गोमेकॉतील प्राणवायू साठा रुग्णांपर्यंत पोहोचत नाही

0
158

>> मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा दावा, कोविड वॉर्डास भेट

गोमेकॉमध्ये प्राणवायू सिलिंडरचा पुरवठा पुरेसा आहे, फक्त कोविड विभागात सिलिंडर उपलब्ध करून देण्यास विलंब होतो, असा दावा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना केला. गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि इस्पितळातील (गोमेकॉ) कोरोना विभागातील रुग्णांना दरदिवशी मध्यरात्री प्राणवायूच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. प्राणवायू पुरवठ्याच्या वाढत्या तक्रारीनंतर मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी पीपीई कीट घालून कोविड विभागास भेट दिली. गोमेकॉतील प्राणवायू पुरवठ्यातील त्रुटीचे मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष दर्शन घेतले.

या विभागातील डॉक्टर, नर्स, रुग्णांचे नातेवाईक यांच्याकडून समस्या जाणून घेतल्या. रात्रीच्या वेळी प्राणवायू सिलिंडर संपला तर नवीन सिलिंडर मिळविण्यास उशीर होतो, ही बाब मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या नजरेस रुग्णांच्या नातेवाइकांनी आणून दिली.

यापुढे प्राणवायूची समस्या नसेल
गोमेकॉमध्ये प्राणवायूचा पुरेसा साठा आहे मात्र तोरुग्णांपर्यत पोहोचण्यास विलंब होतो. गोमेकॉत प्राणवायूच्या अभावी एकाही रुग्णाचा मृत्यू खपवून घेतला जाणार नाही. विभागातील सिलिंडर पुरवठ्याच्या समस्येवर त्वरित तोडगा काढण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यापुढे या विभागात प्राणवायू सिलिंडरची कमतरता भासणार नाही. सिलिंडर पुरवठ्याची जबाबदारी निश्‍चित केली जाणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
गोमेकॉमध्ये मध्यवर्ती पाईप लाइनमधून करण्यात येणार्‍या प्राणवायू पुरवठ्यामध्ये काही वेळा समस्या निर्माण होत आहे. सदर प्राणवायू पुरवठा हाताळणार्‍या कंत्राटदाराला योग्य निर्देश देण्यात आला आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्यातील जी खासगी इस्पितळे दीनदयाळ स्वास्थ्य सेवा योजनेखाली कोरोना रुग्णांवर उपचार करण्यास नकार देतात. त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करा, त्यावर योग्य कारवाई केली जाणार आहे. खासगी इस्पितळांना पंधरा दिवसांत बिलाची रक्कम देण्यात येईल, असे कळविले आहे. कोरोना महामारीच्या काळात सहकार्य न करणार्‍या खासगी इस्पितळांच्या व्यवस्थापनांना कडक कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिला.

गोमेकॉला रोज ६०० प्राणवायू सिलिंडर देणार ः मुख्यमंत्री
सरकारकडून गोमेकॉला दरदिवशी ६०० प्राणवायू सिलिंडर उपलब्ध करून दिले जाणार आहे. तसेच येत्या आठ ते दहा दिवसात गोमेकॉच्या आवारात नवीन २० हजार लीटर क्षमतेची प्राणवायू टाकी बसविण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोमेकॉमधील प्राणवायूच्या समस्येवर आयोजित बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना काल दिली. वॉर्डात प्राणवायू सिलिंडर नेण्यासाठी कर्मचार्‍यांची कमतरता दूर करण्याची सूचना करण्यात आली आहे. प्राणवायू सिलिंडरच्या ट्रॉली वाहून नेण्यासाठी वाहन चालक व इतरांची नियुक्ती करण्याची सूचना करण्यात आली आहे. मल्टी स्टाफचा वापर रुग्णांना सिलिंडर मिळवून देण्यासाठी करण्याची सूचना करण्यात आली आहे. तसेच प्राणवायू पुरवठा करणार्‍या कंपनीला प्राणवायू सिलिंडर चढउतार करण्यासाठी कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्याची सूचना करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिली.
तसेच, गोमेकॉतील प्राणवायूची आवश्यकता असलेल्या काही रूग्णांना सुपर स्पेशालिटी ब्लॉकमध्ये हलविण्याची सूचना करण्यात आली आहे. ज्या रुग्णांना प्राणवायूची आवश्यकता नाही. तसेच काही रुग्णांना दोन तीन दिवसांत डिस्चार्ज दिला जाणार आहे, त्यांना ताळगावमधील तालुका इस्पितळात भरती करण्याची सूचना करण्यात आली आहे. इस्पितळातील रिकाम्या होणार्‍या खाटा स्ट्रेचर, जमिनीवरील रुग्णांना उपलब्ध करण्याची सूचना करण्यात आली आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

आयवरमेक्टिन औषध वादाच्या भोवर्‍यात
जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्लूएचओ) मान्यतेशिवाय गोव्याचे आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी कोरोना प्रतिबंधक उपचारासाठी आयवरमेक्टिन औषधाचा वापर करण्याचा निर्णय जाहीर केल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्यातील १८ वर्षांवरील सर्व नागरिकांवर प्रोफिलॅक्सिस उपचार सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला. या उपचाराअंतर्गत कोरोना चाचणीसाठी येणार्‍या १८ वर्षांवरील नागरिकांना आयवरमेक्टिन गोळ्यांचे वितरण करण्याची घोषणा आरोग्यमंत्र्यांनी सोमवारी केली होती.
आरोग्यमंत्री राणे यांच्या घोषणेनंतर जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामिनाथन यांनी या गोळ्यांचा वापर कोरोना रूग्णांवर करण्यास जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिलेली नाही. वैद्यकीय तपासणीशिवाय डब्ल्यूएचओ कोणत्याही औषधाच्या वापरास परवानगी देत नसल्याचे स्पष्ट केले आहे.