स्तन्यजननश्रेष्ठ शतावरी

0
11
  • डॉ. मनाली महेश पवार

आईला गर्भिणी अवस्थेपासूनच एका मैत्रिणीची गरज असते; ती मैत्रीण म्हणजे ‘शतावरी’ औषधी वनस्पती. ही मैत्रीण स्त्रीला तिच्या सगळ्या अवस्था टप्प्यांमध्ये साथ देते, म्हणजेच शारीरिक, मानसिक व बौद्धिक वाढीसाठी हितकारक असते.

बालक जन्माला आले की लगेच आहाराची अपेक्षा करते व रडायला लागते. बालकाचा पहिला आहार म्हणजे आईचे दूध. जन्मानंतर लगेच अर्ध्या तासात आईने बालकाला दूध पाजायचे असते. बाळाला छातीशी धरल्यावर लगेचच बाळाच्या स्पर्शाने आईला पान्हा फुटतो. पण हे लगेचच चीक दूध येण्यासाठी आईला गर्भिणी अवस्थेपासूनच एका मैत्रिणीची गरज असते, ती मैत्रीण म्हणजे ‘शतावरी’ औषधी वनस्पती.
ही मैत्रीण ‘शतावरी’ स्त्रीला तिच्या सगळ्या अवस्था टप्प्यांमध्ये साथ देते, म्हणजेच शारीरिक, मानसिक व बौद्धिक वाढीसाठी हितकारक असते. त्याचबरोबर पुरुषांसाठीही रसायन म्हणून उपयुक्त आहे.
मुलगा असो वा मुलगी, क्षीराद, क्षीरान्नाद व अन्नाद या अवस्था सर्वांच्याच असतात. बालकावस्था संपली की साधारण तीन वर्षांच्या पुढे मुलीची कुमारी अवस्था सुरू होते. धातू परिपोष न झाल्याने शरीर कोमल असते. ह्या काळात बोअर्नव्हिटा, कॉम्पलेनसारखी प्रोटिन्स आहार न देता शतावरी दुधातून रसायन म्हणून देता येते.

हळूहळू ही कुमारीच तारुण्याकडे झुकू लागते. या अवस्थेला ‘किशोरी’ अवस्था म्हणतात. या अवस्थेत स्तन उभारू लागतात, उंची वाढते, नितंबभाग विस्तृत होऊ लागतो. योनीभागी लोमकूप दिसू लागतात. योनीभागही विस्तृत होऊ लागतो. यानंतर बारा ते तेरा या वयात देशानुसार, काळानुसार, प्रकृतीनुसार तिला रजोदर्शन होते. मुलीचा रुसवा-फुगवा, हट्ट इत्यादी प्रकारचा मानसिक हट्ट चालू होतो. या काळातही शतावरीसिद्ध दूध किंवा शतावरी घृत मुलींना द्यावे. शतावरीसिद्ध घृताने मुलींना नस्यही देता येते, म्हणजे भविष्यात ‘पीसीओडी’सारखे आजार बळावणार नाहीत.
बाला, कुमारी, किशोरी, नंतर प्रौढावस्था. एकोणीस वर्षानंतर नऊ वर्षांपर्यंत म्हणजे अठ्ठावीस वर्षांपर्यत तिला प्रौढा म्हटलेले आहे. हा काळच गर्भधारणेसाठी व प्रसूतीसाठी योग्य म्हटलेला आहे. स्त्री-जीवनातील ही गर्भावस्था व प्रसूतावस्था म्हणजेच स्त्रिचा पुनर्जन्मच होय. ह्या काळात शतावरी ही अशी एकमेव वनस्पती आहे जी पूर्ण गर्भिणी अवस्थेपासून पुढे सूतिकावस्थेमध्ये जवळ-जवळ दोन ते तीन वर्षांपर्यंत सेवन करू शकते. आपल्याला ‘स्त्री’ म्हणून याच अवस्थेला विचार करायचा आहे. दीप्ताग्निता, बुद्धिविपुलता, विज्ञानशक्ती, उत्साह, बल या सर्व दृष्टिकोनातून स्त्रीच्या आयुष्यातील हा महत्त्वाचा काळ आहे. या काळातच सर्वोत्तम ऊर्जेची गरज भासते, ती ऊर्जाही शतावरी रसायन देते.
पन्नाशीनंतरचा काळ म्हणजे रजोनिवृत्तीचा काळ. आजकाल ही रोजनिवृत्ती चाळिशीतच सुरू होते. म्हणून प्रत्येक स्त्रीने यावर खोल विचार करावा व पुढे येणाऱ्या पिढीचा पाया भक्कम करण्यासाठी ह्या शतावरीबद्दल आयुर्वेद तज्ज्ञांकडून जाणून, प्रत्येक अवस्थेमध्ये याचा उपयोग करावा.
रजोनिवृत्तीच्या काळात म्हणजेच वृद्धावस्थेत वाताधिक्य जाणवू लागते. वाताचे अनेक विकार डोकं वर काढू लागतात. धातूंचा क्षय होऊ लागतो. शक्ती कमी होऊ लागते. केस पिकतात. चेहऱ्यावर व अंगावर सुरकुत्या येऊ लागतात. सतत काही ना काही तक्रारी चालू असतात. अशा अवस्थेतसुद्धा शतावरी हेच औषध आहे.

