‘स्वस्तिक’ ः मांगल्याचे प्रतीक

0
142

योगसाधना – ५०४
अंतरंग योग – ८९

  • डॉ. सीताकांत घाणेकर

आपल्यातील प्रत्येकाला भगवंताचे अस्तित्व अभिप्रेत आहे म्हणजे श्री हवी. या भगवंताच्या सहवासात अपेक्षित आहे ते म्हणजे- सुसंवाद, प्रेम, आनंद, उल्हास तसेच हवे आहे ते जीवनाचे औदार्य आणि व्यवहाराचे सौहार्द. अशी स्वस्ति भावना असली की त्या जागेचे, कर्मकांडाचे सौंदर्य आपोआप वाढते.

विश्‍वांत चौफेर नजर फिरवली तर एक महाभयंकर असे भीतीचे वातावरण पसरलेले दिसते- कोरोनामुळे. या क्षणी आपल्यातील बहुतेकजण घाबरलेलेच आहेत. कारण प्रत्येक माध्यमातून – वृत्तपत्र, दूरदर्शन, रेडिओ… आणि आता प्रत्येकाकडे असणारा मोबाइल व त्यातील व्हाट्‌ऍप- फेसबुकवर चोवीस तास चांगले/वाईट, सकारात्मक/नकारात्मक संदेश येतच असतात. पुष्कळजण नकारात्मक संदेशांना महत्त्व देतात. वाचतात व लगेच फॉर्वर्ड करतात- इतरांना पाठवतात.
खरे म्हणजे प्रत्येकाने विचार करायला हवा की असे नकारात्मक संदेश इतरांना पाठवायची खरंच गरज आहे का? या संदेशांचा त्यांच्या मनावर परिणाम काय होणार? हा संदेश लगेच सगळीकडे पसरणार. म्हणजे व्हायरल होणार… सद्विचार करणारा तो लगेच डिलीट करून टाकणार.
उदाहरण – आग लागली तर तिला हवा देऊन तिला पसरवत नाही तर पाणी मारून ती विझवून टाकतो. पुढील नुकसान टाळतो.
अर्थात- काही संदेश हे असे म्हणजे कोरोना किती, कसा, कुठे वाढतो आहे? किती जण मृत्युमुखी पडले आहेत?… वगैरे ते पाठवू शकतो. कारण या बातमीमुळे समाज दक्षता पाळू शकतो- रोग पसरू नये म्हणून!
मुख्य म्हणजे अनेक सकारात्मक संदेशही येतात-

  • दक्षता कोणत्या पाळाव्यात?
  • कोरोना झालेल्यांनी कुठे जावे, काय करावे?
  • औषधे कुठली घ्यावीत? घरगुती उपाय काय करावेत?
  • शरीर- मन निरोगी ठेवण्यासाठी योगासने, प्राणायाम, ध्यान कसे करावे?
  • कोरोनाबद्दल तज्ज्ञांनी दिलेली माहिती…
  • आध्यात्मिक प्रवचने, भक्तिसंगीत… ज्यामुळे मनातील नकारात्मक विचार कमी होतील.
  • रोगप्रतिकारशक्ती व आत्मशक्ती वाढवण्यासाठी विविध तंत्रे.
  • भोजनाचे महत्त्व – शाकाहारी व सात्त्विक.
    ही अशी ज्ञानपूर्ण माहिती स्वतः व्यवस्थित वाचावी, त्यावर सखोल चिंतन करावे, शक्य तेवढी स्वतःच्या जीवनात अंमलबजावणी करावी… तसेच इतरांनादेखील सांगावे आणि संदेश अवश्य पुढे पाठवावेत.

