सुवर्णयशाचा मानकरी

0
41

भारतीय क्रीडा क्षेत्राच्या इतिहासात ऑलिम्पिक क्रीडा प्रकारात सांघिक कामगिरीच्या बळावर सुवर्णयश संपादन करण्याचे उदाहरण शोधूनही सापडणार नाही. त्यातच बॅडमिंटनसारख्या वैयक्तिक खेळावर भर देणार्‍या क्रीडा प्रकारात, ते सुद्धा सांघिक प्रदर्शनाच्या जोरावर सुवर्णपदक जिंकण्याचे भारतातील एकमेव मूर्तिमंत उदाहरण म्हणजे थॉमस चषकाचे जेतेपद. अनेक दशके जे मोठमोठ्या देशांना शक्य झाले नाही ते भारताने करून दाखवले. दर दोन वर्षांनी होणार्‍या या स्पर्धेत भारताने आजवर कधीही उपांत्य फेरीचे तोंडदेखील पाहिले नव्हते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर विश्‍वचषकाच्या तोडीचा दर्जा लाभलेल्या या स्पर्धेतून भारतीय संघाकडून यावेळी देखील फारशा अपेक्षा बाळगण्यात आल्या नव्हत्या. ‘सरड्याची धाव कुंपणापर्यंत’ या उक्तीप्रमाणे भारतीय संघ जास्तीत जास्त उपांत्यपूर्व फेरीपर्यंत पोहोचेल व परतीचा रस्ता धरेल असे गृहित धरण्यात आले होते. भारतीय संघाने मात्र आपण सरडा नसून प्रतिस्पर्ध्याला गिळंकृत करणारा अजस्त्र अजगर असल्याचे आपल्या नेत्रदीपक प्रदर्शनाने दाखवून दिले.
१९८३ च्या क्रिकेट विश्‍वचषकातील अनपेक्षित यशानंतर ज्या तर्‍हेने भारतीय क्रिकेटविश्‍व पार ढवळून निघाले होते, त्यापासून प्रेरणा घेत नवनवीन क्रिकेटपटू क्रिकेटकडे वळले होते. त्याचप्रमाणे थॉमस चषकातील हे सुवर्णयश भारतीय बॅडमिंटन क्षेत्राला सुवर्णदायी भविष्य दाखवणारे ठरले आहे.
स्पर्धेच्या मागील आवृत्तीत बलाढ्य इंडोनेशियाने विजेतेपदाला गवसणी घालत जवळपास दोन दशकांचा सुवर्णदुष्काळ संपवला होता. २००२ सालानंतर त्यांना सातत्याने एकतर उपविजेतेपदावर किंवा तिसर्‍या, चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. यावेळी त्यांच्यासमोर जेतेपदासारख्या लढतीचा काडीमात्र अनुभव नसलेला भारतासारखा अननुभवी संघ होता. त्यामुळे जेतेपदाची मैफल रंगवण्याची पूर्ण तयारी त्यांनी केली. ऑस्ट्रेलियात झालेल्या २००८ च्या कॉमनवेल्थ बँक क्रिकेट मालिकेची आठवण भारताच्या थॉमस चषक स्पर्धेतील यशानिमित्ताने झाली. ही स्पर्धा विश्वचषकाच्या तोडीची नव्हती, तरीसुद्धा क्रिकेटच्या शिखरावर असलेल्या कांगारूंच्या कर्णधाराने त्यावेळी स्पर्धा जिंकण्यासाठी आपल्या संघाला तीन अंतिम सामने खेळावेच लागणार नाहीत तर केवळ दोन सामन्यांतच जेता ठरेल, असे भारतीय संघाला चिथावणारे व हीन लेखणारे प्रौढीयुक्त विधान केले होते. भारतीय संघाने त्यावेळी पहिले दोन्ही अंतिम सामने जिंकत तिसरा सामना खेळविण्याची वेळ येऊ दिली नव्हती आणि आपल्या दमदार कामगिरीने कांगारूंचे दात घशात घातले होते. यावेळी इंडोनेशियाच्या खेळाडूंनी विधाने केली नसली तरी बॅडमिंटनमध्ये शिखरावर असलेल्या इंडोनेशियासमोर भारतासारखा संघ होता. ज्याप्रमाणे ऑस्ट्रेलियाने भारताला कमी लेखण्याची चूक केली होती, तीच चूक इंडोनेशियाने यावेळी थॉमस चषकाच्या अंतिम सामन्यामध्ये केली.
भारताला या स्पर्धेसाठी पाचवे मानांकन होते. त्यामुळे भारताचा अपवाद वगळता अन्य चार देश उपांत्य फेरीत पोहोचतील असे आयोजकांचे भाकीत होते. अंतिम फेरीत लक्ष्य सेन याने एकेरीच्या पहिल्या लढतीत झकास खेळ दाखवला. अपेक्षित असलेले लक्ष्य त्याने साध्य करत भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर मदार होती ती सात्विकसाईराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टी या भारताच्या पुरुष दुहेरीतील सर्वांत अनुभवी जोडीवर. ऑलिम्पिकमध्ये या जोडीकडून खूप अपेक्षा होत्या. परंतु, अपेक्षापूर्ती करण्यात ही जोडी कमी पडली होती. याची पुरेपूर भरपाई त्यांनी थॉमस चषकाच्या अंतिम फेरीत आपल्या परिपक्व खेळाने केली. २-० अशा आघाडीनंतर भारताची खरी परीक्षा शिल्लक होती. कामगिरीत सातत्य राखण्यात अनेकवेळा कमी पडलेल्या किदांबी श्रीकांतसमोर होता तो जागतिक क्रमवारीत ८ व्या स्थानावरील जोनाथन क्रिस्टी. हा सामना भारताने गमावला असता तर उर्वरित सामन्यांचा निकालही विपरित लागू शकला असता. पण, श्रीकांतने दमदार सुरुवातीवर विजयी कळस चढवताना क्रिस्टीसारख्या कसलेल्या खेळाडूला गुडघे टेकण्यास भाग पाडले. भारताच्या या अचंबित करणार्‍या कामगिरीनंतर डॅनिश व मलेशियन खेळाडूंनी कोर्टवर धाव घेत भारतीय खेळाडूंवर कौतुकाची थाप मारली. आता संपूर्ण बॅडमिंटन विश्‍वाकडून या खेळाडूंच्या कामगिरीचे कौतुक सुरूच आहे. त्यामुळे अशी एखादी मोहीम फत्ते केली तरी त्यामुळे जबाबदारीही आपसूक वाढत असते, हे लक्षात ठेवल्यास भारतीय बॅडमिंटन क्षेत्रासाठी हे यश निश्‍चितच नव्या यशोशिखरांना स्पर्शिण्याची प्रेरणा देणारे ठरणार आहे.