सुदैवे लाभले असे गुरुजन

0
106
  • अ. जे. रेडकर

असे उत्तमोत्तम गुरुजन आयुष्यात भेटले म्हणूनच माझ्यासारखी सर्वसामान्य कुटुंबातील अनेक मुले शिकू शकली आणि आपले भवितव्य उज्ज्वल बनवू शकली. त्या सर्व गुरुजनांचे ऋण फिटण्याजोगे नाही. धन्य ते गुरुजन आणि धन्य त्या शिक्षण संस्था!

स्वातंत्र्योत्तर काळात पूर्ण प्राथमिक शिक्षण म्हणजे इयत्ता १ ली ते ७ वीपर्यंतचे शिक्षण छोट्या शहरांत किंवा खेडेगावांत सरकारी प्राथमिक शाळांतून होत असे. ५ वी ते ७ वीचे वर्ग त्यावेळी हायस्कूलला जोडलेले नव्हते. ७ वीची परीक्षा जिल्हा शिक्षण बोर्ड किंवा तत्सम सरकारी संस्थेतर्फे होत असे. या परीक्षेला व्हर्नाक्युलर फायनल परीक्षा म्हणत असत. शालान्त परीक्षेसारखेच याही परीक्षेला महत्त्व होते. ही परीक्षा पास झाल्याशिवाय हायस्कूलमधील ८ वीच्या वर्गात प्रवेश मिळत नसे. म्हणूनच या परीक्षेचे दडपण मुलांच्या आणि पालकांच्या मानावर असायचे. माझे प्राथमिक शिक्षण वेंगुर्ला येथील मराठी शाळा क्र. २ मध्ये पार पडले. त्यावेळी पहिल्या इयत्तेत प्रवेश घेण्यासाठी किमान वय वर्षे सात आवश्यक असायचे. म्हणजे व्हर्नाक्युलर फायनल होईपर्यंत वय १४ वर्षे होत असे आणि पुढे हायस्कूलमध्ये ८ वी ते ११ वीची ४ वर्षे म्हणजे शालान्त परीक्षा होईपर्यंत व्यक्ती १८ वर्षे पूर्ण करीत असे आणि शालान्त परीक्षा पास झाल्यावर नोकरीला किंवा कॉलेज प्रवेशाला पात्र ठरत असे.

प्राथमिक शाळेत गुंडू कुबल, सौ. विमल नाईक, श्री. खांडेकर व मोर्ये गुरुजी भेटले. या शिक्षकांचा प्रभाव त्या बालवयात मनावर अधिक पडला त्यामुळे त्यांची नावे आज प्रकर्षाने आठवतात. अन्य शिक्षक होते पण त्यांची नावे आठवत नाहीत. गुंडू कुबल हे वारकरी संप्रदायाचे होते. खादीचा पांढरा सदरा, जाडेभरडे धोतर, डोक्यावर गांधी टोपी, भाळावर बुक्क्याचा टिळा हा त्यांचा पेहराव असायचा. त्यांनी पायात कधी वहाणा घातल्याचे स्मरत नाही. मुखात नेहमी तुकारामांचे अभंग असायचे. समोरच्या प्रत्येक विद्यार्थ्यात त्यांना पंढरीचा पांडुरंग दिसायचा की काय माहीत नाही. कारण त्यांनी कधीच मुलांना शिक्षा केली नाही की ते कधी कुणावर रागावले नाहीत. हे गुरुजी वार्षिक परीक्षा झाली की त्यांच्यापाशी मुलांच्या ज्या गृहपाठाच्या किंवा निबंधाच्या वापरलेल्या वह्या असतील त्यातील कोरी पाने काढून घ्यायचे आणि गरीब मुलांना द्यायचे. ती मुले मग शाळेशेजारी दिनकर नावाचे जे बुकबाईंडर होते त्यांच्याकडून त्या पानांच्या वह्या तयार करून घेत असत. त्यासाठी पैसेही अगदीच थोडे लागत आणि गरीब मुलांना पुढच्या वर्षी वह्यांचा खर्च करावा लागत नसे. मीदेखील अशा वह्या त्यावेळी वापरल्या आहेत. काटकसर आणि गरिबांविषयीचा कळवला याचे बाळकडू कुबल गुरुजींच्या त्या वागण्यातून मला मिळाले असावे.
चौथीच्या वर्गांना शिकवणार्‍या सौ. विमल नाईक या नाजूक चणीच्या बाई अत्यंत प्रेमळ होत्या. स्वच्छ पांढरीशुभ्र नऊवारी साडी आणि तशाच रंगाचा ब्लाऊज त्या परिधान करीत. त्यावेळी आम्हाला त्या चित्रातील सरस्वती देवीसारख्या वाटत. इयत्ता ४ थीच्या पाठ्यपुस्तकात ‘निरोप’ हा धडा होता. त्यात शाळेतील एका आवडत्या शिक्षिकेची अन्यत्र बदली होते आणि त्यांना शाळेतर्फे निरोप देण्याचा कार्यक्रम असतो. बाई उद्यापासून शाळेत येणार नाहीत या कल्पनेने मुले हमसून-हमसून रडू लागतात असा प्रसंग त्यात होता. हा धडा शिकवताना आम्ही मुले त्या धड्याशी एवढी एकरूप होत असू की, आमच्या आवडत्या विमलबाईच बदलून चालल्या आहेत या कल्पनेनेच आम्ही रडत असू.

