आपल्या मधुर आणि सुश्राव्य आवाजाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचे काल निधन झाले. वयाच्या 89 व्या वर्षी मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानं भारतीय संगीत क्षेत्रातील एका सुवर्ण युगाचा अंत झाला असून संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे. मराठी भावगीत, भक्तीगीत आणि हिंदी चित्रपट संगीतात त्यांनी दिलेले योगदान कधीही न विसरता येणारे आहे. कला क्षेत्रातील त्यांच्या अफाट कामगिरीची दखल घेऊन केंद्र सरकारने 2023 साली त्यांना ‘पद्मभूषण’ या नागरी पुरस्काराने सन्मानित केले होते. सुमन कल्याणपूर यांचा जन्म 28 जानेवारी 1937 रोजी बांगलादेशातील (तत्कालीन अविभाजित भारत) भवानीपूर येथे झाला होता. लहानपणापासूनच त्यांना संगीताची प्रचंड आवड होती. त्यांनी संगीताचा अतिशय कसून आणि सखोल अभ्यास केला होता. सुमनजींचे माहेरचे आडनाव ‘हेमाडी’ असे होते. त्यामुळे लग्नापूर्वी त्या सिनेसृष्टीत ‘सुमन हेमाडी’ या नावानेच गाणी गात असत आणि याच नावाने त्यांची सुरुवातीची गाणी लोकप्रिय झाली होती.