विरुद्ध अन्न आणि त्याचे दुष्परिणाम

0
683
  • डॉ. स्वाती अणवेकर
    म्हापसा

आयुर्वेद सांगते की दूध आणि दुधाचे पदार्थ हे मासे, अंडी, डाळी, कडधान्ये, भाज्या, फळे ह्यांसोबत कधीच एकत्र करून खाऊ नयेत.
पण व्यवहारात बघा ना आपण हे आपल्या आवडीचे नॉनव्हेज केकस्, पुडिंग्ज वगैरे खातो. हे चुकीचे आहे.

आपल्याला माहीतच आहे की आपण जेवण बनवतो तेव्हा वेगवेगळे जिन्नस एकत्र करून एखादा पदार्थ बनवतो. एखादा जिन्नस वेगळा घेतला आणि तोच तुम्ही दुसर्‍या एखाद्या जिन्नसासोबत एकत्र करून खाल्ला तर दोघांच्याही पोषण किमतींमध्ये पुष्कळ फरत पडतो. तसेच त्या तयार पदार्थाचे गुणदेखील बदलतात. ह्यातले काही संयुगं (कॉम्बिनेशन्स) हे त्या तयार पदार्थाची गुणवत्ता वाढवतात. तर काही संयुगं हे त्या तयार पदार्थाची गुणवत्ता कमी करतात.

आयुर्वेदानुसार चांगले पदार्थांचे संयुगं कोणते?…
१) डाळी/कडधान्ये आणि धान्य हे दोन्ही वेगवेगळे खाल्ले तरी ते पौष्टीक आहेत आणि ते एकत्र करून खाल्ले तर त्याची पोषणमूल्यं अजूनच वाढतात. उदा. – डाळ-तांदळाची खिचडी, डाळ आणि भात, चपाती आणि कडधान्य उसळ, इत्यादी.
२) भाज्या आणि डाळी दोन्ही पोषक आहेत पण हे दोन्ही पदार्थ एकत्र केले की त्यांची गुणवत्ता अजूनच वाढते.
३) नाचणी सत्त्व, गहू, वरी, तांदूळ ही धान्ये पोषक आहेत. तसेच दूधही पोषक आहे. पण जेव्हा या धान्यांची पीठं आपण दुधामध्ये शिजवून लापशी किंवा खीर बनवतो तर ती जास्त पौष्टीक असते.
४) डाळी आणि तूप हे दोन्ही पोषक आहेत. पण डाळी जर तुपासोबत खाल्ल्या तर त्या पचायला हलक्या होतात.
पण व्यवहारात आपण काही असेही पदार्थांचे संयुगं पाहतो जे आपल्या आरोग्याला हानिकारक ठरू शकतात. वरवर पाहता आपण असे म्हणतो की आपण ह्यातले काहीच खात नाही. पण नकळत ह्यातल्या बर्‍याचशा गोष्टी आपण आहारात घेत असतो.
आयुर्वेद सांगते की दूध आणि दुधाचे पदार्थ हे मासे, अंडी, डाळी, कडधान्ये, भाज्या, फळे ह्यांसोबत कधीच एकत्र करून खाऊ नयेत.

पण व्यवहारात बघा ना आपण हे आपल्या आवडीचे नॉनव्हेज केकस्, पुडिंग्ज वगैरे खातो. त्यात काय असते तर दूध आणि अंडी एकत्र केलेली असतात.
बर्‍याच व्यक्ती या मासे, चीकन, मटण मारीनेज करताना त्याला दही लावतात. तसेच बर्‍याच नॉनव्हेज रेसिपीजमध्ये दूध, साय, लोणी यांचा सर्रास वापर केला जातो. उदा. काही बटर चिकनसारखे पदार्थ किंवा क्रीम बेस्ड सूप्स असतील.
दूध आणि मासे हे दोन्ही पदार्थ गोड चवीचे आहेत. तसेच दूध थंड आहे तर मासे, मांस हे उष्ण गुणाचे आहे. त्यामुळे वरीलपैकी कोणतेही संयुग तुम्ही घेतले तरी त्यामुळे शरीरात कफाचे प्रमाण वाढून बरेच वेगवेगळे आजार आपल्याला होऊ शकतात.

दूध आणि डाळी व कडधान्य हे संयुगंसुद्धा शरीराला अपायकारक आहेत. कारण दूध हे गोड चवीचे असून डाळी तूरट चवीच्या असतात. त्यामुळे या दोन्ही गोष्टी एकत्र करून खाणे अयोग्य आहे. कारण दूध शरीरात पचल्यावर गोड परिणाम करते तर डाळ पचल्यावर शरीरात आंबटपणा निर्माण करते.

बरेचदा आपण असे पाहतो की आपण चांगले लागते म्हणून दूध आणि दुधाचे पदार्थ व भाज्या एकत्र करून खातो. जसे पालक पनीर, मलाई कोफ्ता, मेथी मलई मटर इ. तसेच काही रायतं असेल तर त्यात आपण पनीर, साय, दही, ताक वगैरे एकत्र करून टाकत असतो. भाज्या ह्या कडू, तुरट, आंबट चवीच्या असतात तर दूध हे गोड चवीचे असते. तसेच काही भाज्या या उष्ण असतात तर दूध थंड असते. काही भाज्या या पचल्यावर शरीरात आंबट किंवा कडूपणा निर्माण करतात तर दूध शरीरात मधुरता निर्माण करते, म्हणून या दोन्ही गोष्टी एकत्र करून खाऊ नयेत.

