हिरो इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) सहाव्या मोसमात अंतिम टप्यात निकालास कलाटणी देणारे गोल होण्याचा पायंडा कायम राहिला. सोमवारी बदली खेळाडू इसाक वनमाल्साव्मा याने अवघा एक मिनिट बाकी असताना गोल केल्यामुळे जमशेदपूर एफसी चेन्नईन एफसीविरुद्ध १-१ अशी बरोबरी साधली. याबरोबरच जमशेदपूरने घरच्या मैदानावरील अपराजित मालिकाही कायम राखली.
ओवन कॉयल या नव्या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली चेन्नईनने पूर्वार्धात खाते उघडले होते. २६व्या मिनिटाला लिथुआनियाचा ३२ वर्षीय स्ट्रायकर नेरीयूस वॅल्सकीस याने गोल केला होता. उत्तरार्धात भारताच्या २३ वर्षीय इसाकने जमशेदपूरला एक गुण मिळवून दिला.
चेन्नईनची दुसर्या विजयाची प्रतीक्षा लांबली. ७ सामन्यांत ही त्यांची तिसरी बरोबरी असून एकमेव विजय आणि तीन पराभव अशा कामगिरीसह त्यांचे ६ गुण झाले. त्यांचे शेवटून दुसरे म्हणजे नववे स्थान कायम राहिले. जमशेदपूरने ७ सामन्यांत तिसरी बरोबरी साधली असून तीन विजय आणि एक पराभव अशा कामगिरीसह त्यांचे १२ गुण झाले. त्यांचे चौथे स्थान कायम राहिले.
सामन्यातील पहिल्या अर्थपूर्ण चालीवर गोल झाला. ही चाल चेन्नईनने रचली. रॅफेल क्रिव्हेलारोने चेंडूवर नियंत्रण राखत उजवीकडून मुसंडी मारली. त्याने पेनल्टी क्षेत्रालगत वॅल्सकीसला पास दिला. वॅल्सकीसने चेंडू आधीच मिळवित उजवीकडे नेला आणि नेटमध्ये मारला.
एक मिनिट बाकी असताना जाधवला पास मिळाला. त्याने वॅन्सपॉलला चकविले आणि फारुख चौधरीला चकविले. त्यातून चेंडू मिळताच इसाकने चेंडू मारला. नेटमध्ये जाण्याआधी चेंडू चौधरीच्या हाताला लागला. त्यामुळे हा गोल वादग्रस्त ठरला.
निकाल :
जमशेदपूर एफसी : १ (इसाक वनमाल्साव्मा ८९) बरोबरी विरुद्ध
चेन्नईयीन एफसी : १ (नेरीयूस वॅल्सकीस २६)