खांडेकर नावाचे कडक शिस्तीचे, गोरेपान तरतरीत नाकाचे आणि मध्यम उंचीचे शिक्षक होते. ५ वी ते ७ वीच्या वर्गांना ते गणित हा विषय प्रामुख्याने शिकवीत असत. त्यांच्या हातात एक काळा कुळकुळीत लांब शिसवी दंड (रूळ) असायचा. वस्तुतः तो वर्गातील लाकडी फळ्यावर खडूने ओळी मारण्यासाठी असायचा, पण खांडेकर गुरुजी त्याचा उपयोग फळ्यावर ओळी मारण्यापेक्षा गणित विषयात चुका करणार्‍या आणि गृहपाठ वेळीच न करणार्‍या मुलांच्या हाता-पायावर वळ उमटवण्यासाठी अधिक करायचे. त्यांना मुले भलतीच टरकून असायची, आणि खाजगीत त्यांचा उल्लेख मारकुटे गुरुजी असा केला जायचा. खाकी रंगाचा ढगळ बंद गळ्याचा लांब बाह्यांचा शर्ट, तांबूस किनार असलेले तलम धोतर, डोक्यावर काळी टोपी, डोळ्यावर गोल काचांचा चष्मा, भाळावर लाल रंगाचा उभा टिळा आणि पायात करकर वाजणार्‍या चामड्याच्या चपला अशी त्यांची वेशभूषा असायची. (ते बहुधा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत असावेत असे आज वाटते. कारण रा. स्व. संघ म्हणजे काय हे त्या काळात आम्हाला माहीतदेखील नव्हते.) शाळेत वीर सावरकर यांची एक तसबीर लावलेली होती. आम्हा लहान मुलांना ती तसबीर खांडेकर गुरुजींची असावी असे वाटत असे इतके त्यांच्यात साम्य होते.

