Home बातम्या सिनेमा : आधुनिक विश्‍वामित्रांची प्रतिसृष्टी

सिनेमा : आधुनिक विश्‍वामित्रांची प्रतिसृष्टी

0

– जनार्दन वेर्लेकर

पुराणकाळात आपल्या तपोबलाने ब्रह्मर्षी विश्‍वामित्राने प्रतिसृष्टी रचल्याची कथा सुपरिचित आहे. कथा-कीर्तनांतून अशा रसाळ आणि विस्मयकारी गोष्टी ऐकताना आम्ही मंत्रमुग्ध व्हायचो. कुमारवयात आमचं भान हरपायचं. प्राचीन काळातील त्या सुरस आणि चमत्कारिक कथा-कहाण्यांची जागा आता सिनेमा या तंत्रमंत्रयुक्त आधुनिक कलामाध्यमाने घेतली नव्हे व्यापली आहे. अशा अर्वाचीन- समकालीन विश्‍वामित्रांप्रति कृतज्ञता-आदरभावना व्यक्त करायची ती एवढ्याचसाठी की या प्रतिभावंतांनी आमच्या आयुष्याची, जगण्याची समज वाढवली. एखादी चांगली कलाकृती म्हणजे नक्की काय? विजय तेंडुलकरांनी या प्रश्‍नाचं सुबोध उत्तर देऊन ठेवलंय ते त्यांच्याच शब्दांत उद्धृत करायला मला आवडेल- ‘‘माझ्या आयुष्याची समजूत ज्यामुळे वाढते, ती कलाकृती म्हणजे चांगली कलाकृती!’’ तेंडुलकरांसकट अशा एकाहून एक सरस विश्‍वामित्रांनी माझी आयुष्याची समज वाढवली आहे.
लोकोत्तर प्रतिभेच्या एका नट आणि चित्रपटदिग्दर्शकाचे नाव आहे चार्ली चॅप्लीन. एका डोळ्यात हसू तर दुसर्‍या डोळ्यात आसू आणण्याची किमया या विश्‍वामित्राला साधली तीही मूकचित्रपटाच्या जमान्यात. या विश्‍वामित्राच्या एका चित्रपटाचे नावच मुळी आहे- ‘मॉडर्न टाईम्स’ (आधुनिक-अर्वाचीन काळ). आधुनिक काळाची गोची कशात आहे याची नेमकी नसच या अवलिया विश्‍वामित्राला गवसली. ‘द ग्रेट डिक्टेटर’ या चित्रपटात त्याने क्रूरकर्मा हुकूमशहा ऍडोल्फ हिटलरची जी हसतखेळत खिल्ली उडवली आहे त्याला खरोखरच तोड नाही. विश्‍वाला गवसणी घालण्याच्या महत्त्वाकांक्षेने झपाटलेल्या- मोकाट सुटलेल्या हिटलरची टर उडवायला चॅप्लीनसारखा विदूषकच हवा. जग वेठीला धरलेल्या रक्तपिपासू हिटलरला आपला पराभव दिसायला लागला आणि त्याने आत्महत्येचा निर्णय घेऊन तो अमलात आणला. प्रतिभावंत विश्‍वामित्रांच्या प्रतिसृष्टीने मात्र जगाला गवसणी घालून ते चांगल्या अर्थाने पादाक्रांत केले. म्हणूनच सिनेमा हे मानवतेलाच अंतर्मुख करणारे अत्याधुनिक आणि चिरतरुण, चिरप्रवाही वैश्‍विक माध्यम म्हणून आता मान्यता पावले आहे.

