सुधारित शॅक धोरणाला मान्यता

0
9

>> 5 वर्षांपेक्षा जास्त अनुभवी व्यावसायिकांसाठी 80 टक्के शॅक राखीव

राज्य सरकारने पर्यटन खात्याच्या सुधारित शॅक धोरण 2023 ला मान्यता दिली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली. सुधारित शॅक धोरणात नवोदितांसाठी 10 टक्के, 1 ते 4 वर्षे अनुभवी व्यावसायिकांसाठी 10 टक्के आणि 5 वर्षांपेक्षा जास्त अनुभवी व्यावसायिकांसाठी 80 टक्के शॅक राखीव ठेवण्यात आले आहेत.

काही दिवसांपूर्वी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नवीन शॅक धोरण 2023 ला मान्यता देण्यात आली होती. या धोरणातील वयोमर्यादेची अट आणि शॅक वितरण सूत्रामुळे राज्यातील शॅक व्यावसायिकांमध्ये नाराजी पसरली होती. पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी शॅक व्यावसायिक व किनारी भागातील आमदारांची बैठक घेऊन शॅक धोरणावर चर्चा करून वयाची अट शिथिल केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शॅक व्यावसायिकांची बैठक घेऊन शॅक धोरण 2023 बाबत चर्चा केली होती. त्यावेळी शॅक धोरणात काही दुरुस्त्या करण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यानंतर शॅक धोरण 2023 मध्ये आवश्यक दुरुस्त्या करून त्यांना मान्यता देण्यात आली.

शॅक धोरण 2023 मधील वयाची अट शिथिल करण्यात आली आहे. तसेच, शॅक वितरण सूत्रामध्ये बदल करण्यात आला आहे. सुरुवातीला शॅक धोरणात 90 टक्के शॅक अनुभव असलेले व्यावसायिक आणि 10 टक्के शॅक नवीन शॅक व्यवसाय सुरू करण्यासाठी इच्छुक असलेल्या युवा वर्गासाठी राखीव ठेवण्यात आले होते. आता, सुधारित शॅक धोरण 2023 मध्ये शॅक वितरण सूत्रामध्ये बदल करण्यात आला आहे. नवीन शॅक व्यवसाय करण्यास इच्छुकांसाठी 10 टक्के शॅक राखीव ठेवण्यात आले आहेत. 1 ते 4 वर्षे अनुभव असलेल्या व्यावसायिकांसाठी 10 टक्के शॅक आणि 5 वर्षांवरील अनुभव असलेल्या शॅक व्यावसायिकांसाठी 80 टक्के शॅक राखीव ठेवण्यात आले आहेत.

दरम्यान, पश्चिम रेल्वे प्रशासनाला कुळे आणि काले रेल्वे स्थानकाच्या विकासाचे काम हाती घेण्याची सूचना करण्यात आली आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी यावेळी सांगितले.
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी पश्चिम रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन गोव्याशी संबंधित विविध विषयावर चर्चा केली. रेल्वे प्रशासनाकडून वास्को रेल्वे स्थानकाचा दर्जा वाढविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्याच धर्तीवर कुळे आणि काले रेल्वे स्थानकाचा विकास करण्याची सूचना करण्यात आली आहे. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव व इतरांनी पश्चिम रेल्वेबाबत उपस्थित केलेल्या समस्या, प्रश्नाबाबत चर्चा करण्यात आली, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.