वेंगुर्ल्याच्या आर. के. पाटकर हायस्कूलमध्ये फार उत्तम शिक्षक भेटले. त्यांपैकी समाजशास्त्र शिकवणारे सी. आर. खानोलकर, संस्कृत शिकवणारे श्री. पुराणिक व श्री. कार्डोज सर, बीजगणित शिकवणार्‍या सौ. सिंधू आरोस्कर मादाम, मराठीचे एम. जी. नाईक व बाबा बोवलेकर सर, इंग्रजी शिकवणारे श्री. साठे आणि जांबोटकर सर, हिंदी विषयाचे साने सर, स्काऊट व गाईडचे विद्याधर दाभोलकर सर, शारीरिक शिक्षण देणारे अण्णाप्पा कलाप्पा चौगुले सर आणि चित्रकला शिकवणारे राजाध्यक्ष सर हे हायस्कूलचे शिक्षक कायम स्मरणात राहिले. कारण त्यांची अध्यापनाची हातोटी आणि लकबी याचे मनावर असलेले गारुड होय. खानोलकर सरांनी इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्राचे क्रमिक पुस्तक कधी हाती घेतले आणि शिकवले असे झाले नाही. इतिहासातील सगळ्या सनावळ्या, ऐतिहासिक घटना त्यांना मुखोद्गत होत्या. इतिहास शिकवताना ते इतके रंगून जात की सगळा वर्ग तद्रुप होत असे. भूगोल शिकवताना पृथ्वीचा गोल आणि जगाचा नकाशा ही त्यांची साधने होती. नागरिकशास्त्र हा विषय तर त्यांचा जिव्हाळ्याचा होता. ते फर्डे वक्ते होते. इंग्रजी, मराठी आणि संस्कृत या तिन्ही भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. त्यांच्यावर कम्युनिस्ट विचारसरणीचा पगडा होता. परंतु जीवनाच्या अंतिम पर्वात त्यांनी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला होता. पुढे ते वेंगुर्ला नगरपालिकेचे नगराध्यक्ष बनले आणि त्यानंतर महाराष्ट्र विधानपरिषदेवरदेखील निवडून गेले. कै. वसंतराव नाईक त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. विधानपरिषदेत सी. आर. सरांची विद्वत्तापूर्ण भाषणे त्यावेळी गाजायची म्हणूनच तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी त्यांना कॉंग्रेस पक्षात यायची गळ घातली आणि म्हणूनच ते कम्युनिस्ट पक्षातून कॉंग्रेस पक्षात गेले असावेत.

स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटिश काळी वेंगुर्ल्यात जॉर्ज इंग्लिश स्कूल होते व ते त्यावेळी भाड्याच्या जागेत चालत असावे. सध्या ज्या जागेत शाळेची इमारत उभी आहे ती विस्तीर्ण जागा श्री. पाटकर या दानशूर सद्गृहस्थांनी हायस्कूलसाठी दान केली व त्यांचे ऋण व्यक्त करण्यासाठी त्यांचे नाव हायस्कूलला दिले असावे. श्री. त्यात्या गावस्कर (क्रिकेटचा विक्रमादित्य सुनील गास्कर यांचे आजोबा) हे मुख्याध्यापक होते. गोरेपान, गुबगुबीत गालांचे आणि स्थूल अंगयष्टीचे असणारे गावस्कर सर नेहमी परीटघडीचा पांढराशुभ्र सदरा, तलम धोतर, डोक्यावर धारदार पांढरी टोपी आणि पायात कधी काळे पंप शूज किंवा कातडी वाहणा अशा पेहेरावात असायचे. एकदम भारदस्त व्यक्तिमत्त्व! त्यामुळे ते एखाद्या राजकीय पुढार्‍यासारखे वाटायचे (महाराष्ट्र विधानपरिषदेचे माजी सभापती श्री. भारदे त्यांच्यासारखे दिसायचे). वर्गात जाऊन शिकवताना त्यांना कधी मी पाहिले नाही, पण त्यांचा शिक्षक आणि विद्यार्थ्यांवर मोठा दरारा होता. उभादांडा येथे त्यांची मोठी बागायती होती. कॉंग्रेसचे ते बडे प्रस्थ असावे असे एकूणच त्यांच्याकडे पाहताना वाटायचे. ते आणि चित्रकला शिक्षक असलेले त्यांचे मित्र श्री. राजाध्यक्ष सर हे रोज घोडागाडीतून शाळेत येत असत. त्यावेळी घोडागाडी पदरी असणे म्हणजे आजची होंडा सिटी किंवा इनोव्हासारखी आलिशान गाडी मालकीची असल्यासारखी प्रतिष्ठा होय!
त्यावेळी इंग्रजी एबीसीडीची सुरुवात ८ वी यत्तेतून होत असे. प्रत्येक वर्गाच्या चार-चार, पाच-पाच तुकड्या असायच्या. हे हायस्कूल तालुक्यात एवढे प्रसिद्ध होते की दहा-पंधरा मैल अंतरावरील मुलेदेखील या शाळेत प्रवेश घेण्यासाठी उत्सुक असत. दूरवरच्या अनेक गावांतील पालक आपल्या मुलांची नोंदणी या शाळेत व्हावी म्हणून धडपडायचे. अशी दूरची मुले कधी सायकलने तर कधी चालत येत असत तर काहीजण वेंगुर्ल्यातील आपल्या नातेवाईकांच्या घरी राहत असत.
शारीरिक शिक्षण देणारे शिक्षक श्री. अण्णाप्पा कल्लाप्पा चौगुले हे सरकार नियुक्त शिक्षक होते. त्यांच्या नावात एक वेगळाच र्‍हिदम होता म्हणून त्यांचे संपूर्ण नाव आजही लक्षात आहे. ते सैनिक प्रशिक्षण पूर्ण केलेले होते. कडक शिस्तीचे पण सर्वांचे आवडते, कारण सर्व प्रकारचे खेळ ते मुलांना शिकवीत असत. दर शनिवारी भव्य पटांगणावर सकाळी सांघिक परेड व शारीरिक शिक्षणाचे धडे दिले जायचे. एरव्ही सोमवार ते शुक्रवार सकाळी साडेदहा ते संध्याकाळी साडेपाचपर्यंत चालणारे वर्ग शनिवारी मात्र सकाळी आठ ते दुपारी एक वाजेपर्यंत घेतले जात असत आणि पहिल्या दोन तासिका या सांघिक व्यायाम शिक्षणाला दिलेल्या असायच्या. पटांगणावर एकाच वेळी हजार-बाराशे मुले हे व्यायाम प्रकार करीत असत. ते विलोभनीय दृश्य असायचे. सगळा शिक्षकवर्ग हे पाहण्यासाठी मैदानावर उपस्थितीत असे. चौगुले सरांनी आम्हाला नियमित व्यायामाची सवय लावली होती. दंड बैठका, सूर्यनमस्कार, मलखांब, वेट लिफ्टिंग हे सातत्याने केल्याने असेल कदाचित पण निरोगी, निरामय, सुदृढ प्रकृतीची प्राप्ती झाली आणि कोणत्याही गंभीर आजाराविना वयाची पंच्याहत्तरी मला पूर्ण करता आली.

