- रमेश सावईकर
सुख येतं तेव्हा माणसानं हुरळून जाऊ नये, आणि दुःख येतं त्यावेळी खंगून जाऊ नये. माणसाच्या अपेक्षांना मर्यादा नसते. एक पूर्ण झाली की दुसरी लगेच पूर्ण व्हावी असे वाटते. वेळ येईल तसं घडत जाईल, अशी माणसाची धारणा नसते. म्हणून अपेक्षा भंग पावल्या की माणूस पूर्णपणे हिरमुसला होतो. त्याचा मानसिक तोल ढळला तर तो असा दुःखी-कष्टी होतो.
सकाळचा प्रहर. घराच्या बाहेरील पडवीवर आराम करावा म्हणून आरामखुर्चीत जाऊन बसलो. म्हटलं, सूर्याची कोवळी उन्हे घेण्यास अंगणात जाणे शक्य होत नाही तर एखादी उन्हाची तिरीप तरी अंगाला स्पर्शून जावी! अंगणात ऋतुकालानुसार विविध फुलझाडांना बहर आलेला. तांबडा चाफा पानोपानी फुलून गेला होता. सोनचाफ्याच्या शेंड्यावर काही फुलं दृष्टीस पडली. तांबडा शंकर ‘गुलमोहर’ बहरावा तसा भासत होता. मंद, शांत, शुभ्र सदाफुलांनी सदाफुलीचं झाड पांढरंशुभ्र झालं होतं. सूर्य नुकताच कुठं पूर्व दिशेला गुलाल उधळीत वर येत होता. निसर्गसुंदर वातावरणाचा आस्वाद घेत मनही स्वानंदे बहरले. फुलपाखरासारखं एका फुलावरून दुसऱ्या फुलाकडं जावं तसं माझं मन एका विचारावरून दुसऱ्या विचाराकडं झेपावत होतं.
समोर पाहत असताना चोरट्या नजरेनं घरात डोकावून बघणार तेवढ्यात गरम, कडक चहाचा पेला हातात घेऊन सौ. उभी होती. ‘चहा घ्या लवकर; नंतर थंड होईल,’ जरा उंच स्वरात बोलून ती घरात गेली. चहाचे घुटके घेत असताना विचारचक्र चालूच होतं. मन प्रफुल्लित झालं होतं. तेवढ्यात वाऱ्याची एक मंद झुळूक अंगाला स्पर्शून कधी गेली ते कळलंच नाही. मनाला थोड्या गुदगुल्या करून ती निघून गेली. आगंतुक, अनाहूतपणे आली आणि दारात क्षणभर विसावाही न घेता न सांगताच निघून गेली.
मनात विचार आला, माणसाच्या जीवनात सुख येतं तेदेखील असंच. ‘सुख येता दारी’ त्याचं स्वागत करावं, त्याची विचारपूस करावी, पाहुणचार करावा. बऱ्याच कालावधीनंतर ते आलं. एवढा उशीर का बरं केला? असा प्रश्न विचारावा; उत्तराची अपेक्षा ठेवू नये. आता आलंच आहे, वस्ती करून दीर्घकाळ रहा म्हणून सुखाला जरूर आग्रह करावा. त्याला जमलं तर ते तुमचा आदर राखून राहीलही. सुख झालं म्हणून काय झालं, त्यालाही कामं असतात. त्यात ते व्यग्र असणारच. इकडून तिकडे, तिकडून इकडे, कधी कोणाकडे जायचं, किती राहायचं हे ठरवूनच सुख तुमच्या दारी आलेलं असतं.
ते आल्याचं तुम्हाला ज्ञात होतं. त्याअगोदरही कदाचित ते आलेलं असतं. पण तुमच्या लक्षात आलेलं नसतं. कारण सुख बोचत नाही. त्याचा स्पर्शच स्वभावतः रेशमी, नाजूक, मुलायम. सुख ही कल्पना असते. तुम्हाला कल्पनेच्या विश्वात विहार करणं जमत असेल तर सुख वारंवार तुम्हाला भेटेल. ते भेटतंही. पण ‘मला सुख भेटलं, मी सुखी आहे’ हे शब्द माणसाच्या वाणीतून बाहेर निघणंच कठीण!