भारतीय सिनेमाला पहिल्यांदा जागतिक स्तरावर प्रतिष्ठा आणि मान्यता प्राप्त करून देणार्‍या अशाच एका प्रतिभावंत विश्‍वामित्राचे नाव सत्यजीत राय. ‘चित्रे खर्‍याखुर्‍या आयुष्यासारखी असावीत’ ही उक्ती सत्यजीत राय यांची. त्यांच्या चित्रपटांनीच त्यांची ही उक्ती सार्थ केली. ‘पाथेर पांचाली’, ‘अपराजितो’ आणि ‘अपूर संसार’ ही चित्रत्रयी आठवा. मला तरी ती आठवावीच लागत नाही एवढी ती माझ्या स्मृतिकोशात रुतलेली आहे- बंदिस्त आहे. सत्यजीत राय यांनी व्हिट्टोरियो डिसिकाचा १९४८ साली निर्मिलेला ‘बायसिकल थिव्हज’ हा चित्रपट पाहिला आणि त्यांच्या मनात आलं- ‘चित्रपट असाही असू शकतो तर!’ डिसिका असाच एक स्वनामधन्य विश्‍वामित्र ज्याच्यापासून राय यांना प्रेरणा मिळाली. ‘ज्योत से ज्योत जलाते चलो, प्यार की गंगा बहाते चलो’ हे चित्रपट गीत हिंदी ‘संत ज्ञानेश्‍वर’ या चित्रपटातले. सत्यजीत राय यांच्या चित्रपटांनी अशा दीपज्योती पेटवल्या आणि नव्या दमाच्या भारतीय चित्रपटदिग्दर्शकांना प्रेरणा दिली. उत्तम चित्रपटाची माझी अशी एक व्याख्या आहे- ‘अगणित वेळा पाहूनही तो दरवेळी पाहताना नित्य नवाच भासतो. तो पाहण्याची उत्सुकता शमत नाही. पुन्हा पुन्हा पाहावासा वाटतो. अशा चित्रपटांच्या बाबतीत नित्य नवा दिस- नित्य नवे दर्शन- नित्य नवा अनुभव हा जागृतीचाच असतो.’ ‘अपूत्रयी’ पाहिली. ‘चारुलता’, ‘जलसाघर’, ‘अरण्येर दिन-रात्री’, ‘देवी’, ‘शतरंज के खिलाडी’ असे त्यांचे चित्रपट पाहिले. भारतीय सिनेमाला मेनस्ट्रीम- मुख्यधारेच्या प्रभावातून मुक्त करण्याचे श्रेय आपण सत्यजीत राय यांना द्यायलाच हवे. राज कपूरसारख्या शोमन म्हणून गणल्या गेलेल्या चित्रपटनिर्मात्याला आणि दिग्दर्शकालाही ‘बुट पॉलिश’, ‘जागते रहो’ यांसारखे चित्रपट करावेसे वाटले याचे श्रेय राय यांच्याच मन्वंतराला, पायंड्याला द्यायला हवे.
चित्रपट ही सांघिक कला हे निर्विवाद सत्य. मात्र अखेरीस दिग्दर्शक हाच खरा प्रतिसृष्टी रचैता हे वास्तव नाकारण्यात अर्थ नाही. चित्रपटाच्या अखेरीस म्हणा वा प्रारंभी जी श्रेयनामावली असते ती लांबलचक, प्रसंगी दमछाक उडवणारी असते. मात्र आजही ‘द टेन कमांडमेंट्‌स’ हा चित्रपट आणि सिसिल बी. डी. मिल हे समीकरण माझ्या मनात पक्के आहे. ‘रोमन हॉलीडे’ हा ब्लॅक ऍण्ड व्हाईट (कृष्णधवल) चित्रपट वा ‘बेन हर’ हा टेक्नीकलर (रंगीत) चित्रपट आठवला की हमखास मला या चित्रपटांचा दिग्दर्शक विल्यम वायलर आठवतो. ‘सिटीझन केन’ त्याचा दिग्दर्शक ऑर्सन वेल्सची सय जागवतो. डेव्हीड लीनचे ‘लॉरेन्स ऑफ अरेबिया’, ‘डॉ. झिवागो’, ‘द लास्ट एंपरर’, ‘अ पॅसेज टू