सौरभला रशिया ओपनचे जेतेपद

0
76

भारतीय शटलर सौरभ वर्माने संघर्षपूर्ण अंतिम सामन्यात जपानच्या कोकी वाटांबेवर मात करीत रशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेचे अजिंक्यपद प्राप्त केले. भारताराचा माजी राष्ट्रीय जेता असलेल्या सौरभने अंतिम फेरीत कोकीचे आव्हान १९-२१, २१-१२, २१-१७ अशा ३ गेम्समध्ये मोडित काढत हे यश मिळविले. पहिल्या सेटमध्ये प्रारंभी कोकीने ११-५ अशी मजबूत आघाडी मिळविली होती. परंतु सौरभने दमदार उभारी मारत कोकीला बरेच थकविले.

परंतु कोकीने हा गेम १९-२१ असा जिंकत १-० अशी आघाडी घेतली. एका गेमच्या पिछाडीनंतर दुसर्‍या गेममध्ये सौरभने दमदार पुनरागम केले व हा गेम २१-१२ असा खिशात टाकत आपले आव्हान जिवंत राखताना १-१ अशी बरोबरी साधली. तिसर्‍या व निर्णाय गेममध्ये कोकीने पुन्हा एकदा आपली लय मिळविताना सौरभला जोरदार टक्कर देत एकवेळ १७-१७ अशी बरोबरी साधली होती. परंतु त्यानंतर सौरभने जोरदार मुसंडी मारत सलग चार गुणांची कमाई करीत जेतेपदावर शिक्कामोर्तब केला.

दरम्यान, मिश्र दुहेरीत भारताच्या रोहन कपूर व कुहू गर्ग या द्वितीय मानांकित जोडीला अंतिम सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागल्याने उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. व्लादीमिर इवानोन (रशिया) आणि मिन कियुंग किम यांनी रोहन-कुहूला १९-२१, १७-२१ असे नमवित जेतेपद मिळविले.