दीपदर्शन

0
27
  • डॉ. सीताकांत घाणेकर

(योगसाधना- ५६३)

या काळातही दिव्याला, त्याच्या ज्योतीला खास महत्त्व आहे. माणसाने दिव्यापासून ही प्रेरणा घेण्यासारखी आहे की ‘मी प्रकाशित होईन व दुसर्‍यांनाही प्रकाशित करीन.’ स्वतःला जाळून जगाला प्रकाश देण्याची प्रेरणा दिवा आपल्याला देतो.

आजचे युग ‘विज्ञान युग’ म्हणून ओळखले जाते. कारण सर्व विश्‍वभर विज्ञानाने विविध क्षेत्रांत नेत्रदीपक प्रगती केली आहे. विद्युतशक्तीचे आविष्कार तर विचारायलाच नको. दरदिवशी नवे-नवे शोध जगासमोर येताहेत. हे सर्व दृश्य बघितले की मानवाच्या उच्च बुद्धीचे कौतुक वाटते. त्याचबरोबर हा सर्व झगमगाट समोर असताना शिकलेली माणसे जेव्हा छोटासा दिवा पेटवतात व त्याला नमस्कार करतात, तेव्हा त्यांची ती कृती हास्यास्पद वाटते. अनेक तथाकथित सुशिक्षित व्यक्ती त्यांची मस्करी व टीकाही करतात. अशा या लोकांचे मत आहे की, आता मानवाने एका छोट्याशा दिव्याची, पणतीची लाचारी करायची काहीदेखील गरज नाही.
विश्‍वात परिवर्तन अवश्य होणार व व्हायला हवे, त्याबद्दल दुमत नाही. पण आपल्या पूर्वजांचा भाव समजणेही आवश्यक आहे. ज्यावेळी पूर्वीच्या काळी विजेचा शोध लागला नव्हता त्यावेळी हा लहानसा दिवाच प्रकाश देत असे. त्याची अत्यंत गरज भासत असे. कारण दिवा नसेल तर प्रकाश नाही व प्रकाश नाही तर कसलेही काम होणे अशक्य आहे. त्यामुळे दिव्याचे महत्त्व सर्वांना माहीत होते. त्या दिव्याची योग्य प्रार्थना करून स्थिर राहण्याची विनंती करण्यात येत असे.

आज सुशिक्षित विद्वानांनी हा भाव समजून वृद्धिंगत करणे गरजेचे आहे की आपले पूर्वज अत्यंत बुद्धिमान होते. जीवनाचा सर्व पैलूंनी ते अभ्यास करीत. त्यावर मनन-चिंतन करून त्याप्रमाणे कृती करत. त्यामुळे एक ‘कृतज्ञता’ भाव ठेवून त्यांनी दीपदर्शनाला प्राधान्य दिले. म्हणूनच आजच्या विद्युतशक्तीच्या युगातदेखील तुपाच्या दीपज्योतीला नमस्कार करण्याची अत्यंत गरज आहे.
या कलियुगात चौफेर नजर फिरवली तर एक गोष्ट सहज लक्षात येते, ती म्हणजे, विश्‍वातील अनेक व्यक्ती स्वार्थी व आत्मकेंद्री झाल्या आहेत. याचे मूळ कारण म्हणजे समाजातील एक अत्यंत महत्त्वाचा गुण- कृतज्ञता- कमी झाला आहे, लोप पावत आहे. त्यामुळे कुटुंबात, समाजात, विश्‍वात घटस्फोट, तंटे-बखेडे, लढाया वाढत आहेत. मुले आपल्या मातापित्यांबरोबर न राहता वेगळे राहतात. अनेकवेळा आईबापाला वृद्धाश्रमात ठेवतात.
भारतीय संस्कृतीचा मूळ गाभा आहे- ‘कृतज्ञता’- मातापित्यांबद्दल, संस्कृती, देश, भगवंताबद्दल… पण संस्कार नसल्यामुळे अथवा कमी झाल्यामुळे हा गुण नष्ट होत आहे.
आपल्या पूर्वजांनी अशा विषयांवर सखोल अभ्यास करून कर्मकांडांतून असे गुण नैसर्गिकरीत्या चालू ठेवण्याचा व वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न केला. म्हणून प्रत्येक कर्मकांडाबद्दल जे उच्च तत्त्वज्ञान आहे ते जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. दीपज्योती प्रज्वलन ही प्रथा यातील एक प्रमुख- अगदी छोटी, सहज पालन होण्यासारखी.
पूजनीय पांडुरंगशास्त्री यासंदर्भात सांगतात-
‘‘आपल्या पूर्वजांनी दीपदर्शनाला प्राधान्य दिले. त्यामागे खूप सखोल जाणीव व कृतज्ञभावना साठलेली आहे. विद्युतशक्तीच्या या युगातही तुपाचा दिवा पेटवून त्याला नमस्कार करण्याची वेगळीच गरज आहे.

तुपाचा दिवा अंधकाराच्या तेजाचे वर्तुळ निर्माण करतो, तर विजेच्या दिव्याच्या प्रकाशाचे दर्शन होताच डोळे दिपावणार्‍या उजेडाचे प्रदर्शन अधिक दिसते.