शतावरी
शतावरी ही शामूली, वृष्या, नारायणी, स्वादुरसा, लघुपर्णिका, शतपत्रिका, अतिरसा अशा नावांनी ओळखली जाते. ही एक पर्णहीन, काटेरी, बहुवार्षिक आरोहिणी वेल आहे. खोडावर वाढणाऱ्या लांब व मोठ्या फांद्यांना अनेक पेरं असतात. या प्रत्येक पेरावर लहान, हिरव्या, एकाआड एक उपफांद्या असतात. या फांद्यांना ‘पर्णकांडे’ म्हणतात. या पर्णकांड्या पानांप्रमाणे भासतात. फांद्यांवर साधारणपणे 1 सें.मी. लांबीचे बाकदार काटे असून ते खालच्या बाजूस वाकलेले असतात. ही पाने 2 ते 6 च्या संख्येच्या गुच्छात उगवणारी 2 ते 3 सें.मी.पर्यंत लांब असतात. शतावरी आधारास गुंडाळून घेते व वर चढते आणि अनेक फांद्या तयार होऊन लहान काटेरी झुडूप तयार होते.

झाडाची मुळे जाड, लांबट गोल असून दोन्ही टोकांकडे निमुळती असतात. यांनाच कंद असे म्हणतात. कंद पांढरे असतात व ते एका झाडाला 100 पर्यंत असू शकतात. यामुळेच या वनस्पतीला शतावरी असे म्हणतात. मुळांचा औषधांमध्ये प्रमुख उपयोग होतो.
शतावरी ही मधुर, तिक्त रसात्मक आहे. गुणाने गुरू, स्निग्ध व मृदू आहे.

