स्तनपानाच्या प्रगतीचे पाऊल ‘शिकवूया आणि आधार देऊया’

0
30
  • – डॉ. मनाली महेश पवार

गेल्या आठवड्यात आपण स्तन्यपान कधी करावे व कसे करावे याबद्दल माहिती जाणून घेतली. या लेखात आपण स्तन्यपानाचे महत्त्व, त्याबद्दल समज-गैरसमज, स्तन्यपानाबद्दल शिकवण, आधार देणे का महत्त्वाचे याबद्दल थोडे जाणून घेऊ…

स्तन्यपानाविषयी जागरुकता आणण्यासाठी जास्तीत जास्त जन्म देणार्‍या मातांना स्तन्यपानाकरिता प्रवृत्त करण्यासाठी, स्तन्यपानाची महती सगळ्यांना सांगण्याकरिता, स्तन्यपानाचे प्रबोधन करण्यासाठी जगभरात ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा हा ‘जागतिक स्तन्यपान आठवडा’ म्हणून साजरा केला गेला. गेल्या आठवड्यात आपण स्तन्यपान कधी करावे व कसे करावे याबद्दल माहिती जाणून घेतली. या लेखात आपण स्तन्यपानाचे महत्त्व, त्याबद्दल समज-गैरसमज, स्तन्यपानाबद्दल शिकवण, आधार देणे का महत्त्वाचे याबद्दल थोडे जाणून घेऊ…
स्तन्यपानाबद्दल काही समज व गैरसमज
स्तन्यपान हे आई व बाळ या दोघांच्याही दृष्टीने आवश्यक आहे. बाळाच्या व आईच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. बाळाला जन्मानंतर जेवढ्या लवकर व जितक्या अधिक वेळा स्तन्यपान केले जाते तेवढे बाळाच्या वाढीसाठी व आरोग्यासाठी चांगले असते, म्हणूनच प्रत्येक गर्भिणीने व सूतिकेने याविषयी अधिक माहिती घेणे, त्याबद्दल शिक्षण घेणे महत्त्वाचे असते. जेवढा प्रसूतीकाळ कठीण असतो त्यापेक्षाही जास्त प्रसूतीनंतर स्तन्यपानाचा काळ होय.

आजकाल काहीसा लग्नाचा काळ हा उशिरा असल्याने मुलाचाही विचार थोडासा उशिराच होतो. त्यातही दोघेही नवरा-बायको नोकरदार, व्यवसाय करणारे असल्याने सतत ताण-तणावांतून जात असतात. बर्‍याच महिलांना वाढत्या वजनाचे टेंशन असते. आधुनिक जीवनपद्धती व पाश्‍चात्त्य आहारपद्धती या सगळ्याचा परिणाम स्तन्यउत्पत्तीवर होत असतो. त्यातही स्तन्य पाजल्यास स्तनांचा आकार बेढब होतो किंवा सौंदर्यामध्ये बाधा येते असा काहीसा काहींचा गैरसमज असतो, तर काही महिला स्तन्यपान करण्यासाठी उत्सुक असतात. योग्य ज्ञान नसल्याने त्यांना वाटते दूध कमी येते, दूध बाळाला पुरत नाही म्हणून या माता डबाबंद दूध पाजायला सुरुवात करतात. खरंतर हाच गैरसमज सूतिकेचा दूर करायचा असतो. अशावेळी घरच्या इतर मंडळीच्या आधाराची गरज असते, तशीच सूतिकागृहातील नर्स, मावशी यांच्याही सहकार्याची गरज असते. तसेच डॉक्टरांच्या मार्गदर्शनाची तर अत्यंत गरज असते. पण नेमके या काळात उलटेच होते. प्रसूतीनंतर हार्मोन्सच्या असमतोलपणामुळे प्रसूता काहीशी गडबडलेली असते. त्यातही जर तिचे सी-सॅक्शन झालेले असेल, जे आताच्या काळात मोठ्या प्रमाणात होते, अशा अवस्थेत प्रसूता काहीशी चीडचीड झालेली असते. काहींना वेदना सहन होत नाही. काहींना झोप न झाल्यामुळे त्रास होत असतो. अशा अवस्थेत बाळाला मातेच्या उराशी धरायचे, बाळाला स्तन्यपानासाठी आधार द्यायचा हे घरच्या मंडळींचे, सोबत असणार्‍या सहकारिणीचे काम असते. नर्स किंवा मावशीनेही सूतिकेला या कार्यासाठी मदत करावी.
पण अशा काळात बाळ रडते, त्याला भूकच लागली असेल, आत्ताच प्रसूत झालीस लगेच कसे दूध येईल… अशा अनेक गैरसमजाने बाळाला आईकडे न देता डब्याचे दूध पाजले जाते.
स्तन्यपानासाठी चिकाटी, धीर, निरीक्षण व कष्ट करायची तयारी पाहिजे व त्यासाठी गरोदरपणीच ही सगळी माहिती करून घ्यायला हवी.

