सुप्रजेसाठी ‘गर्भसंस्कार’

0
266

– डॉ. मनाली म. पवार (गणेशपुरी-म्हापसा)

गर्भावर बौद्धिक संस्कार करणेही गरजेचे आहे. बौद्धिक आरोेग्यासाठी प्राणायाम, ध्यान, ॐकार जपसारख्या उपक्रमांचे आचरण करावे. संध्याकाळी एकत्र बसून प्रार्थना करणे, संपूर्ण कुटुंबासोबत चांगल्या विचारांची देवाण-घेवाण तसेच घरातल्या इतर माणसांची साथ गर्भीणीला बळ देते व पर्यायाने बाळाला त्याचा फायदा होतो.

 

‘गर्भसंस्कार’, ‘गर्भसंस्कार केंद्र’ हे शब्द आता काहीसे परिचयाचे व्हायला लागले आहेत. खरंच, गर्भसंस्कार केंद्रे उभारण्याची गरज कां भासायला लागली? पूर्वी होते का गर्भसंस्कार वगैरे असे काही प्रकार? हो, पूर्वीही पुरातन काळात राजघराण्यात गर्भसंस्कार केले जायचे. राजा-राणीसाठी वाजीकरण- रसायन चिकित्सा केली जायची, पंचकर्माद्वारे शरीर-शुद्धी केली जायची. योग्य मुहूर्त पाहून गर्भाधान संस्कारही व्हायचा. संपूर्ण गर्भिणी अवस्थेत होम-हवन, मंत्र, जप, सुमधुर संगीत असे उपक्रमही व्हायचे. जिजाऊ मातेने छत्रपती घडवले तेही महाराज गर्भात असल्यापासून त्यांच्यावर संस्कार करूनच ना! पण हे गर्भसंस्कार राजघराण्यास सोडता सर्वसामान्यांना त्याची गरज नव्हती. कारण प्रदूषणरहित, निरामय निसर्ग, निरोगी शारीरिक व मानसिक स्थिती, सात्त्विक ताजा आहार-विहार असल्याने राजघराण्यापासून सर्वसामान्यांपर्यंत गर्भसंस्कार हे अप्रत्यक्षरीत्या गर्भावर होत असत. आजच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे गर्भावर – बाळावर होणारे दुष्परिणाम पाहता तसेच नैसर्गिक प्रसुतीमध्ये वाढणारे अडथळे लक्षात घेता गर्भसंस्कार हा विषय गंभीररीत्या हाताळण्याची गरज भासलेली दिसत आहे.
बदललेल्या जीवनशैलीचा परिणाम आजच्या या यांत्रिक युगात माता-पित्याच्या शरीर, मन व बुद्धी यांवर होऊ लागलेला आहे. म्हणूनच वंध्यत्व, गर्भस्राव, गर्भपात, अपूर्ण दिवसांचे बाळ तसेच सिझेरियनचे प्रमाण वाढलेले दिसते. जन्माला आल्यानंतर मुले ही एकतर अतिकृश तरी होतात किंवा अतिलठ्ठ तरी होतात म्हणजेच कूपोषित बालके जन्माला येण्याचे प्रमाण वाढले आहे. जन्माला आलेल्या तान्ह्या बाळालाही आईचे अमृततूल्य दूध दुरापास्त झाल्याच्या तक्रारीच जास्त आढळतात. डबाबंद दुधावरच बालकांचे पोषण होताना दिसत आहे. असेच काहीसे चित्र सध्या आपल्याला पाहायला मिळते आहे. याचे मुख्य कारण आहार-विहाराने झालेला मातेच्या शरीरावरील दुष्परिणाम होय. बुद्धीमत्तेच्या जोरावर स्त्री अर्थार्जनासाठी बाहेर पडली; तसेच घर-नोकरी सांभाळताना तारेवरची कसरत करायला लागली. झटपट जेवण, भांडी घासणे-धुणे, कपडे धुणे, केर-कचरा काढणे यांच्या यांत्रिक उपकरणांद्वारे सोयी उपलब्ध झाल्या. मिक्सर, फ्रीज व मायक्रोव्हेव यांसारखी उपकरणे महिलांसाठी वरदानच बनली. मिक्सरमुळे पाट्यावर वाटणे, जात्यावर दळण दळणे कालबाह्य झालेले आहे. या वस्तूही आता संग्रहालयात जमा झाल्या आहेत. अंगमेहनतीची सगळी कामे बंद झाली