रुपेरी किनार

0
142

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल राज्यातील पंचायती, नगरपालिका, जिल्हा पंचायती आदींच्या जवळजवळ दोन हजार लोकप्रतिनिधींना संबोधित केले. लसीकरणापासून गृह विलगीकरणापर्यंत अनेक बाबतींमध्ये ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लोकप्रतिनिधींनी सक्रिय योगदान दिले तर सध्याची परिस्थिती कितीतरी पटींनी सुसह्य होईल हे मुख्यमंत्र्यांचे म्हणणे शंभर टक्के बरोबर आहे. ‘सरकार’ असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्यामध्ये केवळ मुख्यमंत्री किंवा आरोग्यमंत्रीच अभिप्रेत नसतात. सगळ्या गोष्टींचे ओझे त्यांनीच आपल्या डोक्यावर घेणे अपेक्षित नसते. सरकार म्हणजे ती संपूर्ण यंत्रणा असते, ज्यामध्ये वरिष्ठ नोकरशहांपासून सामान्य कर्मचार्‍यांपर्यंत आणि मंत्र्यांपासून पंचांपर्यंत सर्व घटक अंतर्भुत असतात. सरकारी यंत्रणेचे यशापयश हे ह्या सर्वांच्या सामूहिक कार्यक्षमतेचे अथवा अकार्यक्षमतेचे, कर्तेपणाचे किंवा नाकर्तेपणाचे दर्शन घडवित असते. अर्थातच त्यात सर्वात महत्त्वाची भूमिका असते ती राजकीय नेतृत्वाची. त्यामुळे सध्याच्या महामारीसारख्या अक्राळविक्राळ संकटामध्ये राजकीय नेतृत्वाने योग्य दिशा देणे आणि ह्या सर्व घटकांनी त्यानुसार आपापले सक्रिय योगदान देणे अत्यंत गरजेचे असते. सर्वांचीच ही सामूहिक जबाबदारीही ठरते आणि कर्तव्यही. आजवर यापैकी कितीजणांनी ती निभावली ह्याचा हिशेब मांडायची ही वेळ नव्हे, पण ह्या लोकप्रतिनिधींना सक्रियतेचा हा डोस किमान दोन महिन्यांपूर्वी मिळाला असता तर कदाचित आज भोवतालचे चित्र वेगळे असते.
‘वर्तमानपत्रांतून टीका करणे सोपे आहे. आमचे सरकार कुठेही कमी पडलेले नाही’ असेही मुख्यमंत्री महोदय बोलून गेले. सरकार वेळोवेळी कमी पडले म्हणूनच तर आजची ही भीषण परिस्थिती राज्यावर ओढवलेली आहे. सरकारने काहीच केलेले नाही असे आमचे म्हणणे कधीच नव्हते आणि नाही. सरकारने वेळोवेळी केलेल्या अनेक चांगल्या गोष्टींना आम्ही दादही निश्‍चित दिलेली आहे, परंतु ज्या चांगल्या गोष्टी केल्या, त्यातील असंख्य गोष्टी आधी प्रसारमाध्यमांचे आसूड बसल्यावरच घडल्या त्याची गेल्या वर्षभराची तारीखवार जंत्रीही हवी तर सादर करण्याची आमची तयारी आहे. सरकारकडून जे चांगले काम होत आले त्याचे कौतुकही आम्ही निश्‍चित करू आणि चुकत असेल तर आसूडही ओढू, कारण आमची बांधिलकी ह्या भूमीतील सर्वसामान्य जनतेशी, तिच्या सुखदुःखाशी आहे. एक पाय मुख्यमंत्र्याच्या दारात ठेवणारी किंवा छुपा अजेंडा ठेवणारी पत्रकारिता आम्ही तरी कधी केलेली नाही. आजची वेळ ही मागे काय चुका घडल्या त्यावर वेळ दवडण्यापेक्षा पुढे काय चुका होऊ नयेत हे सांगण्याची आहे असे आम्ही मानतो.
गेल्या एप्रिल महिन्यापेक्षा हा मे महिना अधिक घातक ठरलेला आहे. एप्रिल महिन्यात ३३८ बळी गेले होते. मेच्या गेल्या दहा दिवसांतच ५०७ बळी गेले आहेत. तब्बल २८ हजार २९५ रुग्ण १० दिवसांत वाढले आहेत. परंतु ह्या काळ्या ढगाला एक रुपेरी किनारही आहे. आठ मे रोजी ७०.७४ टक्क्यांपर्यंत घसरलेले रुग्ण बरे होण्याचे प्रमाण नऊ तारखेला ७१.७६ टक्के आणि काल दहा तारखेला ७२.०६ टक्के असे वाढले आहे. काही ठिकाणची सक्रिय रुग्णसंख्याही थोडीफार घटली आहे. सध्याच्या निर्बंधांचा परिणाम म्हणून येत्या आठ दिवसांत ती आणखी घटेल अशी आशा आहे. या घडीस राज्यापुढे सर्वांत मोठे आव्हान आहे ते मृत्युकांड थांबविण्याचे. उच्च न्यायालयाच्या दणक्यामुळे खाटांच्या उपलब्धतेचा तपशील आता रिअल टाइम उपलब्ध झाला आहे. केंद्र सरकार तसेच खासगी क्षेत्राच्या मदतीमुळे वैद्यकीय प्राणवायूची स्थिती बरीच आटोक्यात आली आहे. शिवाय सरकारने चाचणीसाठी येताच रोगप्रतिबंधक औषधे देण्यास सुरुवात केली आहे. खासगी इस्पितळे दीनदयाळखाली आली आहेत, ठिकठिकाणी नवी तात्पुरती इस्पितळेही उभारण्यात येत आहेत. ह्या सर्वाचा सुपरिणाम म्हणून खाटांची टंचाई कदाचित कमी होईल, रुग्णांना कोविड इस्पितळात दाखल करावे लागण्याची गरज आणि त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण घटेल आणि ही मिळालेली उसंत सार्थकी लावत सरकार सज्जता वाढवील अशी आशा आहे. पण आज सामना कोविडच्या सर्वांत घातक रूपाशी चालला आहे हेही विसरून चालणार नाही. हे नवे रूप नेमके कोणते हे सरकारने रुग्णांची जिनॉम सिक्वेन्सिंग म्हणजे जनुकीय क्रमवारी केलेली नसल्याने कळणे अवघड आहे, पण हा विषाणू महाराष्ट्र, बंगाल वा आंध्रमधून आला आहे की एखादे स्थानिक नवे रूप आहे हे कळल्याखेरीज ह्या संसर्ग आणि अत्यवस्थतेमागील वेगाची कारणे कळणारी नाहीत. सरकारने मागवलेले नवे जनुकीय अनुक्रम यंत्र येईस्तोवर पुण्याच्या राष्ट्रीय विषाणुशास्त्र प्रयोगशाळेपाशी आग्रह धरून त्याबाबत स्पष्टता मिळवावी. आपला नेमका शत्रू कोण हे कळल्याशिवाय हे मृत्युसत्र रोखणे कठीण असेल!