खर्डेकर कॉलेजमधील मराठीचे प्रा. मोहन पवार, अर्थशास्त्राचे प्रा. मनोहर आजगावकर, राज्यशास्त्राचे डॉ. सच्चिदानंद शिरोडकर, मानसशास्त्राचे प्रा. शिरगुप्पी, भूगोल विषयाचे प्रा. कुर्‍हेकर हे गुरुवर्य आजही आठवतात. त्यांनी केलेल्या अमूल्य मार्गदर्शनाने जीवनाची दिशा सापडली. डॉ. सच्चिदानंद शिरोडकर हे प्राचार्य असताना त्यांनी एक धाडसी निर्णय घेतला होता. जे विद्यार्थी नोकरी करून शिकू इच्छित असत त्यांच्यासाठी त्यांनी रविवार ही साप्ताहिक सुट्टी रद्द करून शनिवार केली. म्हणजे रविवारी कॉलेजचे वर्ग आणि लायब्ररी सुरू राहील अशी व्यवस्था केली, ज्यायोगे नोकरी करणार्‍या मुलांना त्याचा फायदा होईल. असा निर्णय घेणे धाडसाचे तर होतेच, पण अन्य कर्मचार्‍यांना तो मानवेल की नाही हादेखील प्रश्‍न होता. परंतु गरीब व होतकरू मुलांसाठी त्यांनी हा निर्णय घेतला आणि आपल्या कारकिर्दीत अमलातही आणला.

असे उत्तमोत्तम गुरुजन आयुष्यात भेटले म्हणूनच माझ्यासारखी सर्वसामान्य कुटुंबातील अनेक मुले शिकू शकली आणि आपले भवितव्य उज्ज्वल बनवू शकली. त्या सर्व गुरुजनांचे ऋण फिटण्याजोगे नाही. धन्य ते गुरुजन आणि धन्य त्या शिक्षण संस्था!