मी सुखी आहे हे दुसऱ्याला कळता कामा नये- माझं सुख त्याच्या डोळ्यांना खुपेल. तो माझा दुस्वास करायला लागेल असे विचार मनात थैमान घालतात. त्यामुळे ‘मी सुखी आहे, खाऊन-पिऊन सुखी-समाधानी आहे, ही परमेश्वराची कृपा!’ अशी पुस्ती जोडणे दुर्मीळच! तुम्हाला तो संत रामदासांचा श्लोक ऐकवून मोकळा होईन- ‘जनीं सर्वसूखी असा कोण आहे। विचारें मना तुंचि शोधुनि पाहें॥’
तुम्ही काय करणार, सुखी माणसाचा सदरा शोधणाऱ्या राजासारखी तुमच्याही मनाची स्थिती होते. तुमच्या मनातली सुखाची भावना, होणारी जाणीव तुमच्या नकळत लुप्त होते. अळवाच्या पानावर चमकणारे दवबिंदू कधी हवेत विरून जातात ते कळतच नाही. अगदी तसेच सुखाचे असते. हातातून कधी निसटून जाते ते कळतच नाही. सुख हे तसं लहरीच असतं. ते कुठं, कधी, कोणाशी रमेल सांगणे कठीण!
दिवस असेच सरत असतात. परिस्थितीत थोडाफार बदल होत राहणे अपेक्षितच असते. सदानकदा तुम्ही सुखाच्या ऐन शिखरावर राहून जीवनावर दृष्टिक्षेप टाकू शकत नाही. नाण्याला दुसरीही बाजू असते, असा विचार करीत तुम्ही मनाची समजूत घालण्याचा प्रयत्न करता. नव्हे तो करायलाच हवा. जीवनात विविधता आहे म्हणून नव्या जोमाने जगण्याची खुमारी निर्माण होते.
माणसाच्या गालावर ओघळणारे अश्रू हे खारट असतात. त्यामुळेच तर जीवनाला चव येते. असा विचार करीत असताना सुखापाठोपाठ दुःख दारासमोर येऊन कधी उभं ठाकतं ते कळतसुद्धा नाही. पुसटही कल्पना न देता दुःख येतं. दुःख येणारच. पुढील दारातून नाही तर मागील दारातून! दोन्ही दारांतून वाट न मिळाल्यास खिडकीतून किंवा एखाद्या झरोक्यातून ते आल्याशिवाय राहणार नाही. दुःख येतंच येतं. त्याला अवश्य येऊ द्यावं. थकून-भागून आलं असेल म्हणून शक्ती येण्यास गुळाचा खडा नि पिण्यास पाणी द्यावं. त्याची विचारपूस करावी. पाहुणचार म्हणून चहा, कॉफी काय घेणार म्हणून विचारावं. आग्रह करावा. मात्र चुकूनसुद्धा राहणार की जाणार असा प्रश्न विचारू नये. वस्तीला थांबणार तर थांब ना! उगाच जाण्याची घाई-गडबड कशाला? असं त्याला अगत्यानं सुनवावं. त्याची जेवणाची बडदास्त ठेवावी. मिष्टान्न भोजन घालावं. आराम करण्यास मऊशार बिछाना द्यावा. त्यावर करू दे मस्तपैकी आराम. तुम्ही तुमचा दिनक्रम चालूच ठेवा. दुःख झालं म्हणून काय झालं? पाहुणा बनून आलंय. आता मित्र बनून राहू दे. म्हणून त्याच्यासाठी थोडा वेळ द्या. मौजमजा, मस्ती करा.
दुःखानं ठरविलं होतं की तुम्हाला त्रास द्यायचा, वेदनांनी वेढायचं पण त्याचे मनसुबे तुम्ही फोल ठरविले. तुमच्यावर त्याचा अजिबात प्रभाव पडला नाही हे ओळखून दुःख आपली हार मानून आल्या वाटेने निघून जाईल. तुम्हाला न सांगता किंवा सांगून गेलं (तुम्हाला जाणीव झाली तर) तर ते म्हणेल की दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे. तिथं जाऊन बराच काळ झाला. दुसऱ्या कोणाच्या तरी दरवाजावर प्रवेश घेण्यासाठी ते हजर होईल. दुःख झालं म्हणून काय झालं, त्यालाही सुख हवं असतं.
