हणजूण, वागातोरवासीयांनी पाण्यासाठी वाहतूक रोखली

0
22

>> मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर मोर्चा नेण्याचा इशारा

गेली कित्येक वर्षे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा अनियमित स्वरूपात होत असल्याने हणजूण – वागातोर ग्रामस्थांनी काल बुधवारी सकाळी समुद्र किनार्‍याकडे जाणारा रस्ता रोखून धरला. यावेळी मोठ्या प्रमाणात जमा झालेल्या महिला तसेच पुरुष आंदोलनकर्त्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आमदार विनोद पालयेकर तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याच्या ठिसूळ कारभाराविरोधात घोषणाबाजी केली. तसेच येथील रस्त्यावर ठाण मांडले. काल बुधवारी अर्धा दिवस ग्रामस्थांनी हे आंदोलन केले.

येथील परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी हणजूण पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. यावेळी सरपंच सावियो आल्मेदा यांनी मध्यस्थी केली. यावेळी आंदोलनस्थळी दाखल झालेल्या म्हापशातील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अभियंत्यांवर ग्रामस्थांनी प्रश्नांचा भडिमार केला. यावेळी आंदोलनकर्त्यांसोबत हणजूण कायसुवचे सरपंच पेट्रीक आल्मेदा, पंच सदस्य सुरेंद्र गोवेकर, शीतल दाभोलकर, सामाजिक कार्यकर्ते विष्णू नाईक, गजानन तिळवे, योगेश गोवेकर तसेच स्थानिक महिला मुले तसेच पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. वागातोर किनार्‍याकडे जाणारा मुख्य रस्ता आंदोलनकर्त्यांनी रोखून धरल्याने दोन्ही बाजूंना पर्यटक बसगाड्यांच्या रांगा लागल्या होत्या. स्थानिक लोकांनाही या आकस्मिक रास्ता रोकोचा फटका बसला.

दरम्यान, शिवोली पंचक्रोशीतील गुडे, शापोरा, तसेच हणजूण, वागातोर या गावांना गेल्या अनेक महिन्यांपासून अनियमित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या संतापाचा पारा चढला होता. त्यामुळे ग्रामस्थांनी आंदोलन छेडण्याचा तडकाफडकी निर्णय घेतला असे या प्रभागाच्या पंच शीतल दाभोलकर तसेच सुरेंद्र गोवेकर यांनी सांगितले. दरम्यान, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोमंतकीयांसाठी मोफत पाणीपुरवठ्याची घोषणा म्हणजे या भागातील महिला वर्गाची घोर थट्टाच आहे असा आरोप पंच दाभोळकर यांनी केला. दरम्यान, यावेळी पैसे घ्या परंतु पिण्याचे पाणी द्या अशी जोरदार मागणी आंदोलनकर्त्या महिला करत होत्या.

तर मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर धडक
येत्या चोवीस तासांच्या आत या भागातील पाणीपुरवठा सुरळीत केला नाही तर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या बंगल्यावर धडक देण्यात येईल असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला. तसेच चोवीस तासांत या भागात पाण्याचा पुरवठा न झाल्यास किनारी भागात पर्यटकांच्या वाहनांना प्रवेश दिला जाणार नसल्याचेही ग्रामस्थांनी यावेळी सांगितले. मँगो-ट्री परिसरात सकाळी आठ वाजल्यापासूनच ग्रामस्थ उपस्थित होते.