सोहळ्यामध्ये चुकीच्या चित्रपटाची झाली घोषणा

0
106

>> ‘मूनलाईट’ ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे ऑस्कर

 

ऑस्करसारख्या जागतिक चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च सन्मानाच्या सोहळ्यामध्ये काल सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून चक्क चुकीच्या चित्रपटाची घोषणा झाली! यंदाचा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सन्मान ‘मूनलाईट’ या चित्रपटास देण्याऐवजी निवेदकाच्या हाती चुकीचा लिफाफा आल्याने ‘ला ला लँड’ या चित्रपटाचे नाव अनवधानाने पुकारण्यात आले. या घोषणेनंतर त्या चित्रपटाचे निर्माते व कलाकार मंचावर धावले. त्यांनी आभाराचे भाषणही केले. मात्र, तेवढ्यात झालेली गंभीर चूक लक्षात येताच त्या चित्रपटाच्या निर्मात्यांनी ‘मूनलाईट’ च्या संचाला मंचावर बोलावून खेळकरपणा दाखवत ऑस्करची बाहुली त्यांच्या हवाली केली. जगभरात सुमारे दोनशे देशांमध्ये या सोहळ्याचे प्रसारण सुरू होते, त्यामुळे जगभरातील कोट्यवधी प्रेक्षकांना ही गफलत प्रत्यक्ष घडताना पाहावी लागली. वॉरन बेटी यांनी सर्वोत्कृष्ट चित्रपटाची घोषणा करण्यासाठी आपल्याजवळील लखोटा उघडला. मात्र, त्यातील नाव वाचून ते थोडेसे गोंधळले. काही क्षण उसंत घेत त्यांनी आपल्या सहनिवेदिकेकडे पाहिले. मात्र, सहनिवेदिका डनअवे यांची समजूत झाली की ते या शेवटच्या घोषणेची उत्कंठा वाढवीत आहेत. बेटी यांनी डनअवे यांच्या हाती लखोटा सोपविला आणि त्याचा तपशील न बघता त्यांनी ‘ला ला लँड’ची घोषणा करून
टाकली! या सोहळ्यात आधीच सहा पुरस्कार जिंकलेल्या ‘ला ला लँड’ चित्रपटाच्या संचाने जल्लोष करीत मंचावर धाव घेतली. निर्माते जॉर्डन होरोवित्झ व मार्क प्लॅट यांनी आपली आभाराची भाषणेही केली. मात्र, अचानक मंचावर गोंधळ दिसून आला. कानाला हेडसेट लावलेली एक व्यक्ती मंचावरील विविध व्यक्तींशी काही बोलताना दिसून आली. काही क्षणांत या प्रकाराचा उलगडा झाला. शेवटी निर्माते जॉर्डन होरोवित्झ यांनीच आयोजकांनी केलेल्या चुकीची उपस्थितांना माहिती देत खिलाडूवृत्तीने ‘मूनलाईट’च्या चमूला मंचावर निमंत्रित केले व ऑस्करची बाहुली त्यांच्या हाती सोपवली. या प्रकाराने दिग्‌मूढ झालेल्या प्रेक्षकांपुढे त्यांनी आपल्या हातातील लखोटा दाखवला तेव्हा प्रेक्षकांनाही झाला प्रकार कळून
चुकला.