सॉरी…!

0
145

॥ बायोस्कोप ॥

  • प्रा. रमेश सप्रे

संकल्प करायचा सकाळी उठल्यावर – आज कमीत कमी वेळा सॉरी म्हणणार. त्यासाठी इतरांच्या भावनांचा आधी विचार करणार. – ही प्रार्थना – हा संकल्प हृदयाच्या तळापासून मात्र यायला हवेत.

शाळेतलं नेहमीचं दृश्य. काहीतरी खोडी करायची. कुणाला ढकलायचं, कुणाला मारायचं नि म्हणायचं ‘सॉरी’. कधी कधी अतिरेक झाल्यामुळे या दोन अक्षरी तशा निरुपद्रवी वाटणार्‍या शब्दाचा वैताग येतो.
एक प्रसंग. मधली सुट्टी असल्याने शाळेच्या जिन्यांवरून, व्हरांड्यातून दुतर्फा वाहतूक चालू होती. मैदानावर तर मुक्त रहदारी होती. म्हणजे कुणीही कोणत्याही दिशेनं पळत होता. खालच्या वर्गातली मुलं गोल गोल भिंगोर्‍या म्हणत स्वतःभोवती रिंगणाकृती फिरत होती. अशावेळी एकाचा हात दुसर्‍याच्या गालावर जोरात आपटला. तक्रार गेली शारीरिक शिक्षणाच्या अध्यापकाकडे.

‘सर, याने मला सर्वांच्या देखत थोबाडीत मारली’- सुजय गालाला हात लावून काहीसा रडवेला होत बोलत होता. यावर अजयचं उत्तर मासलेवाईक होतं. ‘सर, मी हात पसरून गोल गोल फिरत होतो. तेव्हा माझ्या हातांच्या मार्गात याचा गाल आला. मी तरी काय करणार?’ अजयचा खोडकर स्वभाव सर्वांना माहीत होता. त्याच्यावर विश्‍वास ठेवणं कठीण होतं. ‘आता काय करायचं?’ या सरांच्या प्रश्‍नावर अजय एकदम म्हणाला, ‘सॉरी सर!’ ‘सॉरी सरांना कशाला म्हणतोस?’ या सरांच्या प्रश्‍नावर अजय पुन्हा म्हणाला, ‘सॉरी सुजय’. या शव्दांनी सुजयचे हुंदके कमी झाले. पण सरांनी संधी साधून उपस्थित सर्वांना प्रश्‍न विचारला- ‘नुसतं ‘सॉरी’ म्हणणं पुरेसं आहे?’- नंतर शांतपणे म्हणाले, ‘यू शुड नॉट से ‘सॉरी’ यू शुड फील ‘सॉरी’!
आपणही किती नकळत यांत्रिकपणे ‘सॉरी’ म्हणून जातो. त्याला साजेसा चुकीबद्दल झालेल्या पश्‍चात्तापाचा भाव नको का आपल्या चेहर्‍यावर दिसायला? ‘त्याच त्याच पद्धतीनं सॉरी काय म्हणता? जरा ओरिजिनॅलिटी दाखवा!’
मुलं कशी वस्ताद! ‘सॉऽऽऽरी मिस!’ किंवा ‘मिस सॉऽऽऽरी!’
प्रतिक्षिप्त क्रिया. (रिफ्लेक्स ऍक्शन) म्हणून एक गोष्ट असते. गाडी जर आपल्या दिशेनं वेगात येत असेल तर क्षणार्धात तिच्या मार्गातून दूर होणे. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी मेंदूपासून आज्ञा यायच्यापूर्वी पाठीच्या कण्याच्या मधून जाणारी मज्जारज्जू (स्पायनल कॉर्ड) तो निर्णय घेते. शरीरालाही सुखरूप ठेवते. मेंदूलाही त्याच्या निर्णय घेण्याच्या कामातून थोडी विश्रांती मिळते.

पण सॉरी म्हणणं ही सावध प्रतिक्रिया होण्याऐवजी भोंगळ, केवळ शारीरिक क्रिया बनून जाते. इथं खरं तर शिक्षकांना संधी आहे चांगला संस्कार घडवण्याची. पण त्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये आणि शाळेत वर्गात किंवा वर्गाच्या बाहेर घडणार्‍या अशा विविध प्रसंगात मनापासून सहभागी (इन्व्हॉल्व्ह) होणे. असो.

