पणजी महानगरपालिका क्षेत्रात स्मार्ट सिटी अंतर्गत हाती घेण्यात आलेल्या कामांचा दर्जा निकृष्ट आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत मागील दोन वर्षांपासून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे नागरिक कंटाळले आहेत. येत्या 30 मेपर्यंत सर्व कामे पूर्ण करण्याची सूचना करण्यात आली आहे, अशी माहिती महापौर रोहित मोन्सेरात यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली.
स्मार्ट सिटीची कामे त्वरित पूर्ण करावी. स्मार्ट सिटी अंतर्गत राबवण्यात कामांवर देखरेख करण्यात आयपीएससीडीएल अपयशी ठरल्याने अनेक प्रकल्पांची पूर्ण होण्याआधीच दुरवस्था झाली आहे, असा आरोप महापौर रोहित मोन्सेरात यांनी केला.
स्मार्ट सिटीच्या कामांबाबत वाढत्या तक्रारींमुळे महापौर रोहित मोन्सेरात शहरातील काही भागात फेरफटका मारून कामांची पाहणी करीत आहेत. शहरातील काही भागातून चालत गेलात, तर पेव्हर आधीच तुटलेले असल्याचे पाहायला मिळतात. आपण स्मार्ट सिटीच्या कामांवर देखरेख ठेवताना स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांना कधी पाहिले नाही, असेही महापौर म्हणाले.
स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी दर 10 किंवा 15 दिवसांनी सर्वेक्षण करून कामांचा आढावा घ्यायला हवा होता. स्मार्ट सिटीच्या अधिकारी, अभियंत्यांनी सुरू असलेल्या प्रकल्पाच्या कामांकडे दुर्लक्ष केल्याने सुमार दर्जाची कामे करण्यात आली आहेत. शहरातील 18 जून हा रस्ता स्मार्ट सिटीच्या कामाचा भाग असायला हवा होता; पण सदर 18 जून रस्ता कामातून वगळण्यात आला आहे. या रस्त्यावर अनेक ठिकाणी खोदकाम करण्यात आल्याने महानगरपालिका प्रशासनाला या रस्त्याची पूर्ण पाहणी करून आवश्यक दुरुस्ती करावी लागणार आहे. पावसाळ्यात पाण्याचा निचरा होण्यासाठी गटार व्यवस्था चांगली असण्याची गरज आहे. नागरिकांच्या तक्रारींचा महानगरपालिका प्रशासनाला पाठपुरावा करावा लागत आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांना समस्या सोडवण्यास भाग पाडले जात आहे. पावसाळ्यापूर्वी सर्व कामे पूर्ण करण्याची गरज आहे, असेही मोन्सेरात यांनी सांगितले.