हृदयरोगी व रक्तदाबाच्या रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी

0
241
  • डॉ. मनाली म. पवार
    सांतइनेज- पणजी

उच्चरक्तदाबामध्ये रक्तातील आम्लता वाढते. त्यामुळे क्षारीय पदार्थ खावेत. मेथी, गाजर, केळे. सफरचंद, पेरू, पालक, वांगे यांचा जास्तीत जास्त उपयोग करावा. सर्व भाज्यांमध्ये दुधीभोपळा हा सर्वश्रेष्ठ क्षारीय आहे. त्यामुळे या हिरव्या दुधीचा सर्वांत जास्त आहारामध्ये उपयोग करावा.

कोरोना महामारीच्या या काळात सर्वांनीच स्वतःची काळजी घ्यायची आहे. सरकारच्या सामान्य नियमांबरोबरच आहार- विहाराच्या पथ्य-अपथ्य पालनांचेही आचरण करावे. निरोगी लोकांबरोबरच रक्तदाब जास्त/कमी होणारे, हृदयरोगी असणार्‍यांनी विशेष काळजी घ्यावी. आजच्या विशिष्ट जीवनशैलीमुळे घरात-बाहेर, नोकरी- धंद्यात सारखा ताण-तणाव असल्याने उच्चरक्तदाब, हृदयरोगाचे रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे घरात राहून प्रत्येक व्यक्तीने आपली काळजी घ्यायची आहे.
हृदयरोगाच्या व्यक्तींनी घ्यावयाची काळजी –

  • देशी गायीचे (गीर गायीचे) तूप खावे. याने खराब कोलेस्ट्रॉल वाढत नाही.
  • पॉलिश केलेल्या डाळी, कडधान्ये खाऊ नयेत. मोठा तांदूळ नेहमी हृदयरोग्यांना हितकर. रक्तशाली तांदूळ, साठी तांदूळ, उकडा तांदूळ हे त्यांच्यासाठी पथ्यकर भात आहेत. भात बनवताना नेहमी तांदूळ थोडे भाजून मग त्याचा भात करावा. हा भात कुकरचा नसावा. भात व्यवस्थित आठ पट पाण्यात शिजवून त्याचा भात व पेज वेगळी करावी. हा भात पचायला हलका असतो.
  • गहू, ज्वारी, नाचणी, बाजरी यांचे पीठही कोंड्यासकट खावे. पीठ बारीक व चाळणीतून चाळून घेऊ नये.
  • भाज्यांमध्ये दुधी सर्वश्रेष्ठ आहे. त्यामुळे दुधीची भाजी, दुधीचा रस, दुधीचे सूप असा कोणत्याही पद्धतीने दुधी खावा.
  • दुधी भोपळा सालासकट मिक्सरमध्ये बारीक करून रस काढावा. (साधारण १५० मिली) व त्यात चिमूटभर मिरी पावडर, तुलसी, कोथिंबीर व पदिनाच्या पानांची चटणी करून त्या रसात घालावी व रस सकाळी उपाशी पोटी घ्यावा.
  • चीज, सॉल्टेड बटर अजिबात खाऊ नये.
  • हृदयरोग्यांना अर्जुन ही वनस्पती औषधी म्हणजे वरदानच आहे. अर्जुनाची साल दुधात शिजवून सकाळी सेवन करावी. चहाऐवजी अर्जुन क्षीरपाक घ्यावा. अर्जुन घनवटी किंवा अर्जुनारिष्ट ही औषधे वैद्याच्या सल्ल्याने घ्यावीत.
  • अर्जुनाच्या सालीच्या चूर्णामध्ये मध किंवा गूळ घालूनसुद्धा कोमट पाण्याबरोबर सेवन करू शकतात.
  • कोलेस्ट्रॉल वाढले म्हणजे रक्तवह स्रोतसात अडथळा येऊन इंस्युलीन रक्तात येणे बंद होते किंवा गती कमी होते. म्हणून कोलेस्ट्रॉलची जास्त काळजी घ्यावी.
  • क्षारीय पदार्थ नियमित सेवन करावे. यात आवळा श्रेष्ठ आहे. आवळ्याचा रस, आवळा मुरब्बा, आमलक रसायन, च्यवनप्राश, आवळा चूर्ण कोणत्याही रूपाने आवळ्याचे नित्य सेवन करावे.
  • इन्स्युलीनची पातळी प्रमाणात ठेवण्यासाठी जांभळाच्या बियांचे चूर्ण, कडुनिंबाची पावडर, कारल्याच्या बियांचे चूर्ण एकत्र करून १ ते दीड चमचा रोज सकाळी- संध्याकाळ काहीही खाण्यापूर्वी १ ते दीड तास अगोदर सेवन करावे.
    सर्व फळांमध्ये किंवा इतर धान्यांमध्ये निसर्गतः साखर असते. त्यामध्ये वरून वेगळी साखर घालायची गरज नसते. जी साखर फ्रुक्टोज या स्वरूपात द्रव्यामध्ये असते, ती नैसर्गिक असते व ती साखर आपले शरीर पचवू शकते. पण केमिकलयुक्त सुक्रोज मात्र पचनास कठीण होय. म्हणून नेहमी साखर वापरायची झाल्यास त्याऐवजी गडद रंगाचा गूळ वापरावा.
  • तेलामध्ये रिफाइन्ड तेल खाऊ नये. सोयाबीन, पाम तेल, सूर्यफुलाचे तेल हृदयरोग्यांनी अजिबात खाऊ नये. घाण्यावर काढलेले खोबर्‍याचे तेल उत्तम.
  • आहारात लसूण, आले, हिंग जिरे यांसारख्या मसाल्यांचा वापर करावा. हृदयरोग्यांसाठी लसूण अगदी पथ्यकर आहे. कच्चा लसूणसुद्धा खाऊ शकता. लसणाचे लोणचे खाऊ शकता. लसूण फोडणीस्वरूपात खाऊ शकता. तसेच आलेही कोणत्याही स्वरूपात खाऊ शकता. आल्याचा रस मध मिसळून घेऊ शकता. आल्याच्या तुकड्यावर सैंधव लावून चघळू शकता.