किती जणांना सॉरी या शब्दाचं कूळ नि मूळ माहीत आहे?
इंग्रजीतला सर्वांना माहीत असलेला शब्द आहे ‘सॉरी’. याचा अर्थ दुःख स्वतःला नि इतरांना दिलेल्या दुःखाचा – विशेषतः मानसिक दुःखाचा -भाव सॉरी शब्दात उतरला पाहिजे. तो काही रुक्ष, रुखासूखा उद्गार नाहीये.
एक गंमतीदार प्रसंग. चार मित्र. संतांच्या रचना ज्या भावगीतं, भक्तिगीतं म्हणून गाजलेल्या होत्या त्या म्हणत गाडीतून जात होते. नाथांची रचना एकानं म्हणायला सुरुवात केली. रात्र काळी – घागर काळी…
सार्‍यांनी त्याला साथ दिली. तिक्यात ‘ठो ऽऽ’ कन् आवाज झाला. माणुसकी म्हणून गाडी थांबवून त्याला उठवलं. दहावीस लोक जमले. त्याच्या स्कूटरच्या मागे बांधलेली मोठी पिशवी रस्त्यावर पडली नि त्यातून पाच- सहा निरनिराळ्या आकारांच्या घागरी रस्त्यावर पसरल्या. वास्तविक ते काका तोल जाऊन पडले होते. आमच्यापैकी एक जण सौजन्यपूर्ण स्वरात म्हणाला, ‘सॉरी काका.’ यावर उसळून ते म्हणाले, ‘काका मामा काही नाही. खून करायचा आणि सॉरी म्हणायचं. चला पोलिसांत. बोलवून पंचनामा करू या’. खरं तर एकाही घागरीची प्लास्टिक पिशवीसुद्धा फाटली नव्हती. जमलेले लोक म्हणाले, ‘तुम्ही चला. तुमचा काहीही संबंध नाही.’ गाडीत बसण्यापूर्वी पुन्हा एकदा काकांचे शब्द ऐकू आले, ‘खून करता आणि सॉरी म्हणता?’
तसं पाहीलं तर त्या उद्गारात थोडं तत्थ्य होतं.

  • शाळेचे परीक्षेते पेपर्स लीक करायचे नि पकडलं गेल्यावर सॉरी म्हणायचं?
  • आधीच्या परीक्षेत दोन विषयात नापास तर यावेळी चार विषयात नापास होण्याची कर्तबगारी दाखवणार्‍या या मुलानं फक्त म्हणायचं – ‘सॉरी पप्पा, सॉरी मम्मी’.
  • कॉलनीत क्रिकेट खेळताना तिथं राहणार्‍यांच्या घराच्या महागड्या काचा फोडून फक्त सॉरी म्हणायचं नि लगेच निर्लज्जपणे खेळायला सुरुवात करायची?
  • निष्काळजीपणे उपचार केल्यामुळे रुग्ण मेल्यावर डॉक्टरांनी केवळ सॉरी म्हणायचं?
  • सगळ्यांच्या देखत एखाद्या गरीब मुलाचं रॅगिंग करायचं, चेष्टा करायची नि त्याच्या मनावर परिणाम झाल्याने तक्रार करायला त्याच्या पालकांना प्राचार्यांसमोर ‘सॉरी’ म्हणायचं? बस्?
    असे असंख्य प्रकार दैनंदिन जीवनात नित्य घडत असतात. ‘सॉरी’ची त्सुनामी कधी ओसरतच नाही. यावर उपाय?
  • दुसर्‍याच्या भावनांची कदर करणं.
  • त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा आदर करणं.
  • एक प्रयोग जो संस्कारशिबिरात केला जातो, जो प्रत्येकानं रोज करायला हरकत नाही…
  • प्रार्थना करायची रात्री झोपताना – आजच्यापेक्षा उद्या खूप कमी वेळा सॉरी म्हणावं लागू दे.
    संकल्प करायचा सकाळी उठल्यावर – आज कमीत कमी वेळा सॉरी म्हणणार. त्यासाठी इतरांच्या भावनांचा आधी विचार करणार. – ही प्रार्थना – हा संकल्प हृदयाच्या तळापासून मात्र यायला हवेत.