सिझेरियननंतर तिला विश्रांतीची गरज आहे, तिला सलाईन चालू आहे, तिला उठता येत नाही, ती थकली आहे, तिने काही खाल्ले नाही, तिला औषधे चालू आहेत, तिला बसता येत नाही, तिला अजून दूध आले नाही, अशा अनेक गैरसमजांमुळे साधारण पहिले तीन दिवस तरी प्रसूतिगृहात स्तन्यपानाला मदत करण्याची कुणी उत्सुकता दाखवत नाहीत. प्रसूतीनंतर काही वेळातच बाळाला डबाबंद पावडरीचे दूध चालू करण्यात येते. चौथ्या दिवशी जेव्हा तिला थोडे बरे वाटते आणि ती दूध पाजायला जाते तेव्हा स्तन घट्ट झालेले असतात व बाळाला नीट पकडता येत नाही. बाळ दूध प्यायला नकार देते किंवा जोरात ओढल्याने स्तनाग्रांना जखम होते व ते आईसाठी वेदनामय असते. अशा रीतीने बर्‍याच वेळा केवळ गैरसमजुतीने आई बाळाला दूध द्यायला उत्सुक असूनही पुरेसा इतरांचा आधार न मिळाल्याने स्तन्यपान करता येत नाही व हळूहळू आईचे दूध कमी होते.

प्रसूतीपूर्व आईला कसा आधार द्याल?

  • गरोदरपणातच स्तन्यपानाबाबत प्रसूतीपूर्व चर्चासत्र ठेवून भर्गिणीला, तिच्या नवर्‍याला व सासू किंवा आई ज्या प्रसूतीनंतर तिच्यासोबत राहतील तिला, चर्चासत्रात भाग घ्यायला प्रवृत्त करावे.
  • स्तन्यपानामुळे बाळ व आईला होणारे फायदे पटवून द्यावे.
  • स्तन्यपानाची पूर्वतयारी करावी.
  • एका तासाच्या आत स्तन्यपानाची सुरुवात, आई व बाळाच्या त्वचेला होणारा परस्पर स्पर्श व त्यामधून निर्माण होणारे अतूट नाते.
  • सुरुवातीच्या काळात येणार्‍या पिवळसर चिकदुधाचे महत्त्व.
  • डबाबंद दुधाचे परिणाम.
  • बाळाला भूक लागली कसे ओळखावे.
  • आपले दूध बाळाला पुरेसे आहे हे कसे ओळखावे.
  • कमी वजनाच्या बाळाला आईचे दूध मिळण्यासाठीचे प्रयत्न इत्यादी अनेक गोष्टींवर चर्चासत्रे ठरावीत.
  • प्रसूती झाल्यानंतर नातेवाईकांना आत बोलावून स्तन्यपान कसे व किती वेळा द्यायचे हे समजावून सांगणे महत्त्वाचे आहे.
    स्तन्यपान नैसर्गिक जरी असले तरी ती एक कला आहे, जी शिकावी लागते, आत्मसात करावी लागते. मार्गदर्शनासाठी स्तनपानतज्ज्ञांची मदत घ्यावी.
    भारतामध्ये सध्याची परिस्थिती अशी की, पाचमधील तीन मुलांना एका तासाच्या आत स्तन्यपान मिळत नाही. दोनपैकी एका आईस सहा महिने निव्वळ स्तन्यपान देणे शक्य होत नाही. पुरेसे स्तन्यपान न दिल्याने मुले व मातांचे आजारपण, मृत्यू व इतर अनुषंगिक हानी होत आहे.