दूध आणि फळे ही दोन्ही वेगवेगळी खाल्ली असता पौष्टीक असतात पण जर एकत्र करून खाल्ली तर मात्र ते शरीराला अपाय करतात. आपल्याला हे माहीतच असेल की दूध चवीला गोड असते आणि फळे चवीला आंबट असतात. दुधामध्ये जर एखादा आंबट पदार्थ टाकला तर दूध नासते. त्यामुळे साहजिकच असे हे दोन्ही पदार्थ एकत्र करून खाल्ले तर ते शरीरात तसाच अर्थात नासलेल्या दूधासारखा परिणाम करतात ह्यात शंका नाही.

आपण बरेचदा आईसक्रीम आणि फळे, कस्टर्ड आणि फळे ज्याला आपण फ्रूट सलाड म्हणतो, तसेच मिल्क शेक्‌स, केळाचं शिकरण… हे खात असतो.
अन्य चुकीच्या संयुगांमध्ये मध आणि तूप सम प्रमाणात एकत्र करून खाणे. तसेच चहा, कॉफी, गरम पाणी किंवा एखाद्या गरम पदार्थामध्ये मध टाकून खाणे असे आपण करतो जे चुकीचे आहे.

हल्ली साखर नको म्हणून बरेचजण गुळाचा वापरदेखील दूधासोबत करतात पण गुळ चवीला गोड असला तरी त्यात मीठ असल्याने जसे दुधात मीठ टाकल्यावर दूध नासते तोच परिणाम आपल्या शरीरातसुद्धा होणार. तसेही दूध हे थंड आहे तर गूळ गोड असला तरी थोडा उष्ण असतो.
सध्या आपण हेल्दी म्हणून रोज बर्गर, पिझ्झा, पॅटीस असे पदार्थ खातो ज्यात मायोनेज, चीज, पनीर यांसारखे पदार्थ मासे, अंडी, मास, भाज्या, फळे यांसोबत मिसळून त्याचे सारण भरले जाते जे अगदी अयोग्य आहे.
आपण वेळ वाचावा म्हणून बाजारातून इन्स्टंट पदार्थ आणून खातो. तसेच बाजारातील पॅक केलेले तयार किंवा थंडावलेले अन्नपदार्थसुद्धा काही घरांमध्ये रोज खाल्ले जातात. हे असे पदार्थ रोज खाऊन आपल्याला त्रास होतो. आपण एवढे व्यस्त झालो आहोत की आपल्या मुलांनासुद्धा डाळ, तांदूळ, फळे, भाज्या किंवा साजूक तूप टाकून खिचडी किंवा व्हेज पुलाव बनवायला वेळ नसतो. आपण काय करतो?… बाजारातून आणलेले रेडी-टू-इट पदार्थ आणतो आणि मुलांना भरवतो. या बेबीफूड्‌समध्ये काय असते तर दुधाची पावडर, डाळी, फळे, भाज्या, धान्य यांचे एकत्र मिश्रण. आणि आयुर्वेदाने सांगितल्याप्रमाणोे हे सगळे चुकीच्या अन्न संयुगांच्या गटातच मोडते. आणि हे असे पदार्थ आपण मुलांना खाऊ घालतो आणि जेव्हा ती नीट खात नाहीत, त्यांना भूक लागत नाही, संडासला साफ होत नाही किंवा वारंवार त्यांचे पोट बिघडते, तसेच त्यांना परत परत सर्दी होऊ लागली की आपण तक्रार करतो की मुलं खात नाही आणि आजारी पडतात. पण आपण हे समजून घेणे गरजेचे आहे की हे सगळे त्या बेबीफूडचे परिणाम आहेत.
त्याचप्रमाणे आपण असेदेखील पाहतो की दूध, बिस्कीट, दूध पाव यांसारखे पदार्थ सोबत खातो. जेवणानंतर फळे खाणे, भूक नसताना वेळ झाली म्हणून जेवणे, अपचन झाले तरी खाणे… हे असे केल्यानेसुद्धा आपण आजारी पडतो.
तर असे हे चुकीचे कॉम्बिनेशन्स खाल्ल्याने तुम्हाला त्वचारोग, मलावरोध, दमा, सायनसचा त्रास, खोकला, ऍसिडिटी, अजीर्ण, पित्ताम उठणे, हगवण, जंत, मधुमेह, थायरॉइड समस्या, संधिवात, आमवात, वातरक्त, वंध्यत्व, मासिक पाळीच्या तक्रारी, पीसीओडी, स्थूलता, केसांच्या तक्रारी, पुरुषांमध्ये नपुंसकता, कर्करोग हे रोग होऊ शकतात. बरेच फास्ट फूड्‌स असे असतात की त्यांचे सेवन रोज रोज केले तर मुलांमध्ये हॉर्मोनल बदल फार लवकर घडतात आणि मुलं लवकर वयात येतात. यात मुलींची पाळी अकाली येणे तसेच मुलांची लैंगिक अंगांची वाढ लवकर होणे असे दुष्परिणाम पाहायला मिळतात. म्हणूनच आहाराये नियोजन करताना चवीवर भर न देता हे संयुगं आपल्या शरीराला खरोखरच काही अपाय कर करणार नाही ना, हेसुद्धा तपासून पाहणे गरजेचे आहे.