थोडासा तो लिफ्ट करा दे…

0
5

क्षणचित्रं… प्राणचित्रं…

  • प्रा. रमेश सप्रे

कुणालाही ‘लिफ्ट’ करून खऱ्या अर्थानं जीवनात वरच्या उंचावर, वरच्या पातळीवर चढवता येत नाही. स्वतःच स्वतःला ‘उचलून’ वर- आणखी वर न्यायचे असते. कोणत्याही क्षेत्रातील महापुरुषाच्या जीवनावरून हे सहज कळून येईल.

एक स्थूलदेही म्हणजे जाड्या गायक. देहासारखेच त्याचे हात नि बोटेही गुबगुबीत. पण ज्यावेळी ती बोटे पियानोच्या सूरपट्टीवरून अतिशय वेगाने फिरून जी दिव्य सुरावट साकारायची ती ऐकून सर्वजण चकित होऊन जात. या गायक-वादकाचे नाव आहे अदनान सामी. त्याचं एक अतिशय गाजलेलं गाणं म्हणजे-
‘थोडासा तो लिफ्ट करा दे… मेरे मौला लिफ्ट करा दे…’
त्याच्याकडे पाहिले की तो स्वतः उंचावर चढून जाण्यापेक्षा दुसऱ्या कुणीतरी त्याला उचलून वर नेणे (लिफ्ट करणे) आवश्यक, हे पटते. या काहीशा विनोदी गीतात बऱ्याच गोष्टी तो देवाकडे (मौलाकडे) मागतोय. उदा. ‘कार’- जर एक देऊ शकत नसल्यास चार दिल्या तरी चालतील. यातील विनोदाचा भाग सोडूया.

पण कुणालाही ‘लिफ्ट’ करून खऱ्या अर्थानं जीवनात वरच्या उंचावर, वरच्या पातळीवर चढवता येत नाही. स्वतःच स्वतःला ‘उचलून’ वर- आणखी वर न्यायचे असते. कोणत्याही क्षेत्रातील महापुरुषाच्या जीवनावरून हे सहज कळून येईल. स्वतः अतीव कष्ट करून, विविध प्रयोग करून, आपला रस्ता स्वतः तयार करून ते उंचावर जाऊन पोचले. म्हणूनच प्रगती-उन्नती यासाठी योग्य मार्ग कोणता? असा प्रश्न यक्षानं विचारल्यावर युधिष्ठिर उत्तर देतो- ‘महाजनो येन गतः स पंथः।’