आपण योगसाधना या लेखातील अंतरंगयोग या विषयांतर्गत अशाच ज्ञानपूर्ण गोष्टींवर वाचन करतो कारण अंतरंगयोग म्हणजे मनाचा उपयोग मनावर नियंत्रण करण्यासाठी करणे.
सध्या आपण भारतातील प्रतीकांबद्दल अधिकाधिक चांगली माहिती मिळवतो आहोत. इथेसुद्धा वाचन- मनन- चिंतन- मंथन- अनुसंधान.. अपेक्षित आहे. आज आम्ही एका सुंदर व अतिमहत्त्वपूर्ण प्रतीकाचा विचार करणार आहोत.

  • स्वस्तिक ः
    भारतीय संस्कृतीमध्ये हे अजोड प्रतीक आहे. कुठल्याही मंगल प्रसंगी स्वस्तिक दृष्टीस पडते. आपण फक्त ते मांगलिक प्रतीक म्हणून बघतो. त्यामागील तत्त्वज्ञान, भावना… यांबद्दल विचार करीत नाही.
    प्रत्येक कार्यांत पंडित अनेक मंत्र म्हणतात. तसाच एक मंत्र कोणत्याही मंगल कार्याच्या सुरुवातीला ब्राह्मण म्हणतात- स्वस्तिमंत्र …
    स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः|
    स्वस्ति नः पूषा विश्‍ववेदाः॥
    स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः|
    स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ॥
  • महान कीर्तिवान इंद्र आमचे कल्याण करो.
  • विश्‍वाचा ज्ञानस्वरूप पूषादेव आमचे कल्याण साधो.
  • ज्याचे हत्यार अतूट आहे असा भगवान गरुड आमचे मंगल करो.
    दुसरा अर्थ – ज्याचे रथचक्र अव्याहत चालत आहे तो अरुण देव (तार्क्ष्य) आमचे कल्याण करो.
  • बुद्धीचे स्वामी बृहस्पती आमचे कल्याण करो.
    ‘स्वस्तिक’ शब्दाचा अर्थ –
    स्वस्तिक = सु + अस् धातूपासून बनला आहे.
    सु म्हणजे चांगले, मंगल, कल्याणमय
    अस् म्हणजे अस्तित्व, सत्ता.
    स्वस्ति म्हणजे कल्याणकारी सत्ता, मांगल्याचे अस्तित्व आणि ह्याचे प्रतीक म्हणजे स्वस्तिक.
    आपल्यातील प्रत्येकाला भगवंताचे अस्तित्व अभिप्रेत आहे म्हणजे श्री हवी. या भगवंताच्या सहवासात अपेक्षित आहे ते म्हणजे- सुसंवाद, प्रेम, आनंद, उल्हास तसेच हवे आहे ते जीवनाचे औदार्य आणि व्यवहाराचे सौहार्द. अशी स्वस्ति भावना असली की त्या जागेचे, कर्मकांडाचे सौंदर्य आपोआप वाढते. तिथे अत्युत्तम सकारात्मक अशी दैवी कंपने असतात.
    गरज आहे ती म्हणजे याबद्दल ज्ञान व भाव असण्याची. यातच मानवाचा विकास व विश्‍वाचे कल्याण आहे.
    इतिहासाकडे चौफेर नजर टाकली तर लगेच लक्षात येते की अनादी काळापासून मानवाने अनेक प्रतीके निर्माण केली. जाणकार सांगतात की ‘स्वस्तिक’ हे सर्वप्रथम प्रतीक आहे. कुठल्याही मंगल कार्यात देव व मानव – दोघेही हवेत. देवांची शक्ती, सामर्थ्य व मानवाची शुभकामना दोन्हीचे संमीलन अपेक्षित आहे. यामुळेच कर्मकांडाचे सामर्थ्य वाढते.
    आपल्यातील बहुतेकांना हे माहीतच नाही. कारण अशा गोष्टी, असे ज्ञान दिलेच जात नाही. सगळे कर्मकांडच चालू आहे. आपल्याकडे कुठलेही कर्मकांडं असू दे, ते निर्विघ्न पार पडू दे अशी प्रत्येक व्यक्तीची सदिच्छा असते. कारण अनेकवेळा छोटी-मोठी विघ्ने येतच असतात. त्यामुळेच भगवंताला शरण जाऊन कार्याची सुरुवात मंगलाचरणाने केली जाते. ही परंपरा फार जुनी असली तरी आजतागायत चालू आहे.
    महाकवी, तत्त्ववेत्ते आपल्या साहित्याची सुरुवात मंगलाचरणाचा श्‍लोक लिहून मंगलमय भगवंताचे वाङ्‌मयीन पूजन करीत असत.
    सामान्य माणसाला अशी श्‍लोकरचना करणे शक्य नाही अथवा कठीण आहे. म्हणून आपल्या ऋषींनी ‘स्वस्तिक’ हे चिन्ह सर्वसामान्यांसाठी दिले. अगदी अशिक्षित व्यक्तीदेखील असे चिन्ह काढू शकतो. त्याचा अर्थ समजू शकतो.

