सोपटेंना पोटनिवडणुकीत धडा शिकवा

0
119

पेडणे (न. प्र.)
मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे यांना मतदारांनी निवडून दिले होते. मात्र त्यांनी आमदारकीचा राजीनामा देत बहुजन समाजाला पिळणार्‍या भाजपमध्ये प्रवेश करत मतदारांचा विश्‍वासघात केला आहे. त्यामुळे येत्या सहा महिन्यात होणार्‍या विधानसभा पोटनिवडणुकीत मांद्रे मतदारसंघातील जनतेने त्यांना धडा शिकवावा असे आवाहन कुळ मुंडकार संघटनेने केले आहे. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत या घटनेचा संघटना निषेध करत असल्याचे त्यांनी सांगितले. पेडणे येथे घेतलेल्या कुळ मुंडकार संघटना पेडणे आणि बार्देश कुळ मुंडकार संघटना यांच्या वतीने घेतलेल्या पत्रकार परिषदेला पेडणे संघटनेचे अध्यक्ष डॅनिएल डिसोझा, पेडणे भंडारी समाजाचे अध्यक्ष उमेश तळवणेकर, बार्देश संघटनेचे अध्यक्ष संजय बर्डे, संघटक दिपेश नाईक, सदस्य गोपिचंद आपुले व समीर पेडणेकर उपस्थित होते.
तळवणेकर म्हणाले की, सोपटे हे बहुजन समाजाचे नेते म्हणून आम्ही त्यांच्याकडे पहात होतो. मात्र त्यांनी बहुजनाची अवहेलना करणार्‍या भाजपची कास धरुन समस्त बहुजन समाजाची घोर निराशा केली. त्यांना मांद्रेतील मतदार पोटनिवडणुकीत योग्य ते जागा दाखवतील. कॉंग्रेस आमदाराना फोडून आपल्या पक्षात नेणे हे भाजपचे मोठे षड्‌यंत्र असल्याचा त्यांनी आरोप केला.
संजय बर्डे यांनी, येत्या पोटनिवडणुकीत सोपटे यांचा आम्ही पराभव करू असे सांगितले. दीपेश नाईक यांनी हे सरकार अस्थिर असून आमदार फोडाफोड करणार्‍या व जनतेची निराशा करणार्‍या या सरकाराला बरखास्त करण्याची मागणी केली.
डॅनिअल डिसोझा यांनी दयानंद सोपटे यांनी स्वतःच्या फायद्यासाठी कॉंग्रेस पक्ष सोडल्याची टीका करत त्यांनी सोपटे यांनी आमची घोर निराशा केल्याचे सांगितले.
मांद्रेत दयानंद सोपटे यांच्या
पुतळ्याचे कॉंग्रेसकडून दहन
माजी आमदार दयानंद सोपटे यांच्या प्रतिमेचे दहन करून मांद्रे मतदारसंघातील काही निवडक कार्यकर्त्यांनी सोपटे यांच्या भाजप प्रवेशाचा तीव्र निषेध केला.
चोपडे सर्कलजवळ झालेल्या या निषेध कार्यक्रमाला प्रदेश कॉंग्रेस उपाध्यक्ष बाबी बागकर, पेडण्याचे माजी आमदार जितेंद्र देशप्रभू, उत्तर गोवा कॉंग्रेस अध्यक्ष विजय भिके, कार्यकारिणी सदस्य नारायण रेडकर, हरमलचे माजी सरपंच डॅनियल डिसोझा, अनिल बर्डे, पार्सेचे माजी सरपंच प्रदीप देसाई, रामनाथ बगळी, दिगंबर मसुरकर, सदानंद वायंगणकर, सुधीर कान्नाईक आदी उपस्थित होते.
यावेळी श्री सोपटे यांचा निषेध करताना श्री. देशप्रभू म्हणाले की, अशा या पक्षबदलू प्रवृत्तींचा नाश करून गोव्याचे राजकारण शुद्ध करण्याची गरज आहे.
श्री. बागकर यांनी, अशा लोकांमुळे पक्ष बदनाम होत असल्याचे सांगितले. विजय भिके यांनी, मांद्रेवासीयांनी येत्या निवडणुकीत सोपटे यांचा पराभव करण्याचे आवाहन केले. यावेळी नारायण रेडकर, अनिल बर्डे, सुधीर कान्नाईक, डॅनियल डिसोझा यांनीही सोपटे यांचा निषेध केला. त्यानंतर सोपटे यांची प्रतिमा जाळण्यात आली.