सोपटे-शिरोडकर-शहांच्या पुतळ्याचे ‘आप’तर्फे दहन

0
177
माडेल येथे पुतळ्याचे दहन करताना आपचे कार्यकर्ते.

मडगाव (न. प्र.)
आम आदमी पक्षाच्या कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांनी माडेल येथे आपल्या कार्यालयासमोर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, शिरोड्याचे आमदार सुभाष शिरोडकर व मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे यांनी कॉंग्रेसच्या आमदारकीचा राजिनामा देऊन भाजपमध्ये गेल्याच्या निषेधार्थ तिघांचे पुतळे करून जाळले व नंतर निषेध मोर्चा काढला.
आम आदमी पक्षाचे पदाधिकारी ऍड. रोडनी आल्मेदा यांनी आजच्या राजकारणी उड्या मारीत असल्याबद्दल निषेध केला. ते म्हणाले की, याची सुरूवात गोवा फॉरवर्डने केली. निवडणुकीच्यावेळी भाजपवर टीका करणार्‍या गोवा फॉरवर्डने भाजपला पाठिंबा देऊन लोकशाहीचा खून केला व जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला. त्यानंतर विश्‍वजित राणे यांनी कॉंग्रेस सोडली व आता या दोघा आमदारांनी जनतेचा विश्‍वासघात केला. गेले दीड वर्षे सरकार इस्पितळामध्ये झोपले असून या आमदारांना लोकांची चिंता नाही. न पेक्षा आमदारकीचा राजिनामा देऊन ते महामंडळाच्या आशेने गेले नसते असा आरोप यावेळी आल्मेदा यांनी केला.
आज जनतेला या प्रतिनिधींना निवडून दिल्याबद्दल पश्‍चात्ताप झाला आहे. आज सरकारी कचेरीत लोकांची कामे होत नाहीत. त्याला जबाबदार हे प्रतिनिधी असल्याचे आल्मेदा यांनी सांगितले.