इंडिया’ त्याच्या नावाशिवाय अपुरे वाटतात. ‘बॅटलशीप पोटेम्कीन’ आणि सर्गी इझेन्स्टाइन हे समीकरण असेच वज्रलेप. ऍपोक्लीप्स नाऊ, दि गॉडफादर हे चित्रपट फ्रान्सिस कपोला या दिग्दर्शकाचा आवाका जाणवून देतात. ‘सेव्हन समुराय’, ‘राशोमन’, ‘रान’, ‘देर्सू उझाला’ हे चित्रपट अकीरा कुरोसावा तर टोकियो स्टोरी ओझू या दिग्दर्शकाची उत्तुंग झेप चित्रांकित करतो. मार्टीन स्कॉर्सीस ‘टॅक्सी ड्रायव्हर’ या चित्रपटाचा कर्ताकरविता. ‘व्हर्टीगो’, ‘सायको’, ‘दि मॅन व्हू न्यू टू मच’ हे चित्रपट पाहताना हिचकॉक आम्हाला श्‍वास रोखून धरायला भाग पाडतो. ‘२००१ स्पेस ऑडिसी’ हा चित्रपट स्टॅन्ले कुब्रिक या दिग्दर्शकाचा मास्टरपीस म्हणा वा मास्टरस्ट्रोक. ‘गांधी’ हा चित्रपट नव्हे बायोपीक सर रिचर्ड ऍटनबरो यांची माध्यमावरील हुकूमत प्रस्थापित करणारा. ‘ज्युरासिक पार्क’, ‘दि शिडलर्स लिस्ट’ हे चित्रपट स्टीव्हन स्पिलबर्ग या प्रतिसृष्टीकर्त्याचे तर ‘टायटॅनिक’, ‘अवतार’ हे जेम्स कॅमरून यांच्या भव्यदिव्य आव्हाने पेलण्याच्या जिद्दीचे द्योतक. ‘इंगमार बर्गमन दि सेवेन्थ सील’, ‘व्हाईल्ड स्टॉबेरीज’, ‘पर्सोना’, ‘व्हर्जीन स्प्रींग्ज’, ‘ऑटम सॉनाटा’, ‘क्रायस एन्ड व्हीर्स्पर्स’ या चित्रपटांतून मानवी अंतर्मनाचा तळ शोधतो. ह्युओ जियान्की यांचा ‘पोस्टमेन इन द माऊंटन्स’ हा चित्रपट नव्हेच तर एक तरल चित्रकाव्य. निसर्ग आणि मानवी स्वभावाच्या पार्श्‍वभूमीवर बापलेक यांच्या मनोमीलनाची ही कथा तुमच्या-माझ्या आयुष्याची जाणीव आणि वीण बळकट करते. आयुष्याला सामोरे जायला बळ, धीर आणि आधार देते. नातेसंबंधाचा चिवटपणा जीवनाला अर्थपूर्णता देतो असा आशावादी सूर चित्रपटभर ऐकू येतो तो अनुभवण्यासारखा. हा चित्रपट पाहताना आपल्याही नकळत आपण हेलावतो.
चव्वेचाळीसाव्या अर्थात यंदाच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला प्रसिद्ध इराणी चित्रपट दिग्दर्शक मजीद माजिदी हे उपस्थित राहणार आहेत हे जेव्हा मला सर्वप्रथम कळले तेव्हा मी मनोमन हरखून गेलो. त्यांच्या चित्रपटांचे गारुड जगभरातील चित्रपटप्रेमींवर आहे. ‘चिल्ड्रन ऑफ हेवन’, ‘दि कलर ऑफ पॅरेडाईझ’, ‘बारान’, ‘दि सॉंग ऑफ स्पॅरोज’ हे त्यांचे चित्रपट पाहण्याचे सौभाग्य मला लाभले ते फिल्म सोसायटी (सिने मॅजिक ही फिल्मसोसायटी आम्ही मडगाव शहरात स्थापन केली ती गोव्यातील आंचिमच्या आगमनाला पूरक म्हणून) आणि आंचिममुळे. या विश्‍वामित्राची प्रतिसृष्टी ज्याने ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवली नाही त्या अभाग्याच्या बाबतीत मी एवढेच म्हणेन- ‘हाय कंबख्त तुने पीही नहीं!
