सोनाली फोगट यांच्या मृत्यूमागे घातपात

0
43

गोव्यात चित्रीकरणासाठी आलेल्या अभिनेत्री तथा भाजप नेत्या सोनाली संजय फोगट सिंग (४३, रा. हिस्सार, हरियाणा) यांचा वागातोर-हणजूण येथे मंगळवारी सकाळी हॉटेलमध्ये गूढ मृत्यू झाला. हा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा प्राथमिक कयास असला तरी, कुटुंबीयांनी घातपाताचा संशय व्यक्त करत सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.

सोनाली एका चित्रीकरणासाठी २२ ऑगस्ट रोजी दुपारी गोव्यात दाखल झाल्या होत्या. त्यांच्यासोबत त्यांचे खासगी सचिव सुधीर सांगवान व सुधीर पाल हे दोघेही वागातोरमधील एका हॉटेलमध्ये उतरले होते. काल बुधवारी २४ ऑगस्ट रोजी त्यांचे चित्रीकरण होणार होते. मंगळवारी त्यांचे अन्य सहकारी गोव्यात दाखल होणार होते. मात्र, तत्पूर्वी म्हणजे मंगळवारी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास सोनाली ह्या खोलीमध्ये बेशुद्धावस्थेत असल्याचे एका सहकार्‍याला आढळून आले. हॉटेल व्यवस्थापनाने त्यांना तत्काळ हणजूण येथील खासगी इस्पितळात दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
सोनाली आपल्या दोन सहकार्‍यांसह सोमवारी रात्री हणजूणमधील एका नाइट क्लबमध्ये गेल्या होत्या. मंगळवारी सकाळी ७.३० वा बेशुद्धावस्थेत आढळल्या होत्या.

घातपाताचा संशय
सोनाली यांची मोठी बहीण रेमन आणि धाकटी बहीण रुपेश यांनी सोनाली यांच्या मृत्यूमागे घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. सोमवारी रात्री सोनाली हिने आम्हाला फोन केला होता. ती काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे, असे नेहमी वाटायचे. सोनाली बोलताना तणावाखाली होती. याबाबत तिच्याशी बोलले असता तिने मी हिस्सारला परत येईन आणि सर्व काही सांगेन असे सांगून फोन ठेवून दिल्याची माहिती बहिणींनी दिली.

तपास सीबीआयकडे सोपवा
सोनाली फोगट यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालेले नसून त्यांचा खून करण्यात आल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी काल केला. सोनाली फोगट यांचे बंधू रिंकू यांनी काल गोव्यात आल्यानंतर पत्रकारांशी बोलताना आपल्या बहिणीचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालेले नसून तिचा खून करण्यात आल्याचा आरोप केला. तसेच तपासकाम सीबीआयकडे सोपवण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. तिच्याबरोबर गोव्यात आलेल्या एका व्यक्तीनेच तिचा खून केल्याचा आरोप करीत आपण याबाबत हणजूण पोलिसांत तक्रार नोंदवली असल्याचे ते म्हणाले. मृत्यूपूर्वी आपल्या बहिणीने दूरध्वनीवरून आपणाशी संपर्क साधला होता. जेवण झाल्यानंतर आपणाला अचानक खूप त्रास व्हायला लागला. आपल्या हाता-पायांना कंप सुटला. छाती धडधडायला लागली. अन्नातून आपणाला विष देण्यात आले असावे असा संशय तिने आपणाशी बोलताना व्यक्त केला होता. आपण पोलिसात केलेल्या तक्रारीत याची माहिती दिली आहे. मात्र, पोलिसांनी अद्याप संशयितांना अटक केली नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. तपासकाम सीबीआयकडे सोपवण्यात यावे, अशी मागणी करतानाच गोव्यात करण्यात आलेल्या शवचिकित्सेवर आमचा विश्‍वास नसून दिल्लीतील एम्समध्ये एकदा शवचिकित्सा केले जावे, अशी मागणीही सोनाली फोगट यांच्या कुटुंबीयांनी केली आहे.

दोघांना अटक
सोनाली फोगट यांना झालेल्या संशयास्पद मृत्युप्रकरणी पोलिसांनी सोनाली यांच्या दोघा सहकार्‍यांना अटक केली आहे. खुनाच्या संशयावरून त्यांना अटक करण्यात आली असल्याचे पोलीस सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

तपासकाम योग्य पद्धतीने करा ः गिरीश चोडणकर

गोवा प्रदेश कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी काल यासंबंधी बोलताना सोनाली फोगट यांच्या मृत्यूचे तपासकाम योग्य पद्धतीने केले जावे, अशी मागणी केली. शवचिकित्सा केलेल्या गोमेकॉतील डॉक्टरांवर दबाव आणण्याचे प्रयत्न केले जाऊ नयेत, अशी मागणीही चोडणकर यांनी केली आहे.

हृदयविकाराने मृत्यू ः मुख्यमंत्री

भाजप नेत्या सोनाली फोगट यांचा मृत्यू हा हृदयविकाराच्या झटक्याने झाला असल्याचे हाती आलेल्या प्रथमदर्शनी वैद्यकीय अहवालावरून दिसून आले असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल स्पष्ट केले. मात्र, त्याचबरोबर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्यासाठी आणखी थोडी वाट पहावी लागणार असल्याचे त्यांनी पुढे सांगितले. या मृत्युप्रकरणी सर्व बाजूंनी तपास केला जात असून राज्याचे पोलीस महासंचालक स्वतः या तपासकामावर देखरेख ठेवून असल्याचे ते म्हणाले. शवचिकित्सा अहवाल आपल्या हाती येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. मात्र, डॉक्टर तसेच डीजीपी यांच्याकडे असलेल्या प्रथमदर्शनी माहितीनुसार फोगट यांचा हृदयविकारानेच मृत्यू झाला असल्याचे स्पष्ट झाले असल्याचे सावंत म्हणाले.

तिच्या कुटुंबीयांच्या तिचा मृत्यू हा हृदयविकाराच्या धक्क्याने झाला आहे यावर विश्‍वास नाही. त्यांना काल काही तरी काळेबेरे असल्याचा संशय आहे असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. कुटुंबीयांना या प्रकरणी तपासकाम सीबीआयकडे सोपवलेले हवे आहे. फोगट यांनी बहिणीला मृत्यूपूर्वी मोबाईलवरून कॉल केला होता. आपणाविरुद्ध काहीतरी संशयास्पद असे चालू आहे असे तिने तिला सांगितले होते. नंतर संपर्क तुटला. असे बहिणींचे म्हणणे असल्याचे