सोनसड्यावरील सांडपाण्यावर प्रक्रिया करणार : विश्वजीत राणे

0
10

>> आलेक्स रेजिनाल्ड यांची लक्षवेधी सूचना

सोनसड्यावरील कचऱ्यातून निघणारे घाण पाणी रस्त्यावर येऊ नये म्हणून आवश्यक उपाय योजना केली जात आहे. सदर घाण पाणी एका टाकीमध्ये एकत्र करून त्यावर प्रक्रिया केली जाणार आहे, अशी माहिती नगरविकास मंत्री विश्वजित राणे यांनी लक्षवेधी सूचनेला दिलेल्या लेखी उत्तरात दिली.

कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी सोनसड्यावरील कचऱ्यातून निघणाऱ्या घाण पाण्यामुळे प्रदूषण होण्याची शक्यता असल्याने या घाण पाण्यावर वेळीच उपाययोजना करण्याची मागणी राज्य विधानसभेत एका लक्षवेधी सूचनेद्वारे काल केली होती.
मडगाव नगरपालिका क्षेत्रातील कचऱ्याची विल्हेवाट सोनसडो येथे लावण्यात येत आहे. याठिकाणी गेली कित्येक वर्षे पडून असलेला कचरा विभक्त करून त्याची विल्हेवाट लावली जात आहे. तसेच, नगरपालिका क्षेत्रातील कचऱ्यावर प्रक्रिया केली जात आहे. या ठिकाणी कचरा मोठ्या प्रमाणात साचल्याने त्यातून घाण पाणी बाहेर निघू लागले आहे. सदर घाण पाणी रस्ता आणि शेत जमिनीत घुसून प्रदूषण, आरोग्य समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे, असे रेजिनाल्ड यांनी सांगितले.

मडगाव नगरपालिका प्रशासन कचरा विल्हेवाटीबाबत गंभीर नाही. त्यामुळे सोनसडो येथे पुन्हा एकदा गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता आमदार विजय सरदेसाई यांनी व्यक्त केली. आगामी पावसाळ्यापूर्वी त्या ठिकाणाकडे गंभीरपणे लक्ष न दिल्यास पावसाळ्यात संपूर्ण कचरा खाली येण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे आमदार सरदेसाई यांनी सांगितले.
गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळाकडून कचरा विल्हेवाटीसाठी प्रयत्न सुरू आहेत. न्यायालयाच्या देखरेखीखाली कचरा विल्हेवाटीचे काम सुरू आहे. सोनसडो येथील कचरा समस्या दूर करण्याबाबत गंभीरपणे लक्ष दिले जात आहे. कचऱ्यातून येणारे पाणी टाक्यांमध्ये साठवून ठेवण्यासाठी उपाय हाती घेण्यात आला आहे, असे मंत्री राणे यांनी सांगितले.