  • याच संदर्भात भगवंताचं गीतेतील मार्गदर्शन अतिशय स्पष्ट आहे- ‘उद्धरेत्‌‍ आत्मन्‌‍ आत्मानम्‌‍’- स्वतःच स्वतःचा उद्धार करायला हवा. मानवाच्या इतिहासात अनेक प्रसंगांत हे तत्त्व प्रत्यक्षात उतरलेले दिसून येते. डोळ्यांसमोर आणा तो उद्दाम, उन्मत्त मगधसम्राट धनानंद आणि आर्य चाणक्य यांच्यातील प्रसंग. शेंडीची गाठ सोडून, केस मोकळे सोडून चाणक्य धनानंदाला आव्हान देतो- ‘मी स्वतः नवा राजा (चंद्रगुप्त) सामान्य माणसांतून तयार करीन आणि तुला या मगध राज्याच्या सिंहासनावरून पदच्युत करून त्या ठिकाणी या स्वकर्तृत्वानं माझ्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या राजाचा राज्याभिषेक करीन.’ त्याप्रमाणे घडले हा इतिहास आहे. येथे चाणक्याने चंद्रगुप्ताला ‘लिफ्ट’ केले नाही. चंद्रगुप्तही त्याच योग्यतेचा होता.
  • तो नेपोलियन. त्याची आई अगदी गरीब, अशिक्षित. दुसऱ्याच्या घरी मोलकरीण म्हणून काम करायची. असं सांगतात की, लहान असताना नेपोलियन नेहमी आईबरोबर बसायचा. तिच्याकडे एक जगाचा नकाशा होता. तो जमिनीवर पसरून ती त्याला नेहमी प्रेरणा द्यायची की त्यानं हे जग जिंगलं पाहिजे. पुढे नेपोलियन फ्रान्सचा सर्वेसर्वा झाला. आजूबाजूच्या देशांविरुद्ध त्यानं जणू युद्धच पुकारलं. तो पूर्णतः यशस्वी झाला नाही तरी तो एक महान राष्ट्रप्रमुख म्हणून ओळखला जातो. तो नेहमी म्हणायचा, ‘हृदयाच्या मखमली मंजुषेत (पेटीत) जिवापाड जपण्यासारखी अक्षरं म्हणजे- आ-ई!’ येथेही आईने प्रेरणा दिली. नेपोलियनने स्वतःच स्वतःला ‘लिफ्ट’ केले.
  • पाश्चात्त्य लोकांचा जीवनात यशस्वी होण्याचा दृष्टिकोन एका सरळ रेषेतील प्रगती असाच आहे. परीक्षेत गुणांची टक्केवारी वाढणे, बँक बॅलन्स वाढत जाणे, व्यवसायाच्या अनेक शाखा निघणे, क्रीडास्पर्धांत उच्चांक करत राहाणे हेच केवळ प्रगतीचे लक्षण नाहीये. हे सारे संख्यात्मक पैलू आहेत. खरी वरची पातळी गाठणे (स्वतःला लिफ्ट करणे) हे गुणात्मक आहे. यासाठी स्वतःच स्वतःची उन्नती साधायची असते.
  • ऋद्धी नि सिद्धी यांना श्रीगणेशाच्या पत्नी (शक्ती) मानले जाते. इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे, ‘ऋद्धी’ ही खरी शक्ती आहे, पण व्यवहारात आपण ‘वृद्धी’च्या मागे असतो. निरनिराळ्या बँका पैसावृद्धीच्या अनेक योजना काढत असतात. काळाच्या ओघात ही वृद्धी खरी वाढ वाटत नाही. कारण ‘वर्धमान ते ते चाले मार्ग रेक्षयाचा.’ अखंड वाढणारे, निरंतर विकसित होत जाणारे या जगात काही नाही. शिवाय अशा केवळ संख्यात्मक वाढीत सर्वांचे कल्याण असतेच असे नाही. ऋषीला (समृद्धीला) मात्र अशी लोकमंगलाची अट असते.
  • ‘थोडासा तो लिफ्ट करा दे’ या वृत्तीत काहीशी लाचारी, इतरांकडून मागणे आहे. अनेकजण स्वाभिमानी असतात. ‘तुमच्या वतीने युद्ध लढून अमेरिका तुम्हाला विजय मिळवून देईल’ असं इंग्लंडला सांगितल्यावर राष्ट्रप्रमुख चर्चिल म्हणाला, ‘ते शक्य नाही. आम्हाला शस्त्रं द्या, आमची लढाई आम्हीच लढू आणि जिंकूही!’ झाले तसेच. त्यानंतर दिव्यांगाच्या जागतिक संघटनेने चर्चिलचे हे उद्गार आपले बोधवाक्य बनवले. ‘गिव्ह अस्‌‍ द टूल्स’ (ॲण्ड वई विल्‌‍ फाइट). हे स्वावलंबन कौतुकास्पद आहे.
  • एक जगानं नोंदलेली महत्त्वाची घटना. सु. पन्नास वर्षांपूर्वी देशाच्या अनेक राज्यांत भीषण दुष्काळ पडला होता. जगातील अनेक देशांतून सर्वप्रकारच्या मदतीचा ओघ वाढू लागला. सर्व राज्यांतील लोकांनी त्या देणग्यांचा स्वीकारही केला. सोडून एक राज्य- महाराष्ट्र. येथील लोकांनी काहीही काम न करता मिळवलेला पैसा, वस्तू या स्वकमाईच्या नाहीत म्हणून त्याच्या बदल्यात काही काम मागितले. तेव्हाच महामार्गांचे बांधकाम, तलाव खणणे, खडी फोडून ठेवणे अशी अनेक कामे मोठ्या प्रमाणावर झाली. आपली ‘लिफ्ट’ या स्वाभिमानी बांधवांनी स्वतःच वर नेली.
  • न्यूटनचे हे वाक्य चिरकालीन सत्य ठरले. ‘मी इतर वैज्ञानिकांपेक्षा जास्त दूरचं पाहू शकलो, कारण मी त्यांच्या खांद्यांवर बसलो होतो.’ ही एकप्रकारची लिफ्टच होती. पण यात श्रम, कष्ट, प्रयोग स्वतःचेच होते. न्यूटनची ही केवढी कृतज्ञता!
  • एक मार्मिक कथा. एक प्रियकर-प्रेयसी प्रेयसीच्या आजोबांचा खून करून त्यांची अफाट संपत्ती पळवतात. बरेच पैसे, सोनेनाणे घेऊन वरच्या मजल्यावरच्या लिफ्टमधून ते खाली जायला निघतात, पण ती लिफ्ट थांबतच नाही. कथेचं नावच आहे- ‘द लिफ्ट दॅट वेंट डाऊन… ॲण्ड डाऊन… ॲण्ड डाऊन…’ सरतेशेवटी एकदाची ती लिफ्ट थांबते. पाताळासारख्या विचित्र लोकांत- नरकात- ती पोचते. तिथं स्वागत करायला त्यांनी मारलेले प्रेयसीचे आजोबाच असतात, ज्यांनी पापानं, भ्रष्टाचारानं संपत्ती मिळवलेली असते म्हणून ते नरकात पोचतात. हे दोघे त्याचा खून व चोरी या दोन गुन्ह्यांमुळे नरकात पोचतात. शेवटी लिफ्ट ही खाली जाण्यासाठी नसतेच. ती इतरांना वर नेते म्हणून कोणाकडे तरी ‘थोडासा तो लिफ्ट करा दे’ अशी याचना करण्यापेक्षा मीच स्वतःचा उद्धार स्वतःच करीन ही प्रतिज्ञा बरी नाही का?