आहेत. त्यामुळे शरीराला योग्य रीतीने व्यायाम मिळत नाही. उभ्यानेच सर्व घरकामे करत असल्याने स्नायूंंमध्ये लवचिकपणा राहिलेला नाही. फ्रीजमुळे साठवण्याचे प्रमाण वाढलेले आहे व मायक्रोव्हेवमुळे तेच पदार्थ, जेवण गरम करून खाण्याचे प्रमाण वाढले आहे. डबाबंद-रेडी-टू-इट यांसारख्या पदार्थांमुळे घरचं ताजं अन्न खाल्लं जात नाही व ते प्रत्येक वेळी बनवायला महिलांकडे वेळही नसतो. हॉर्मोन्सच्या गोळ्या, कुटुंबनियोजनाच्या गोळ्या यामुळे मासिक पाळीच्या तक्रारी वाढल्या. करिअरमुळे उशीरा लग्न केल्याने वंध्यत्वाचे प्रमाण वाढलेले आढळते. तसेच उशीरा गर्भवती झाल्यास प्रसुतीमध्ये तक्रारी तसेच बाळांमध्ये काही दोष आढळण्याची शक्यता वाढते. या सर्वांचा परिणाम स्त्रीबीजावर होताना दिसतो आहे. तसेच पुरुषांमध्ये वाढत्या पार्ट्या, हॉटेलिंग, व्यसनाधीनता यामुळे पुरुषबीजांवर, शुक्रजंतूवर मोठा दुष्परिणाम होताना दिसतो. अशा ह्या रोगट, कूपोषित, व्यंग असलेली, विकृती असलेली, प्रतिकार क्षमता कमी असलेली, सारखी आजारी पडणारी पिढी तयार होताना दिसते आहे. निरागस गुटगुटीत मुले आज कोमेजलेल्या फुलांसारखी दिसतात. मुलांमध्ये आढळणार्‍या विविध तक्रारी व कमतरता हे आई-वडिलांच्या ढासळलेल्या शारीरिक आरोग्यामुळे घडताना दिसते आहे.
तसेच आजच्या भावनाशून्य, आत्मकेंद्री युगाचा परिणाम स्त्री-पुरुषांच्या मनांवरही होताना दिसतो. कुटुंबामध्ये असलेला मायेचा ओलावा, शेजार्‍याबरोबर असणारा भावनिक सलोखा लोप पावलेला आहे. विभक्त कुटुंबपद्धतीमुळे नात्यांची जाळी विस्कळीत होत आहे. त्यामुळे गर्भिणी अवस्थेपासून ते प्रसुतीपर्यंत सर्व काही स्वतःचे स्वतःलाच करावे लागते. बर्‍याच वेळा संप्रेरकांच्या (हॉर्मोन्स) बदलामुळे गर्भिणी अवस्थेत स्त्री काहीशी हट्टी होते, पण हे हट्ट पुरवायला मायेची माणसे नसल्याने तिची चिडचिड वाढते व हा परिणाम गर्भावर होऊन बाळही चिडचिडे होते. बर्‍याच वेळा स्त्री गर्भिणी अवस्थेत असता एखादा शोकाकुल प्रसंग घडला असल्यास गर्भिणी स्त्रीला त्या प्रसंगी जायला परवानगी देत नाही. कारण दुःखी स्त्री दुःखी होऊन रडल्यास त्याचा थेट परिणाम बाळावर होतो.
गर्भीणीच्या मनावरचा ताण, क्लेश, भीती, द्वेष यांचाही थेट परिणाम गर्भावर होतो. म्हणून रागीट, चिडचिड्या, दुःखी, उदास गर्भीणीचे मूलही किरकिरे – रडके, अशक्त – शांतपणे न झोपणारे, सारखे आजारी पडणारे, अस्वस्थ, चंचला असेच होते.
देवधर्म न मानणारी माणसेसुद्धा आपल्या पडत्या, अनारोग्यकाली देवालाच हाक मारतात. पण गर्भावस्थेसारख्या पवित्र, नाजूक काळी मंत्र-जप करण्यासारख्या गोष्टी काही लोकांना थोतांड वाटतात. पण त्याच विश्‍वरचयिता देवाचे स्मरण, मनन सतत करत राहिल्यास सकारात्मकच ऊर्जा मिळेल ना? आपल्या बुद्धीच्या आरोग्यावर मुलांचे बौद्धिक आरोग्य अवलंबून असते. म्हणूनच सात्त्विक बुद्धी असल्यास, विकृत, स्वार्थी, मठ्ठ, मंदबुद्धी, रागीट अशी मुले जन्माला येणार नाहीत.