  • स्तन्यजनन म्हणून शतावरी हे श्रेष्ठद्रव्य आहे.
  • जीर्ण अम्लपित्त (ॲसिडिटी), रक्ती मूळव्याध, परिणामथूल व अन्नद्रवशुलात शतावरीसिद्ध दूध किंवा तूप द्यावे.
  • उन्माद, अपस्मार, ज्ञानग्रहणसामर्थ्य हानी व स्मृतिऱ्हासात शतावरीसिद्ध दूध, घृत किंवा शतावरी कल्प द्यावा.
  • शामक आणि बल्य असल्याने वातव्याधी आणि वातपित्तात शिरोरोगात शतावरी सिद्ध तेल अभ्यंगासाठी वापरावे.
  • विस्फोट विकारामध्ये पानांचा लेप लावतात.
  • ॲसिडिटीमध्ये शतावरीकल्काच्या चौपट घृत व त्याच्या चौपट दूध घेऊन सिद्ध केलेले तूप वापरावे.
  • जेवल्यावर पोटात सतत दुखत असल्यास शतावरीसिद्ध दूध किंवा घृत सतत द्यावे.
  • पित्तज गुल्मात दाह आणि वेदना नाहीशा करण्यासाठी शतावरीचा रस मधासह सकाळी द्यावा किंवा शतावरीसिद्ध जल गुळासोबत दिल्याने वेदना कमी होतात.
  • ताज्या शतावरीचा रस सौम्य मलावष्टंभामध्ये अनुलोमक आहे. पण शतावरीसिद्ध दूध घेतल्यास रक्तातिसारमध्ये उपयुक्त ठरते, तसेच व्रण भरून येण्यासही मदत होते. अल्सरमध्ये शनावरीसिद्ध तूप देऊन रुग्णास दुधावर ठेवल्यास लवकर बरे वाटते.
  • संडासानंतर किंवा पूर्वी रक्त पडण्याची वृत्ती असल्यास शतावरीघृत वारंवार चाटावे.
  • शतावरीमध्ये हार्मोन्स संतुलित करण्याची क्षमता आहे. मासिकपाळीच्या काळात किंवा रजोनिवृत्ती काळात हार्मोनल असंतुलनामध्ये हे औषध ‘जादू’पेक्षा कमी नाही.
  • रसधातूचे स्निग्धादी गुणांनी बृहण व तिक्तरसाने रसाग्निदीपन झाल्याने शतावरी रसधातूच्या उपधातूस्वरूप असलेल्या स्तन्याचे पोषण करते. यासाठी शतावरीचे रससिद्ध दूध किंवा कल्प पूर्ण गर्भावस्थेत वापरावे. जनावरांमध्येदेखील दुधाचे प्रमाण वाढविण्यासाठी शतावरी देतात.
  • शतावरी वाढलेला रक्तभार कमी करीत असल्याने रक्तभारवृद्धीमुळे उत्पन्न झालेल्या हृदरोगजन्य शोथात शतावरीचा वापर करावा. शतावरीसिद्ध दुधाने रसधातूचे मूलस्थान असलेल्या हृदयाचे पोषणही करते.
  • शतावरी रक्तवाहिन्यांमधील भिंतीतील मांसादी धातूंचे पोषण करून रक्तपित्ताचे शमन करतात. शतावरीचा काढा किंवा स्वरस अधोगरक्तपित्तात उपयुक्त आहेत.
  • मज्जा धातूचे बृहण व तर्पण झाल्याने शतावरी मेध्य आहे.
  • शुक्र व ओजःक्षयामुळे ज्ञानग्रहणसामर्थ्य कमी होते किंवा विस्मृती ही लक्षणे दिसतात. यामध्ये शनावटीचा वापर करावा. ओजःक्षयामुळे मनोविकृती होऊन निर्माण होणाऱ्या उन्माद, अपस्मारादी मनोविकारात शतावरीसिद्ध घृत, दूध किंवा शतावरीकल्प वापरावा. अपस्मारात रसायन पद्धतीने म्हणजे प्रथम स्नेहस्वेदपूर्वक शरीर शोधन करून शतावरी स्वरस दुधातून दिल्यास शरीरमानस दोषांचे शमन होऊन मनोदौर्बल्य नष्ट होते.
  • धातुक्षयजन्य वातव्याधीमध्ये शतावरीसिद्ध तेल पोटात घ्यावे.
  • शतावरी शुक्रवृद्धीकर आहे. शतावरीमुळे शुक्रे व शुक्रोत्पादनास उपयुक्त इतर धातूंची पुष्टी झाल्याने रुग्ण बलवान व पुष्ट होतो. वाजीकरण योग म्हणून शतावरीसिद्ध घृत साखर, पिंपळी आणि मधाबरोबर सेवन करावे.
  • गर्भाशयपोषण होऊन गर्भाशयस्य मांस व रक्तधातूंचे बल वाढते. गर्भस्राव- पात नष्ट होतात.
  • तिक्तरसाने धात्वाग्निदीपन व मधुरादी इतर गुणांनी धातूंचे बृहण करीत असल्याने शतावरीचा रसायन म्हणून चांगला उपयोग होतो. विशेषकरून रस, मांस आणि शुक्रवृद्धीसाठी शतावरी चूर्ण तूप व मधाबरोबर चाटवल्यास बलमांस वृद्धी होऊन व्याधिप्रतिकारशक्ती वाढते व वयःस्थापन म्हणूनही उपयोग होतो.
  • स्तन्यवृद्धीसाठी शतावरीच्या मुळ्या दुधात वाटून द्याव्या.
  • दाहावर शतावटीचा काढा दूध आणि मध घालून द्यावा.
  • ज्वरावर शतावरीच्या मुळांचा रस व गाईचे दूध एकत्र करून त्यात जिऱ्याची पूड घालून ते मिश्रण द्यावे.
  • धातुपुष्टतेसाठी शतावरीचूर्ण 10 ग्रॅम प्रमाणात रोज दुधातून घ्यावे.
  • ऑसिडिटीवर 25 ग्रॅम शतावरी घृत घ्यावे.