यंदाची दिवाळी जवानांना समर्पित करा : मोदी

0
108

 

>> ‘मन की बात’मध्ये आवाहन
>> पंतप्रधानांची जवानांसोबत दिवाळी

देशातील विविध सुरक्षा दलांमध्ये डोळ्यांत तेल घालून देशाचे रक्षण करत असलेल्या जवानांमुळेच आपण दिवाळी साजरी करू शकतो. त्यामुळे यंदाची दिवाळी त्यांना समर्पित करा असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल ‘मन की बात’ कार्यक्रमाद्वारे भारतीयांना संबोधित करताना केले. दिवाळी हा अंधारातून प्रकाशाकडे नेणारा उत्सव असून हा उत्सव आता भारताबरोबरच जगभरात साजरा होतो असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

लष्कर, सीमा सुरक्षा दल, सीआरपीएफ असे कोणतेही सुरक्षा दल असो या जवानांमुळेच आपण दिवाळी साजरी करू शकतो. यंदाची दिवाळी आपण त्यांना समर्पित करू असे आवाहन मोदी यांनी केले. आयुष्यातील प्रत्येक वळणावर हे जवान राष्ट्रहिताला प्राधान्य देतात असेही ते म्हणाले. भारत तिबेट पोलीस दलातील विकास ठाकूर या जवानाचे भरभरून कौतुक करीत हिमाचल प्रदेशामध्ये राहणार्‍या या जवानाने गावात शौचालये बांधण्यासाठी तब्बल ५७ हजार रुपये दिल्याचा पंतप्रधानांनी उल्लेख केला.
विविधतेत एकता ही भारताची शक्ती आहे. आपण आता एकतेचे दर्शन घडवले पाहिजे असे मोदी म्हणाले. ३१ ऑक्टोबर रोजी सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त देशभरात एकता दिवस साजरा केला जाणार आहे. तसेच इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांनादेखील श्रद्धांजली अर्पण करणार असल्याचे मोदी यांनी स्पष्ट केले.
यूएनओत पहिल्यांदाच दिवाळी
दरम्यान, संयुक्त राष्ट्र संघाच्या न्यूयॉर्क येथील मुख्यालयात पहिल्यांदाच दिवाळी साजरी करण्यात आली. दिवाळीनिमित्त संयुक्त राष्ट्र संघाचे मुख्यालय रोषणाईने उजळून निघाले होते. मुख्यालयावर निळ्या रंगाची आकर्षक रोषणाई करण्यात आली असून त्यावर दिवा व ‘हॅप्पी दिवाली’ असा संदेश आहे. भारताने याबद्दल या सर्वोच्च संघटनेला धन्यवाद दिले आहेत.

मोदींची जवानांसोबत दिवाळी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवानांसोबत दिवाळी साजरी करत आपली परंपरा कायम राखली. मोदी काल दुपारी हिमाचल प्रदेशमधील किन्नौर जिल्ह्यातील समदो येथे पोहोचले. त्यांनी जवानांना मिठाई देऊन त्यांच्यासोबत दिवाळी साजरी केली. यावेळी जवानांनीही मोदींना मिठाई देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी जवानांसमोर बोलताना मोदी यांनी पंतप्रधानपदाची उमेदवारी मिळाल्यावर पहिली सभा जवानांसोबत घेतल्याची आठवण करून दिली. त्यावेळी ‘वन रँक वन पेन्शन’ची मागणी केली होती. ती आपण पूर्ण केल्याचे मोदी यांनी सांगितले.