तुम्ही शक्कल लढविली म्हणून ते हरलं. तुम्ही त्याचं गोड कौतुक केलं मग ते तुम्हाला कसं बरं त्रास देईल? हे गेलं अन् त्याचा पाठलाग करीत थांबलेले सुख तुमच्या दारी पुनश्च येईल. ‘सुख येता दारी, मनी आनंदे मोद भरी’ अशी तुमची स्थिती होईल. हा अनुभव बरंच काही शिकवतो. दुःख येतं, दुःख जातं, पण त्यानंतर सुख येतं. सुख नक्कीच येतं. सुख आणि दुःख या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. नाणेफेक जिंकण्यात कितीही तरबेज असाल, पण दरवेळी सुखाच्याच बाजूने नाणं कौल देईल असं होणं असंभव! जीवनात सुख-दुःखाचा पाठशिवणीचा खेळ चालूच असतो. जीवनात शिशिर ऋतू अनुभवत असाल तर ‘वसंत’ येण्याच्या मार्गावर आहे हे लक्षात ठेवावं. दुःख येतं, दुःख जातं. ते गेल्यावर सुख हे येतंच. शिशिर निघून जातो अन् वसंत ऋतू येतो तद्वत! आणि मग तुमच्या जीवनाचा ‘वसंत’ फुलतो…!
माणसाचं जीवन सुख-दुःखाच्या फेऱ्यात अडकलेलं. निसर्गात ऋतूबदल होत असतात. तद्वत जीवनातल्या परिस्थितीतही! सुख येतं तेव्हा माणसानं हुरळून जाऊ नये, आणि दुःख येतं त्यावेळी खंगून जाऊ नये. माणसाच्या अपेक्षांना मर्यादा नसते. एक पूर्ण झाली की दुसरी लगेच पूर्ण व्हावी असे वाटते. वेळ येईल तसं घडत जाईल, अशी माणसाची धारणा नसते. म्हणून अपेक्षा भंग पावल्या की माणूस पूर्णपणे हिरमुसला होतो. त्याचा मानसिक तोल ढळला तर तो असा दुःखी-कष्टी होतो.
अपेक्षांच्या झुल्यावर बसून अवश्य झुले घेत बसावे. मनात नेहमीच सकारात्मकतेला प्राधान्य स्थान द्यावे. आज नाही तर उद्या केव्हा तरी कोंबडा आरवणारच, अशी खात्री बाळगावी. प्रत्येक माणसाच्या जीवनात यशाचा सूर्य सोनेरी किरणांचा लख्ख प्रकाश हा पाडतोच, ही खात्री मनाशी बाळगावी.
शिशिर ऋतूत पानझड झाली म्हणून झाडं कुठं डगमगतात. वसंत ऋतूचं स्वागत कोमल, मुलायम चैत्रपालवीनं करतात. त्याना वसंत ऋतूची चाहूल लागते, अगदी तसंच माणसाचं जीवन आहे. सहा ऋतूंची वैशिष्ट्ये वेगवेगळी. ती आपण अनुभवत असतो. तद्वतच माणसाचं जीवनही सहापदरी वैशिष्ट्यांनी ठसठसून भरलेलं. ग्रीष्मात कडक उन्हात वारा मंद वाहतो. वर्षा ऋतूत पाऊस कितीही लबाड, लहरी असला तरी हवीहवीशी त्याची सर आपण अनुभवतो. घराची छप्परं उदार होऊन स्वागत करतात. शरद ऋतूतील पौर्णिमेचं चांदणं तर कोण अनुभवत नाही. शिशिरातील थंडी हवीहवीशी वाटते. आणि त्यानंतर येणारा वसंत ऋतू हा निसर्गालाच नव्हे तर मानवी जीवनाचा हर्ष, उमेद, उल्हास घेऊन येणारा वसंतोत्सव! जीवनात वसंत खेळायचा असतो… फेर धरून…! जीवनातले असे सुखाचे क्षण वेचीत… बकुळीची फुलं वेचावी तसं…!!