बॉलिवूड, हॉलिवूड, मेनस्ट्रीम, समांतर, कलात्मक अर्थात आर्ट फिल्म्‌स वा प्रादेशिक सिनेमा अशी वर्गवारी वा विभागणी समीक्षकांच्या सोयीसाठी आवश्यक असेलही. मिडल ऑफ दि रोड अर्थात मध्यममार्गी सिनेमा अशीही एक उपपत्ती समीक्षकांना सोयीची वाटत असावी. कला आणि व्यवहार यांची सांगड घालणारा सिनेमा हा या अर्थाने मध्यममार्गी. विनोद, नाचगाणी, प्रेम, सुरुवात, शेवट असा फॉर्म्युला भारतीय सिनेमाला (केवळ बॉलिवूडलाच नव्हे) तसा सुपरिचित. आजही मेनस्ट्रीम सिनेमा याच आकृतीबंधाशी आपलं इमान राखून आहेत. नायक-नायिका यांच्या विरह-मीलनाची व्यथा आणि कथा सर्वसामान्य भारतीयाला भावते- आपलीशी वाटते. खर्‍या आयुष्यात जे क्वचितच वाट्याला येते ते प्रेम रुपेरी पडद्यावर पाहत आपली दुधाची तहान ताकावर भागत असावी. बॉलिवूडमधील प्रस्थापित स्वप्नांच्या सौदागरांनी ही भारतीय मानसिकता हेरली आहे आणि एकनिष्ठेने जोपासली आहे. ‘प्यार की जीत’, ‘प्यार ही प्यार’, ‘प्यार किया तो डरना क्या’ अशा चित्रपटांच्या नावांवरूनही आपल्या अभिरूचीचा अंदाज बांधता येतो. मनोरंजनाचा हमखास यशस्वी फॉर्म्युला तो हाच. एका लोकप्रिय चित्रपटगीतातून हीच मानसिकता व्यक्त होते ती अशी- ‘मेरे सपनों की रानी कब आयेगी तू.’ आमच्या शुष्क, निष्प्रेम तारुण्यात- आयुष्यात- अशी प्रीत न उमलेना का- आमचा आवडता हिरो राजेश खन्ना याला त्याची आयुष्याची जोडीदारीण- शर्मिला टागोर भेटते हे काय कमी झाले? मनी वसे ते स्वप्नी दिसे अशी म्हणच तर आहे. स्वप्नसुंदरी हेमामालिनी आणि ही-मॅन धर्मेंद्र यांचा रुपेरी पडद्यावरील आणि प्रत्यक्ष जीवनातील रोमान्सही आम्हाला पाहायला आणि गॉसीप म्हणून चघळायला आवडतो.
उथळ, थिल्लर मनोरंजनाची कास आम्ही कधी सोडणार हा माझ्या मते महत्त्वाचा प्रश्‍न आहे. ॠीशरीं षळश्राी ुळश्रश्र लश ारवश ेपश्रू ुहशप ुश लशलेाश सीशरीं र्रीवळशपलश. विख्यात फ्रेंच लेखक, समीक्षक आणि सांस्कृतिक मंत्री आंद्रे माल्रो यांचे हे उद्गार. सर्वोत्तम चित्रपट तेव्हाच बनतील जेव्हा चित्रपटप्रेमी प्रगल्भ होतील. त्यांची अभिरूची वाढेल तसा चित्रपटांचा दर्जाही वाढेल. टुरिंग टॉकीज ते आजचे अत्याधुनिक मल्टीप्लेक्स असा सिनेमाच्या जन्मापासूनचा या कलामाध्यमाचा प्रवास आहे. मिट्ट काळोखात रुपेरी पडदा प्रकाशमान होतो आणि आपण दर सेकंदाला चोवीस फ्रेम्स अर्थात चित्रचौकटी या वेगाने या फेम्सचं प्रक्षेपण प्रोजेक्टरद्वारा पाहू लागतो. या गतीमुळेच- दृष्टीसातत्यामुळेच आभासमय प्रतिसृष्टी खरीखुरी वाटू लागते. प्रख्यात फ्रेंच दिग्दर्शक ज्यॉं-लुक्-गोदार्द यांचे उद्गार प्रसिद्ध आहेत. ढहश उळपशार ळी र्ींीीींह ींुशपींू र्षेीी ींळाशी शिी ीशलेपव. याहून मंद वा द्रुतगती आपल्या दृष्टिसातत्याला बाधा आणते. याचाच एक अर्थ असा की सिनेमा हा तंत्र-मंत्राचा वेधक, कल्पक खेळ. हे यांत्रिक खेळणे- चशलहरपळलरश्र ढेू मानवी जिज्ञासेला गवसलं आणि प्रतिसृष्टीचा नियंता हा खेळ खेळायला सज्ज झाला. अफाट शक्यतांचा हा खेळ खेळणारा खेळीया म्हणजे दिग्दर्शक. विश्‍वामित्र हा अशा खेळीयांचा आद्य पूर्वसुरी.
