सेवा परमो धर्मः

0
194

योगसाधना – ५१०
अंतरंग योग – ९५

  • डॉ. सीताकांत घाणेकर

भारतीय साहित्यात व संस्कृतीत अनेक श्‍लोक आहेत. त्यातील कित्येक श्‍लोक योगसत्रात वेळोवेळी म्हटले जातात. श्‍लोक फक्त कर्मकांडात्मक न म्हणता जर अर्थ समजून म्हटले तर जीवनाचे महान तत्वज्ञान सहज समजेल. त्यातील एक श्‍लोक….
ॐ असतो मा सत् गमय
तमसो मा ज्योतिर्गमय
मृत्योर्मा अमृतं गमय
ॐ शांतिः शांतिः शांतिः ॥

  • हे प्रभू, तू मला असत्याकडून सत्याकडे ने, अज्ञानरुपी काळोखातून ज्ञानरुपी उजेडाकडे ने, मृत्यूकडून अमरत्वाकडे ने.
    या तीन ओळींच्या श्‍लोकामध्ये, प्रार्थनेमध्ये जीवनाचे महान तत्वज्ञान लपलेले आहे. त्यावर चिंतन केले तर ते गुह्य ज्ञान लक्षात येईल. म्हणून बुद्धीचा तिसरा नेत्र उघडणे अत्यावश्यक आहे.
  • असत्य म्हणजे काय? हे जग म्हणजे असत्य? नाही. तर जगातील जीवन क्षणभंगुर आहे. त्यातून मला चिरंतन सत्य म्हणजे भगवंताकडे ने. तो अजन्मा, अजर, अमर, अविनाशी आहे.
  • मला जगाचे सत्य दिसत नाही कारण मी अज्ञानाच्या अंधःकारात सगळीकडे फिरतो आहे. म्हणून या काळोखातून मला ज्ञानरुपी उजेडात ने. म्हणजे मला सत्य काय ते कळेल.
  • एक सत्य नक्की आहे- ज्याला जन्म आहे त्याला मृत्यूदेखील आहे. माझ्या कर्मामुळेच मी जन्म-मृत्यूच्या फेर्‍यात अडकून आहे. मला अमरत्वाकडे ने म्हणजे ‘मी जीवात्मा’ ‘तू परमात्मा’ यांचे मीलन होऊ दे. मी तुझ्यात मिसळून जाऊ दे. हे आत्मा-परमात्मा मीलन म्हणजेच योग.
    भगवान बुद्ध म्हणतात- ‘ब्रह्म सत्यं जगत् मिथ्या’- मिथ्या म्हणजे क्षणभंगुर, नाशिवंत.

या सर्व तत्वज्ञानापासून आपण एवढेच शिकतो की देह नश्‍वर आहे. त्यामुळे त्याचा अहंकार बाळगू नका. स्वतःचे नाव, स्थिती, लौकिक, धन-संपत्ती… हे कमावण्याच्याच मागे धावू नका. या सर्व गोष्टी पाहिजेतच. पण त्या शर्यतीत आत्म्याचे भान विसरू नका. कारण तोच अमर, अविनाशी आहे.
आपण मडक्याबद्दल विचार करत होतो. मडके हेच शिकवते. देहाच्या खर्‍या स्वरूपाबद्दल आठवण करून देते. पण एक तत्त्व विसरता कामा नये की देह क्षणभंगुर आहे. हे समजायचे म्हणजे त्याला तुच्छ मानू नये तर या अशा देहाकडून मानवाने सत्कार्य, सत्कर्म साधले पाहिजे. त्यातच मानवी जीवनाचे सार्थक आहे.

