स्वप्नपूर्तीकडे…

0
15

काल त्या सोळा मिनिटांत प्रत्येक भारतीयाने जणू श्वास रोखून धरला होता. पण तळाशी आगीचे लोळ उठले, धूराचे लोट उठले आणि बघता बघता अंतराळात अत्यंत दिमाखात एक स्वप्न झेपावले. ‘चांद्रयान – 3’चे हे उड्डाण थरारक तर होतेच, परंतु अभिमानाने ह्रदय भरून टाकणारेही होते. अर्थात, ही मोहीम पूर्ण व्हायला अद्याप चाळीस दिवसांचा अवकाश आहे, परंतु तरीही ज्या झोकात आणि सराईतपणे ‘चांद्रयान’ला घेऊन जाणारा अजस्र बाहुबली ‘फॅटबॉय’ वर झेपावला, ते दृश्य खरोखर डोळ्यांचे पारणे फेडणारे होते. बघता बघता सोनेरी किरणांत चकाकणारे ढगांचे पुंजकेच्या पुंजके पार करीत ‘चांद्रयान’ ला घेऊन चाललेले एलएमव्ही-3 एम4 दिसेनासे झाले. ‘इस्रो’च्या शिरपेचात आणखी एक यशाचा तुरा खोवला गेला. अर्थात, अशा प्रकारची अवकाशयानांची उड्डाणे ‘इस्रो’ला काही नवीन नाहीत. एकेकाळी सायकलवरून वाहून नेऊन अवकाशभरारीची स्वप्ने पाहणारी ही संस्था आणि तेथील शास्त्रज्ञ. अशी उड्डाणे हा आजवरच्या प्रदीर्घ अनुभवातून त्यांच्या डाव्या हातचा मळ बनला आहे. पण तरीही हे उड्डाण वेगळे होते, महत्त्वपूर्ण होते, कारण अवघ्या देशाच्याच नव्हेत, तर जगाच्या आशाआकांक्षा जणू त्यावर टिकलेल्या आहेत. ‘चांद्रयान – 1′ ने चंद्रावर पाणी असू शकते या शक्यतेला पालवी फोडली. बर्फाच्या मूलकणांची छायाचित्रे त्याने पृथ्वीवर पाठवली आणि पूर्वी त्या पृष्ठभागावर पाणी असावे या शक्यतेला दुजोरा दिला. दुर्दैवाने ‘चांद्रयान – 2′ नियोजनाबरहुकूम चंद्रावर प्रत्यक्ष उतरू शकले नाही, परंतु त्याच्या ऑर्बिटरनेही वरून दिसणाऱ्या चंद्राची खडान्‌‍खडा माहिती पृथ्वीवर पोहोचवण्याचे काम तत्परतेने केले. त्याचे लँडर चंद्रावर उतरवताना त्याच्या प्रॉपल्शन सिस्टममध्ये दोष निर्माण झाला आणि वेग नियंत्रित करता न आल्याने ते चंद्रावर आदळून नष्ट झाले. त्यामुळे यावेळी त्यासंदर्भात सर्वतोपरी काळजी घेण्यात आलेली असल्याने या मोहिमेच्या यशस्विततेविषयीच्या अपेक्षाही वाढलेल्या आहेत. अर्थात, त्यासाठी आपल्याला आणखी चाळीस दिवस म्हणजे 23 ऑगस्टपर्यंत वाट पाहावी लागेल. नियोजनानुसार ‘चांद्रयान – 3′ चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवता आले आणि त्यातील रोव्हरला तेथील एक दिवस म्हणजे आपले चौदा दिवस सर्व प्रयोग पार पाडता आले तर त्यातून केवळ चंद्राविषयीचीच नव्हे, तर आपल्या एकूणच ब्रह्मांडाविषयीची अनेक रहस्ये उकलू शकतात. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर हे यान उतरवले जाणार आहे. बहुतेक याने ही चंद्राच्या विषुववृत्तावर उतरवली जातात व ते तुलनेने सोपे असते. पण त्यापासून दूरवर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणे हे कठीण तर आहेच, परंतु तेथील अत्यंत प्रतिकूल भौगोलिक परिस्थिती आणि कमालीचे कमी तापमान यामुळे अतिशय आव्हानात्मक देखील आहे. आपल्या अंटार्क्टिकेवरील सर्वांत थंड भागात देखील उणे 92 अंशांपर्यंत तापमान खाली जाते. मात्र, चंद्राच्या या अतिथंड भागातील तापमान उणे 230 पर्यंत खाली गेलेले असू शकते यावरून या आव्हानाची कल्पना यावी. शिवाय तेथील डोंगर आणि खड्डे देखील काही वेळेला हजारो किलोमीटर उंचसखल स्वरूपाचे आहेत व तेथे सूर्यप्रकाशही पोहोचू शकत नाही. सूर्यप्रकाशच पोहोचू शकत नसल्याने या अतिथंड तापमानामध्ये अनेक महत्त्वाची रहस्ये दडलेली, गोठलेली असू शकतात, त्यामुळे जगभरातील शास्त्रज्ञांना त्याविषयी कुतूहल आहे. आपली पहिली ‘चांद्रयान’ मोहीम जेव्हा अवकाशात पाठवली गेली, तेव्हा त्यावरील अर्ध्याहून अधिक उपकरणे आपल्याला ‘नासा’ आणि युरोपीय अवकाश संशोधन संस्थांनी भेट दिलेली होती. यावेळी या चांद्रयानाचे बहुतेक भाग आणि उपकरणे ही स्वदेशी बनावटीची आहेत आणि खासगी क्षेत्राचाही त्यामध्ये मोठा सहभाग आहे. त्यामुळे भारतासाठी ही मोहीम हा अभिमानाचा विषय आहे. एखाद्या बिग बजेट चित्रपटापेक्षाही कमी खर्चात ही मोहीम पार पडते आहे हाही तिचा एक विशेष आहे. ‘चांद्रयान – 3′ जर यशस्वी ठरले तर केवळ वैज्ञानिकदृष्ट्याच त्याचा फायदा मिळेल असे बिल्कूल नव्हे. भारताच्या एक महासत्ता म्हणून चाललेल्या वाटचालीवर देशाच्या स्वातंत्र्याच्या या सुवर्णमहोत्सवोत्तर वर्षामध्ये शिक्कामोर्तब होईल. रशिया, अमेरिका आणि चीननंतर भारत ही मोहीम फत्ते करणारा जगातील फक्त चौथा देश ठरेल. एक नवा अध्याय सुवर्णाक्षरांनी भारत अवकाशाच्या विशाल पटावर लिहिण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे येणारे चाळीस दिवस आणि त्यातही यान प्रत्यक्ष चंद्रावर उतरत असतानाचे क्षण महत्त्वाचे असतील. पण आपल्या हजारो शास्त्रज्ञांच्या ज्या दुर्दम्य आत्मविश्वासाने चांद्रयान काल अवकाशात झेपावले ते पाहिले तर देदीप्यमान यश आता फार दूर नाही हे निश्चित!