चांद्रयान-3 चंद्राच्या दिशेने मार्गस्थ

0
5

>> यशस्वी प्रक्षेपणानंतर शास्त्रज्ञांसह भारतीयांचा जल्लोष; आता प्रतीक्षा 23 ऑगस्टची

भारताचे ‘चांद्रयान-3′ हे महत्त्वाकांक्षी यान शुक्रवारी दुपारी यशस्वीरित्या चंद्राच्या दिशेने झेपावले आणि शास्त्रज्ञांसह समस्त भारतीयांनी एकच जल्लोष केला. ‘काउंटडाऊन’ संपताच ज्वाळांचे लोट खाली सारत इस्रोच्या ‘बाहुबली रॉकेट’ म्हणजेच एलव्हीएम-3 एम4 मधून चांद्रयान-3 वेगाने आकाशाच्या दिशेने झेपावले. त्यानंतर आसमंत हादरवणाऱ्या रॉकेटच्या आवाजात टाळ्या-शिट्ट्यांसह ‘भारत माता की जय’च्या घोषणाही निनादल्या. चांद्रयान-3 अंतराळयानामध्ये लँडर, रोव्हर आणि प्रोपल्जन मॉड्यूल आहेत. सुमारे 40 दिवसांनंतर म्हणजेच 23 किंवा 24 ऑगस्ट रोजी लँडर आणि रोव्हर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरतील.

चांद्रयान-2 च्या प्रक्षेपणानंतर 3 वर्षे, 11 महिने आणि 23 दिवसांनी शुक्रवारी भारताने चांद्रयान-3 मोहीम प्रारंभ केली. आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून दुपारी 2.35 वाजता बाहुबली रॉकेटद्वारे ते अवकाशात पाठवले. 16 मिनिटांनंतर चांद्रयान-3 रॉकेटद्वारे पृथ्वीच्या कक्षेत प्रस्थापित करण्यात आले.
श्रीहरीकोटा येथे देशभरातून आलेल्या आबालवृद्धांच्या समुदायाने भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) शास्त्रज्ञांची आणि स्वदेशी तंत्रज्ञानाची कमाल ‘याची देहि याची डोळा’ अनुभवली. देशाच्या तिसऱ्या चांद्र मोहिमेचा पहिला टप्पा यशस्वीपणे सर झाला आणि ‘चांद्रयान-3′ चंद्राच्या दिशेने मार्गस्थ झाले. त्यानंतर इस्रोच्या शास्त्रज्ञांसह भारतीयांनी विजयी जल्लोष केला.

आता पुढील काही दिवसांत यानाची पृथ्वीभोवतीच्या कक्षेचा विस्तार करण्यात येईल. या प्रक्रियेतून यानाची गती वाढेल. वाढलेल्या गतीचा उपयोग करून यानाला चंद्राच्या दिशेने मार्गस्थ करण्यात येईल. चंद्राजवळ पोहोचल्यानंतर यान चंद्राभोवती दीर्घवर्तुळाकार कक्षेत सोडले जाईल. त्यानंतर दीर्घवर्तुळाकार कक्षा टप्प्याटप्प्याने कमी करून अखेर ‘चांद्रयान-3’ला चंद्राभोवती 100 किमीच्या वर्तुळाकार कक्षेत प्रस्थापित करण्यात येईल. अखेर 23-24 ऑगस्टला प्रोपल्जन मॉड्यूलपासून विलग केले जाईल आणि ‘लँडर’ चंद्रावर निश्चित केलेल्या ठिकाणाकडे टप्प्याटप्प्याने उतरण्याची प्रक्रिया पार पाडली जाईल. चांद्रयान-3 ने 40 दिवसांत 3.84 लाख किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर विक्रम लँडरच्या साहाय्याने प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या दक्षिण धुव्रावर उतरेल.