मडके ही सावधानता देते. मानवाचे जीवन क्षणिक आहे. हे सर्वमान्य सत्य आहे. पण त्यामुळे ते तुच्छ समजून कसेही जगायचे नाही. ‘खा- प्या- मजा करा’ हे चार्वाकाचे तत्वज्ञान हितावह नाही. तसे करतील ते महामूर्ख ठरतील. कारण त्यामुळे पुढचे जन्म चांगले मिळणार नाहीत.
ऋषी-महर्षींनी काय उपदेश केला आहे त्याचे ज्ञान असले पाहिजे. ते म्हणतात..

  • दुर्लभं मनुष्य जन्मः|’
  • चौर्‍यांशी योनीत जन्म घेतल्यानंतरच मनुष्य योनीत जन्म मिळतो. म्हणून तो दुर्लभ आहे. मानवाने आपली सद्सद्विवेकबुद्धी वापरून या दुर्मीळ जन्माचे होईल तेवढे लवकर सार्थक करायला हवे. बुद्धी अधःपतीत झाली तर आत्म्याचे अधःपतन नक्की आहे.
    प्रत्येक सुज्ञ व्यक्तीने आपल्या व इतरांच्या जीवनात सुगंध भरण्याचा प्रामाणिक प्रयत्न करायला हवा. अशा व्यक्तीला आशीर्वादच मिळतील व पुण्यसंचय होईल. त्यामुळे प्रारब्ध बदलेल. जन्मोजन्मी प्रगतीच होईल.
    सृष्टीकडे नजर चौफेर फिरवली तर अनेक उदाहरणे प्रकृतीत मिळतील…
  • एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे फूल. त्याचे जीवन क्षणिक असते. पण ते इतरांच्या जीवनात सुगंध भरते. आपल्या सुंदर रंगरूपाचा आनंद इतरांना देते.
  • दुसरे उदा. म्हणजे – कमळ. चिखलांत उगवते, वाढते पण त्या घाणीचा परिणाम त्याच्यावर थोडासुद्धा होत नाही. ते तसेच सुगंधी व टवटवीत असते.
  • गुलाबाचे फूलही तसेच. सर्व बाजूंनी असलेल्या काट्यांमध्येच ते वाढते. पण स्वतःचे गुण सोडत नाही.
    म्हणून भगवंताच्या डोक्यावर, हृदयावर किंवा चरणांवर त्याची जागा निश्‍चित असते.
  • इंद्रधनुष्यसुद्धा तसेच आगळे-वेगळे, सप्तरंग आकाशात भरतो. पावसाच्या दिवसात जेव्हा इंद्रधनुष्य दिसते तेव्हा मन प्रसन्न होते. तेसुद्धा क्षणिकच असते.
    जीवनात कितीही क्षण जरी जगायला मिळाले तरी जनसेवेत घालवावे. कारण ‘जनसेवा हीच ईश्‍वरसेवा’ आहे.
    म्हणून शास्त्रकार म्हणतात –
  • जो आवडतो सर्वांना तोचि आवडे देवाला…
  • मरावे परी कीर्तीरूपे उरावे|
    अनेक महापुरुष अल्प जीवन जगले पण आपल्या आठवणी ठेवून गेले.
    उदा. संत ज्ञानेश्वर अठरा वर्षे जगले. तदनंतर त्यांनी समाधी घेतली. समाजातील काही जणांनी स्वार्थ व अहंकारामुळे त्यांना व त्यांच्या कुटुंबाला छळले. पण त्यांनी सर्वांना क्षमाच केली. कुठेही राग, द्वेष, सूड या भावना त्यांच्या मनात आल्या नाहीत. आमच्यासाठी ज्ञानेश्‍वरी ठेवून गेलेत.
  • येशू ख्रिस्त तसेच. चाळीस वर्षांचे असताना त्यांना क्रुसावर निर्घृणपणे लटकवले, मारले. त्याआधी त्यांचे फार हाल केले- दगड फेकले, शिव्या दिल्या. क्रूस खांद्यावर घेऊन डोंगरावर चालायला लावले. पण… राग, द्वेष यांचा लवलेशही नाही. उलट म्हणतात कसे – ‘‘हे परमेश्‍वरा, त्यांना क्षमा कर कारण ते काय करतात ते त्यान माहीत नाही.
    ते देवाघरी गेले पण बायबलमधील तत्वज्ञान विश्‍वासाठी उपलब्ध करून दिले.
  • स्वामी विवेकानंद (नरेंद्र) ईश्‍वराच्या शोधात निघाले. त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंसांच्या मार्गदर्शनामुळे त्यांच्या तरुण जीवनाला एक वेगळीच कलाटणी मिळाली. त्यांनी भारत परिक्रमा केली. संपूर्ण भारताचे दर्शन घेतले. अतिशय हालअपेष्टा सोसल्या. विविध छोट्या-मोठ्या अडचणींचा सामना करून अमेरिकेत जागतिक धर्मपरिषदेसाठी गेले. तिथे वेदांत, योग, तत्वज्ञान जगासमोर अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने मांडले. त्यांच्या प्रवचनांवर आधारित अनेक पुस्तके लिहिली गेलीत- योगमार्ग, तरुण व महिलांसाठी मार्गदर्शन, जीवनाचे तत्वज्ञान… असे अनेक महत्त्वाचे विषय त्यांनी समाजासमोर आणले.