तुपाचा दिवा स्वतःच्या मंदमंद जळणार्‍या ज्योतीने मानवाला आत्मज्योतीची कल्पना देतो. त्याला शांत बनवून अंतर्मुख करतो, तर विजेच्या दिव्याचा झगमगाट बाह्य विश्‍वाला प्रकाशित करून मानवाला बहिर्मुख बनवून अशांततेचे कारण बनतो.’’
वीज चांगलीच आहे. अत्यावश्यकही आहे. कारण अनेक आयुधे त्याच्यावर चालतात, ज्यांची दररोजच्या जीवनात गरज आहे. पण एक विजेचा बल्ब दुसरा बल्ब पेटवू शकत नाही. कितीही शक्तीचा व तेजस्वी असला तरी! शिवाय व्होल्टेजमध्ये काही गडबड झाली तर त्याचा प्रकाश कमी होतो. केव्हा केव्हा तर तो ‘जळतो’ही- म्हणजे त्याची आतील वायर जळते व त्याचे अस्तित्व संपते. तसेच त्याला जो विद्युतप्रवाह मिळतो तो फार दुरून आलेला असतो. त्या सर्व यंत्रात अथवा ट्रान्समीटर वाहिन्यांमध्ये बिघाड झाला तर सगळीकडे अंधार पसरतो. पण
ज्योतीचा दिवा दुसरा दिवा पेटवू शकतो. समईतील अनेक वाती पेटवू शकतो.
या विषयावर शास्त्रीजी उद्बोधक विचार सांगतात-
‘‘या काळातही दिव्याला, त्याच्या ज्योतीला खास महत्त्व आहे. माणसाने दिव्यापासून ही प्रेरणा घेण्यासारखी आहे की ‘मी प्रकाशित होईन व दुसर्‍यांनाही प्रकाशित करीन.’ स्वतःला जाळून जगाला प्रकाश देण्याची प्रेरणा दिवा आपल्याला देतो.
माणसानेही जगातील अंधार हटविण्यासाठी, अज्ञान दूर करण्यासाठी तसेच दैवीविचारांचा प्रकाश पसरविण्यासाठी अखंड जळत राहिले पाहिजे, अशी जीवनदीक्षा दीपक आपल्याला देतो. सतत तेवणार्‍या दिव्यामागे ‘माणसाने प्रभूकार्यासाठी अखंड जळत राहिले पाहिजे’ अशी सूचना आहे.
मंदिराच्या गाभार्‍यात प्रकाश पसरवून, सतत तेवत राहणारा दिवा आपल्याला प्रभुदर्शन घडवतो, त्याचप्रमाणे अंधकारात जगणार्‍या लोकांना ईश्‍वराभिमुख करण्यासाठी समजदार माणसाने अखंड जळत राहिले पाहिजे.

इतिहासाकडे चौफेर नजर फिरवली तर अनेक क्षेत्रांत अशा थोर आदर्श व्यक्तींचे दर्शन घडते. साहित्य, संस्कार, देशप्रेम, अध्यात्म यांत वावरणार्‍या व्यक्ती खरेच प्रातःस्मरणीय आहेत. या सर्वांमध्ये साहित्यिक, संत, राजे-महाराजे, सद्गुरू… अनेक आहेत.
बालपणी घरची मोठी माणसं आम्हाला एक छान गोष्ट सांगत असत. एक दिवस म्हणे सूर्यदेवाने अस्ताला जाता-जाता जगाला विचारले, ‘‘मी आता काही वेळ या ठिकाणी अस्ताला जाणार. उद्या सकाळी मी येईपर्यंत सर्व विश्‍वात अंधकार पसरणार. तर या वेळात प्रकाश कोण देणार?’’
सत्ताधीश म्हणाले, ‘‘आम्ही आमच्या कामात एवढे गुंतलो आहोत की आम्हाला हे काम करण्यासाठी वेळ नाही. तसेच आमचा फायदा काय?’’
धनवान म्हणाले, ‘‘आम्हाला आमचे धन जमवण्याची स्पर्धा करू देत. हे काम केले तर आम्हाला धन कोण देणार?’’
विद्वान पंडित म्हणाले, ‘‘आम्ही स्वतःच्या कामामध्ये एवढे गुंतलेले आहोत की आम्हाला ते शक्य नाही.’’
कौटुंबिक व्यक्ती म्हणाल्या, ‘‘आमचा संसार करता करता आम्ही थकतो व रात्री झोपून जातो. हे काम कसे करणार?’’
पण त्याचवेळी अंधकारातून एक आवाज आला- ‘‘भगवान सूर्यनारायणाचे काम ते परत येईपर्यंत मी करीन.’’
सर्वांनी बघितले तर एक छोटीशी पणती अगदी आत्मविश्‍वासाने बोलत होती. खरेच, स्वतःचे अस्तित्व संपवून त्या पणतीने विश्‍वाला प्रकाश दिला. अशा पणतीला शतशः प्रणाम!
आज सर्व विश्‍वात अशा ज्ञानाचा प्रकाश देणारे अनेक तथाकथित छोटे लोक आहेत. कारण मोठ्यांना वेळच नाही. इतरांसाठी, संस्कृतीसाठी, देशासाठी, विश्‍वासाठी भगवंत सगळ्याची नोंद ठेवतो. आपले योगसाधक मात्र पणतीचे