हल्ली निवडणुकीच्या वेळी अशिक्षित माणूस उमेदवाराचे निवडणूक चिन्ह बघून आपले मत विनासायास स्वतःला हव्या असलेल्या व्यक्तीला देऊ शकतो. तसेच सामान्य स्त्री-पुरुष स्वस्तिकाच्या माध्यमातून कार्याचे मांगल्य इच्छितात.
स्वस्तिकाच्या रचनेमध्ये दोन रेषा आहेत- एकाच लांबीच्या.

  • उभी रेषा – ज्योतिर्लिंगाचे दर्शन – विश्‍वाच्या उत्पत्तीचे मूळ कारण.
  • आडवी रेषा – विश्‍वाचा विस्तार दाखवते.
    याचा मथितार्थ म्हणजे
  • ईश्‍वरानेच सर्व विश्‍व निर्माण केले आहे.
  • देवांनी स्वतःची सर्व शक्ती वापरून त्याचा विस्तार केला आहे.
    यामागील तत्त्वज्ञान म्हणजे
  • एकमेव व अद्वितीय ब्रह्म विश्‍वरूपात विस्तार पावते.
    ख्रिस्ती धर्मामध्ये क्रॉसच्या रूपाने त्यांच्या उपासनेत दिसते – तीच स्वस्तिकाची मूळ रचना.
    स्वस्तिकाच्या चार भुजा आहेत, त्यांनाही अर्थ आहे – भगवान विष्णूचे चार हात. त्या चारही हातांनी भगवंत चारही दिशांचे पालन करतो. भक्ताची भावना असते की भगवंताचे चारही हात त्याला साहाय्य करतात. तसेच चारही दिशा मानवाच्या कार्यक्षेत्राची कक्षा दाखवतात.
    आपण वाचतो –
    स्वस्तिकः सर्वतो भद्राः|
    स्वस्तिक म्हणजे सर्व बाजूंनी सर्वरीतीने कल्याण. यातील भाव म्हणजे सर्वोपरी कल्याण. सर्वांचे कल्याण इच्छिणे ही विशाल हृदयाची खूण आहे. सज्जनांचे ते प्रतीक आहे. त्यांची तशी भावना असते. पण असे फक्त बोलून चालणार नाही. तर त्याप्रमाणे विश्‍वकल्याणासाठी कृतीशील व्हायला हवे. तसा पुरुषार्थ करायला हवा. फक्त सद्भावना ठेवून काहीही साध्य होणार नाही.

किती भावपूर्ण, अर्थपूर्ण, ज्ञानपूर्ण आहे हे स्वस्तिकाचे प्रतीक. फक्त वाचून फायद्याचे नाही तर इतरांनाही समजावण्यासारखे आहे.
कोरोनाच्या आक्रमणावेळी असे सकारात्मक विचार ‘व्हॉट्‌सऍप’ करू या. विश्‍वकल्याण साधू या.