मला एका मडक्याची गोष्ट आठवली… एक कुंभार एका गावात छोटीमोठी मडकी बनवत असे व तयार झालेली मडकी बाजूला व्यवस्थित मांडून ठेवीत असे. लोक त्याच्याकडे येऊन ती विकत घेत असत. एक मडके एका कोपर्‍यात बाजूला ठेवले होते. ते कुणीही विकत घेत नव्हता. कारण त्याला खाली एक छोटेसे छिद्र होते. त्यामुळे त्यात पाणी राहत नव्हते.

कुंभाराने त्या मडक्याबद्दल सांगूनसुद्धा एका सज्जनाने ते मडके विकत घेतले. कुंभाराला त्याचे वागणे विचित्र व वेडेपणाचे वाटले. तसे त्याने बोलूनही दाखवले. पण त्या व्यक्तीने त्याकडे लक्ष दिले नाही. पण त्याला म्हटले की शिवरात्रीच्या दिवशी शिवमंदिरात पूजा- आरती-प्रसादासाठी ये.
आमंत्रणानुसार कुंभार मंदिरात गेला तर काय बघतो… ते फुटलेले मडके त्या सज्जनाने चांगले सजवले होते. त्याला छान रंग दिला होता. फुलांची माळ घातली होती आणि त्यात पाणी घालून शंकराच्या लिंगाला पाण्याच्या अभिषेक केला जात होता.

ते दृश्य बघून कुंभाराला फार वाईट वाटले की त्या मडक्याला त्याने टाकाऊ मानले होते आणि इथे त्या मडक्याचा उपयोग एका सर्वोच्च अशा पवित्र कार्यासाठी केला जात होता.

आपणही या गोष्टीतून बोध घेऊ शकतो. कसलेही व्यंग असले तरीसुद्धा या मानव देहाचा विविध प्रकारे विविध तर्‍हेच्या सेवा देण्यासाठी आपण उपयोग करू शकतो. गरज आहे ती सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याची व स्वार्थरहित सेवा देण्याची प्रबळ इच्छा व व्रतनिष्ठेची.
आता या कोविडच्या काळात अनेक व्यक्ती अशा प्रकारच्या विविध सेवा देताना दिसतात आणि त्यासुद्धा स्वेच्छेने व प्रेमाने. प्रत्येक दिवशी नव्या नव्या बातम्या या संदर्भात ऐकायला मिळतात. त्यात तरुण- तरुणी तर भरपूर आहेत. त्यांच्या कल्पकतेचे खरेच कौतुक वाटते. ते करावे तितके थोडेच.
भगवंत सर्वांचे कल्याण करो.