स्तन्यपानाचे फायदे

  • स्तन्यपान म्हणजे बाळासाठी अमृतपान. आईचे दूध हे बाळासाठी पूर्ण आहार होय. सदृढ आरोग्यासाठी स्तन्यपानच आवश्यक होय.
  • आईचे दूध मुलांकरिता सहज पचण्याजोगे असते.
  • स्तन्यपान म्हणजे कुठलाही खर्च न होता सहज उपलब्ध होते.
  • बाळाचा अस्थमा आणि कानाचे इन्फेक्शनपासून दूर ठेवते. कारण स्तन्यपानाने बाळाच्या कानात व घशात संरक्षण आवरण तयार होते.
  • आईच्या दुधाने बाळाला कोणतीच ऍलर्जी होत नाही.
  • बाळाची बुद्धिमत्ता उत्तम बनते.
  • रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
  • आईशी शारीरिक व भावनिक नाळ जुळून चांगले नाते तयार होते.
  • बाळाच्या मेंदूचा योग्य रीतीने विकास होतो.

आईसाठी फायदे

  • अशक्तपणा कमी होतो.
  • स्तन आणि अंडाशयाच्या कर्करोगापासून रक्षण होते.
  • लठ्ठपणा प्रतिबंधित करते.
  • शरीर सुडौल ठेवते.

एकूण शारीरिक व बौद्धिक विकासात महत्त्वाची भूमिका दूध बजावत असते. त्यामुळे स्तन्यपान हा सुदृढ आयुष्याचा पाया आहे.
सुरुवातीचा काळ हा बहुतेकअंशी कठीण असतोच. खूपजणांनी नवजात बाळ हातातसुद्धा कधी धरलेले नसते. स्तनाग्र चपटे आहेत, बाळ रडते, तुझे दूध पुरत नाही असे अनेक शेरे नातेवाईक मारतात, त्यामुळे तिचा आत्मविश्‍वास डळमळायला लागतो आणि वरचे दूध बाळाला चालू होते.

  • बाटलीने दूध घेताना स्तनपानाला लागतात तसे बाळाला कष्ट करावे लागत नाहीत, त्यामुळे बाळ स्तन नाकारते.
  • वरचे दूध हे पचायला जड असते, त्यामुळे ते तीनचार तास झोपते. आईचे दूध पचायला हलके असल्यामुळे एक-दीड तासात बाळ परत दूध मागते. पण याचा अर्थ आईच्या दुधाने बाळाचे पोट भरत नाही असा होत नाही. खरे तर आईने बाळाला भूक लागली की लगेच पाजावे. मग ते अर्ध्या तासाने असो वा दोन-तीन तासांनी.
    तसेच बर्‍याच स्त्रिया आज नोकरदार असतात. त्यामुळे नोकरीवर तीन महिन्यांनी जावे लागल्यास आपले दूध काढून फ्रिजमध्ये ठेवावे. साधारण आठ तास फ्रीजमध्ये व्यवस्थित राहते व दूध पाजायच्या प्रत्येक वेळी दुधाची वाटी गरम पाण्याच्या भांड्यात ठेवावी व हे दूध वाटी-चमच्याने बाळाला पाजायला सांगावे.
    स्तन्यपान हे अमृतपान आहे, त्यामुळे चला, होऊ घातलेल्या बाळाच्या मातांना शिकवूया व आधार देऊया…