सुरक्षा रक्षकांचे उपोषण मागे

0
120

मुख्यमंत्र्यांच्या आश्‍वासनामुळे निर्णय : मात्र धरणे सुरूच
सुरक्षा रक्षकांचा प्रश्‍न येत्या महिनाभरात सोडवण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी दिल्याच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले साखळी उपोषण मागे घेण्याचा निर्णय सुरक्षा रक्षकांनी घेतला असल्याचे त्यांचे नेते ऍड्. अजितसिंह राणे यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. मात्र, सरकारने लेखी आश्‍वासन देण्याऐवजी केवळ तोंडी आश्‍वासन दिलेले असल्याने धरणे धरण्याचा कार्यक्रम मात्र चालूच ठेवण्यात येणार असल्याचे राणे यांनी यावेळी स्पष्ट केले.मात्र, धरणे धरतानाच सरकार विरोधात सौम्य भूमिका घेण्यात येणार असल्याचे व सरकारवर कोणतीही टीका केली जाणार नसल्याचे राणे यांनी सांगितले. सरकारने सहानुभूतीपूर्वक प्रतिसाद देत बैठक घडवून आणल्याच्या व सुरक्षा रक्षकांना मानव संसाधन विकास महामंडळाखाली सेवेत सामावून घेण्याचा निर्णय घेतल्याच्या पार्श्‍वभूमीवर सरकार विरोधात संघर्षाची भूमिका घेणे योग्य होणार नसल्याचे वरील निर्णय घेतल्याचे राणे यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी लेखी आश्‍वासन दिलेले नसले व केवळ तोंडी आश्‍वासन दिलेले असले तरी आम्ही त्यांच्यावर विश्‍वास ठेवण्यास तयार आहोत, असे राणे यांनी यावेळी पत्रकारांना सांगितले. यावेळी पत्रकार परिषदेला हजर असलेले अपक्ष आमदार नरेश सावळ म्हणाले की अपक्ष आमदार विजय सरदेसाई व आपण सुरक्षा रक्षकांबरोबर मुख्यमंत्र्यांची बैठक घडवून आणण्यास पुढाकार घेतला. कॉंग्रेसचे एक आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स हेही आमच्याबरोबर होते, असे ते म्हणाले. एका महिन्याच्या ऐवजी पाहिजे तर तीन महिने घ्या. पण एकदा त्यांचे काय ते व्यवस्थित करा, असे आपण मुख्यमंत्र्यांना सांगितल्याचे ते म्हणाले. पावसाळी अधिवेशन आणखी तीन महिन्यांनी सुरू होणार असून तोपर्यंत या लोकांचा प्रश्‍न सोडवला नाही तर पावसाळी अदिवेशनात आपण व वरील अन्य आमदार त्याबाबत सरकारला जाप विचारणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
सेराफिनच्या निलंबनासाठी आज उपोषण
शांततापूर्णरीत्या आमच्या मागण्यांसाठी आंदोलन करणार्‍या सुरक्षा रक्षकांवर लाठीहल्ला करणार्‍या व त्यांना आझाद मैदानावरून हुसकावून लावण्याचा प्रयत्न करणारे उपाधीक्षक सेराफीन डायस यांना सेवेतून निलंबित करण्यात यावे या मागणीसाठी आज रविवारी सुरक्षारक्षक आझाद मैदानावर एका दिवसाचे उपोषण करतील, असे त्यांचे नेते अजितसिंह राणे व स्वाती केरकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
सेराफीन डायस यांनी एका महिला सुरक्षा रक्षकाच्या अंगावर हात घातला. तसेच अन्य सुरक्षा रक्षकांवरही लाठीहल्ला करण्याचा प्रयत्न केला. डायस यांनी यावेळी आपणाला मारहाण केल्याचा आरोप कॉंग्रेसचे प्रवक्ते दुर्गादास कामत यांनी केला.