सुरेख आरास केली जाते ती दिवाळीत. काळोखाला दूर करण्याचे सामर्थ्य एका छोट्याशा पणतीत असते. दिवाळीत दीप प्रज्वलित करून सुख-समृद्धीसाठी मागणे मागितले जाते. व्यापार, उद्योग, व्यवसायातील लोकांना तर दिवाळीतले लक्ष्मीपूजन हा मोठा उत्सवच असतो. गोव्यात तर गजलक्ष्मी आणि महालक्ष्मीचे पूजन प्राचीन काळापासून प्रचलित आहे. गोव्यात ठिकठिकाणी आढळणारी महालक्ष्मीची मंदिरे इथल्या लक्ष्मीपूजनाची माहिती पुरवितात. सालसेत तालुक्यातील कोलवा येथील महालक्ष्मीचे मंदिर हे तर कोलवा गावचे भूषण होते. पोर्तुगिजांनी इथले ग्रामदेवी महालक्ष्मीचे मंदिर उद्ध्वस्त केले. त्यानंतर या देवीचे स्थलांतर करण्यात आले ते नेमके कोठे हे जरी खात्रीपूर्वक सांगता येत नसले तरीही तिच्याविषयी अपार आदर असलेल्या भाविकांनी अंतःकरणातील श्रद्धा जागृत ठेवली आहे. ताळगाव, पणजी शहराची ग्रामदेवी महालक्ष्मी, सांगे तालुक्यातील नेतुर्ली येथे नेत्रावळी नदीच्या डाव्या किनारी महालक्ष्मी मंदिर आहे, शिरसईची ग्रामदेवी म्हालकुमी म्हणजेच महालक्ष्मी होती. इतर तालुक्यांप्रमाणेच बारदेस तालुक्यातही पोर्तुगिजांनी धार्मिक छळ आरंभून मंदिरे उद्ध्वस्त करण्याचे सत्र सुरू केले तेव्हा शिरसईची म्हालकुमी, सातेर, वेताळ, रवळनाथ आणि केळबाय देवी यांच्या मूर्ती पेडण्यातील धारगळला नेऊन तिथे मंदिर उभारण्यात आले. डिचोलीतील साळ गावात महालक्ष्मी असून ती पूर्वापार म्हालकुमी म्हणून लोकप्रिय आहे. महालकुमी किंवा महालक्ष्मीच्या रूपात पुजली जाणारी ही देवी गोमंतकीय लोकमानसाने संतती, समृद्धी आणि संपत्ती यांची देवता म्हणूनच पुजलेली आहे.
आश्‍विनातल्या नवरात्रातल्या अष्टमीला आणि दिवाळीला लक्ष्मीपूजन सोहळ्यात धनदौलतीच्या या देवतेचे पूजन करण्याची परंपरा आपल्या समाजात रूढ आहे. महाकाली, महासरस्वती आणि महालक्ष्मी अशा तीन रूपांत पुजली जाणारी ही महामाया सत्य, सुंदर, मंगलाचे प्रतीक आहे. विद्या, ज्ञान, चारित्र्य, पावित्र्य आणि धनदौलत यांच्या प्राप्तीसाठी पुजली जाणारी ही शक्तिरुपिणी तेजस्वी दिव्यांच्या माध्यमातून आम्हाला सत्कार्याची प्रेरणा देत असते. दिवाळी ‘लक्ष्मी’ घराघरांत पुजतात. पूर्वी लोकमानस शेती करायचे. धनधान्याने भरलेले वैभव याच दिवसांत घरात ओसंडून वाहायचे. ज्यांचा गोठा गायी-म्हैशी-वासरांनी भरलेला असे ते घर श्रीमंत अशी व्याख्या ठरलेलीच होती. आज ‘लक्ष्मी’ची संकल्पना बदललेली आहे. जास्त पैसा- दागिने असणे, मोठे घर- उंची वस्तू- एकंदरीत पैशांची भरभराट म्हणून ‘त्यांच्या घरी लक्ष्मी पाणी भरते’ असे म्हटले जाते. लक्ष्मीच्या लोभापायी समाजात स्वैरता निर्माण झाली असता लक्ष्मीपूजनाचा खरा अर्थ हा पावित्र्य, प्रामाणिकपणा, सचोटीने वागण्याची वृत्ती अंगीकारणे असा घेतला तर या मातेची विविध रूपे वंदनीय ठरतात. सांतेर, शांतादुर्गा, भगवती, म्हालसा ही याच शक्तीची भक्तिमयी रूपे. माता ही सृजनशील, बीजधारण- फलधारण करणारी निर्मितीची अधिष्ठात्री. चैतन्यदात्री!