हृदय हे एक मर्मस्थान आहे. हृदय हा अवयव व हृदयाशी संबंधित शिरा व धमनी किंवा रसरक्तवाहिन्या आणि हृदयाच्या आश्रयाने राहणारे रस, रक्त, मांस हे धातू तसेच ओज या सर्वांचेच संरक्षण करावयाचे असेल तर हृदयरोगामध्ये मनोबल वाढवणे हीच महत्त्वाची चिकित्सा ठरते.

  • मनाला कोणत्याही कारणाने आकस्मिक धक्का बसणार नाही याची काळजी घ्यावी लागते.
  • अतिचिंता, शोक, भय, क्रोध, उत्कंठा, मत्सर, लोभ असे विकार उत्पन्न होणार नाही एवढी तरी काळजी हृद्रोगात घेतलीच पाहिजे.
  • रुग्णाला तत्त्वज्ञान, आध्यात्मिक ज्ञान या गोष्टी सांगून तो सर्वदा शांत राहील असे प्रयत्न करावेत.
  • त्यामुळे हृदयरोग्याला आहार व चिकित्सा हितकर ओजोवर्धक, स्रोतसांना प्रसन्नता प्राप्त होईल अशा प्रकारची हवी.
  • उच्चरक्तदाबाचा त्रास असणार्‍या रुग्णांनी घ्यावयाची काळजी –
    अर्धा चमचा दालचिनी पावडर, अर्धा चमचा मध एकत्र करून कोमट पाण्याबरोबर सकाळी खावे.
  • रात्री १ चमचा मेथीदाणे १ ग्लास गरम पाण्यात भिजवून सकाळी ते पाणी प्यावे व मेथीदाणे कच्चे चावून खावेत.
  • अर्धा चमचा अर्जुन चूर्ण अर्धा ग्लास गरम पाण्याबरोबर खावी.
  • सकाळी लसणाच्या १-२ पाकळ्या कच्च्या खाव्यात.
  • लिंबूरस मधाबरोबर चाटण्यानेही फायदा होतो.
  • कडुनिंबाच्या पानांचा रस रोज १-२ चमचे सेवन करावा.
  • – आवळ्याचा रस, आवळ्याचा मुरब्बा, कोणत्याही स्वरूपात आवळ्याचे सेवन करावे.
    उच्चरक्तदाबामध्ये रक्तातील आम्लता वाढते. त्यामुळे क्षारीय पदार्थ खावेत. मेथी, गाजर, केळे. सफरचंद, पेरू, पालक, वांगे यांचा जास्तीत जास्त उपयोग करावा. सर्व भाज्यांमध्ये दुधीभोपळा हा सर्वश्रेष्ठ क्षारीय आहे. त्यामुळे या हिरव्या दुधीचा सर्वांत जास्त आहारामध्ये उपयोग करावा.
  • कमी रक्तदाब (लो ब्लड प्रेशर)चा त्रास असणार्‍यांनी घ्यावयाची काळजी –
  • १ ग्लास पाण्यात लिंबू, सैंधव मीठ व गूळ घालून दिवसातून दोन-तीन वेळा प्यावे.
  • डाळिंब, ऊस, संत्री, अननस अशा फळांचा रस थोडेसे सैंधव मीठ घालून प्यावा.
  • रक्तप्रवाह व्यवस्थित होण्यासाठी कच्च्या लसूण पाकळ्या सकाळी खाव्या.
  • अर्जुनाची साल दुधात शिजवून त्यात गूळ घालून ते दूध प्यावे.
    अशाप्रकारे हृदयरोगाच्या व्यक्तींनी उच्च- निम्न रक्तदाबाच्या व्यक्तींनी घरी राहून आपल्या आहार- विहारामध्ये बदल करून घरीच स्वतःची काळजी घ्यावी.आपली कोणतीच औषधे स्वतः निर्णय घेऊन बंद करू नयेत.