पणजी-मडगाव वाहतूक कोंडी सोडवा

0
35

>> कॉंग्रेसकडून सरकारला तीन दिवसांची मुदत

पणजी-मडगाव महामार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी कॉंग्रेस पक्षाने भाजप सरकारला तीन दिवसांची मुदत दिली आहे. ह्या तीन दिवसांच्या मुदतीत जर सरकारला ही समस्या सोडवण्यास अपयश आले तर कॉंग्रेस पक्ष या विरोधात एक महानिषेध मोर्चाचे आयोजन करेल असा इशारा प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी काल भाजप सरकारला दिला.

गेले सतत पाच ते सहा दिवस या मार्गावर वाहतुकीची कोंडी होऊ लागलेली आहे. त्यामुळे पणजीहून मडगाव व मडगावहून पणजी हे अंतर कापण्यास एक तासाऐवजी दोन ते सव्वा दोन तास लागत आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणार्‍या प्रवाशांचे हाल होऊ लागले आहेत. ह्या चार पदरी महामार्गाचे काम करणार्‍या कंत्राटदाराच्या बेजबादारपणाचा फटका या मार्गावरून प्रवास करणारे प्रवासी व वाहनचालकांना सोसावा लागत आहे. रोज कामानिमित्त वास्को व मडगावहून पणजीत येणार्‍या सरकारी तसेच खासगी आस्थापनात काम करणार्‍या कर्मचार्‍यांबरोबरच कामगार वर्ग व अन्य प्रवाशांचेही हाल होऊ लागले आहेत अशी माहिती चोडणकर यांनी दिली. ही वाहतूक कोंडी आणखी जास्त दिवस सहन करणार नसल्याचे सांगून चोडणकर यांनी, ही समस्या सोडवण्यासाठी सरकारला जास्तीत जास्त दोन दिवस देणार असल्याचे चोडणकर यांनी सांगितले.

त्यानंतर आम्ही एक निषेध मोर्चा काढणार असल्याचे चोडणकर यांनी स्पष्ट केले. कंत्राटदाराने पुलाच्या एका बाजूचा जोडमार्ग बंद केल्यामुळे ही वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे.