‘स्वयंपूर्ण गोवा’ खाली प्रत्येक पालिकेस १ कोटी

0
207

>> शुभारंभ प्रसंगी मुख्यमंत्र्यांची ग्वाही

पणजी महापालिकेसह १४ नगरपालिकांसाठी काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते ‘स्वयंपूर्ण गोवा’ या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. गोवा मुक्तीच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त केंद्राकडून राज्याला जो ३०० कोटी रु. चा निधी मिळाला आहे, त्या निधीतून वरील योजनेखाली दर एका नगरपालिकेला आपल्या क्षेत्रात विकासप्रकल्प उभा करण्यासाठी एक कोटी रु. निधी उपलब्ध होणार आहे, असे या योजनेचा शुभारंभ करताना मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

सर्व नगरपालिकांसाठी सरकारने ‘स्वयंपूर्ण मित्रां’ची नियुक्ती केलेली असून वरील निधी खर्च करून आपण आपल्या क्षेत्रात कोणता विकास करू पाहत आहोत त्याची माहितीही पालिकांना आपल्या ‘स्वयंपूर्ण मित्रां’ मार्फत गोवा सरकारला द्यावी लागेल, असे मुख्यमंत्री सावंत यांनी यावेळी सांगितले. नगरपालिकांना देण्यात येणारा निधी वापराशिवाय पडून राहू नये यासाठी पालिकांना हा निधी खर्च करून कोणता प्रकल्प उभारणार आहेत ते कळवण्यास सरकारने सांगितले आहे. आपापल्या क्षेत्रात कुठे कुठे सरकारी जमीन आहे त्यावर लक्ष ठेवावे, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी पालिकांना केली आहे.