गर्भसंस्कार म्हणजे नेमके काय?…

गर्भस्थ बाळाच्या शरीर-मन व बुद्धीच्या जडण-घडणीसाठी आचार-विचारांची सांगड, आहाराचे नियोजन, विहार म्हणजे हलका-फुलका व्यायाम, बौद्धिक आरोग्यासाठी सुमधुर संगीत, मनन, जप यांसारखे एकत्रित उपक्रम यांचे संपूर्ण गर्भावस्थेमध्ये पालन करणे म्हणजेच गर्भसंस्कार! गर्भसंस्कार फक्त गर्भावस्थेतच करण्याचे संस्कार नसून गर्भधारणेच्या आधीपासून भावी माता-पित्यांचे मार्गदर्शन व उपचार तसेच गर्भधारणेपूर्वी भावी माता-पित्याची शरीरशुद्धी व बीजशुद्धीचे उपचार. पंचकर्मासारख्या आयुर्वेदीय उपचाराने शरीराची शुद्धी करणे. बर्‍याच लोकांना ‘गर्भसंस्कार’ करण्याचे कारण म्हणजे हुशार, बुद्धिमान बाळ जन्माला येण्यासाठी करावेत, असा समज आहे व यासाठी भरपूर पैसा खर्च करून काही गर्भसंस्कारकेंद्राकडे वळतात. पण सगळ्यांनाच हे परवडत नाही म्हणून काही आचार-विचारांमध्ये, आहार-विहारांमध्ये बदल घडवल्यास प्रत्येक जण घरीच ‘गर्भसंस्कार’ उपचार करू शकतात.
‘गर्भसंस्कार’ उपचारांची सुरुवात गर्भधारणेपूर्वीच करावी. याकरता चांगल्या सूज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथम भावी माता-पित्यांनी पंचकर्माद्वारे शरीरशुद्धी करून घ्यावी. त्याचप्रमाणे रसायन-वाजीकरणासारख्या उपचारांची त्याला जोड द्यावी व गर्भधारणेनंतर सर्वप्रथम गर्भीणी स्त्रीने स्वतःच्या शरीराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. शरीराचे आरोग्य राखण्यासाठी नियमित तपासणी, लसीकरण, रक्त, लघवी, सोनोग्राफी इ. तपासण्या, आहार मार्गदर्शन, पथ्यकर आहार सेवन, हलके-फुलके योगासने-व्यायाम या गोष्टींचा अवलंब नियमितपणे करावा. तसेच संपूर्ण गर्भावस्थेत पौष्टीक, पथ्यकर, संतुलित आहार घ्यावा. संपूर्ण गर्भावस्थेत पूर्णान्न दुधाचे सेवन करावे. फळे, पालेभाज्या, फळभाज्या, मासे, अंडी, मोड आलेली कडधान्ये, डाळी इ. पोषणमूल्य असलेला आहार घ्यावा. संपूर्ण नऊ महिने सुवर्णसिद्ध जल प्यावे. पाणी उकळताना त्यात सोने टाकावे व तेच पाणी प्यावे. याने गर्भाची व बाळाची प्रतिकारशक्ती वाढते- ज्यामुळे मग सर्दी, तापासारखे विकार बाळाला वारंवार होत नाहीत.
नैसर्गिक प्रसुतीसाठी सातव्या महिन्यापासून पूर्वतयारी करावी. याकरिता तेलाचा बस्ती देता येतो किंवा स्नेहपिचुचा प्रयोग करावा.
संपूर्ण गर्भावस्थेत शरीराबरोबर गर्भीणीच्या मानसिक आरोग्याचाही विचार करावा. याकरिता तपासणीसाठी आलेल्या गर्भीणी स्त्रीला या गोष्टीची जाणीव करून देणे गरजेचे आहे की तिच्या मानसिक अनारोग्याचा थेट परिणाम गर्भस्थ शरीरावर व मनावर होतो. ती जे खाते-पिते, बोलते-ऐकते, विचार करते-वागते यांचा थेट परिणाम तिच्या बाळावर होतो. म्हणूनच आनंदी, स्वच्छंदी, प्रसन्न मानसिकतेसाठी सुमधुर संगीत ऐकणे, जप करणे, ध्यान, योगासने, आपल्या एखाद्या छंदाची जपणूक करावी व सकारात्मक विचारांची कास धरावी. आता मोबाईलमध्ये इतक्या सोयी आहेत की आपण आपली मनपसंत गाणी, अभंग, भक्तीगीतं तसेच ॐचे उच्चारण कधीही ऐकू शकतो. हे संगीत ऐकण्यासाठी गर्भसंस्कार केंद्रात जाण्याची गरज नाही.
त्याचबरोबर गर्भावर बौद्धिक संस्कार करणेही गरजेचे आहे. बौद्धिक आरोेग्यासाठी प्राणायाम, ध्यान, ॐकार जपसारख्या उपक्रमांचे आचरण करावे. संध्याकाळी एकत्र बसून प्रार्थना करणे, संपूर्ण कुटुंबासोबत चांगल्या विचारांची देवाण-घेवाण तसेच घरातल्या इतर माणसांची साथ गर्भीणीला बळ देते व पर्यायाने बाळाला त्याचा फायदा होतो.
अशाप्रकारे गर्भधारणेपूर्वी उपचार करून प्रत्यक्ष गर्भधारणेनंतर गर्भस्थ बाळावर व आईवर शारीरिक, मानसिक, बौद्धिक संस्कार करणे. तसेच प्रसुतीनंतर माता व बाळाचे औषधोपचार व प्रत्येक स्त्रीला स्तन्यपानासाठी आग्रह करणे गरजेचे आहे.
सुयोग्य संस्कार होऊन जन्मास येणारे मूल उत्तम आरोग्य असलेले निपजते. अशा प्रकारे पहिल्यापासून गर्भसंस्कार केलेली मुले समंजस, शांत, सुस्वभावी, प्रेमळ व सद्गुणी निपजतात. ‘सुप्रजा’ निर्मितीसाठी भावी माता-पित्यांनी डोळसपणे ‘गर्भसंस्कार’ उपचारांचा लाभ घ्यावा.