हलकाफुलका, निखळ मनोरंजन करणारा चित्रपट आवडायचे एक कारण त्याचा डोक्याला ताप नसतो. मात्र चांगला चित्रपट तुम्हाला विचार करायला, अंतर्मुख व्हायला भाग पाडतो. असा चित्रपट चित्त आणि प्रज्ञाचक्षूंनी पाहायचा- अनुभवायचा असतो. भारतीय सिनेमाच्या शंभर वर्षांच्या वाटचालीत प्रतिभावंत विश्‍वामित्रांची एक फळी म्हणा वा आघाडी चांगल्या सिनेमाची निगराणी वा जोपासना करायचा फकिरी वसा पेलताना दिसतो. आर्थिक यशापयशाचा फारसा बाऊ न करता, ‘आपुलाची वाद आपणाशी’ या वृत्तीने आणि ‘सत्य असत्यासी मन केले ग्वाही मानियले नाही बहुमता’ या जिगरीने ज्या भारतीय प्रतिभावंतांनी प्रतिसृष्टीचा घाट घातला, पाया रचला त्यांना मानवंदना द्यायची नाही तर कुणाला?
शाळकरी वयात बिमल रॉय यांचा ‘सुजाता’ हा चित्रपट पाहिला. असाच कधीतरी त्यांचा ‘मधुमती’ पाहिला. ‘देवदास’ आणि ‘दो बिघा जमीन’ हे चित्रपटही यथावकाश पाहायला मिळाले. या चित्रपटांच्या गाण्यांसकट हे चित्रपट आजही मनात घर करून राहिले आहेत. ‘दो बिघा जमीन’ आठवतो तसाच बलराज सहानींचा ‘काबुलीवाला’ हटकून आठवतो. न कळत्या वयात पाहिलेले हे चित्रपट. ‘काबुलीवाला’चा दिग्दर्शक तपन सिन्हा हा बिमल रॉय यांचा समकालीन. बिमल रॉय यांचा ‘परख’ आठवतो तो सलील चौधरी यांच्या ‘ओ सजना बरखा बहार आयी’ या गाण्यासाठी.
गुरुदत्त यांचा ‘बाजी’ हा चित्रपट देव आनंद- गीता बाली या जोडीसकट आठवतो. त्यांचा ‘आरपार’ मला हुकलाच. मात्र ‘कागज के फुल’ आणि ‘प्यासा’ हे दोन चित्रपट आरपार मला जखमी, विद्ध करून गेले. ‘चौदहवी का चॉंद’ आणि ‘साहिब, बिवी और गुलाम’ हे जसे या कविमनाच्या दिग्दर्शकासाठी आठवतात तसेच ते या चित्रपटांच्या गाण्यांसाठी आणि या गाण्यांच्या चित्रिकरणासाठी. अरुण खोपकरांनी लिहिलेली ‘गुरुदत्त- तीन अंकी शोकांतिका’ चित्रपटप्रेमींनी अवश्य वाचावी. फकिरी बाण्याचा हा विश्‍वामित्र अकाली गेला. ‘तुमची खोटी कचकड्याची दुनिया तुम्हाला लखलाभ’ असे सांगून गेला. त्याचा ‘बहारें फिर भी आयेंगी’ हा चित्रपट त्याच्या मृत्यूनंतर प्रदर्शित झाला. या चित्रपटातील एक गाणे आजही आठवते-
बदल जाये अगर माली
चमन होता नहीं खाली
बहारें फिर भी आती हैं
बहारें फिर भी आयेंगी
मात्र गुरुदत्तच्या एक्झिटने भारतीय सिनेमा एका विश्‍वामित्राच्या देवदत्त प्रतिभेला कायमचा अंतरला.
व्ही. शांताराम यांची प्रदीर्घ चित्रपट कारकीर्द कोण विसरेल? ‘माणूस’, ‘शेजारी’, ‘दो आँखें बारह हाथ’, ‘डॉ. कोटणीस की अमर कहानी’, ‘नवरंग’, ‘झनक झनक पायल बाजे’, ‘सेहरा’, ‘गीत गाया पत्थरोंने’, ‘स्त्री’, ‘पिंजरा’ अशा चित्रपटांचा रचैता म्हणून त्यांची विपुल चित्रसंपदा आहे. या चित्रमहर्षीने कला आणि व्यवसाय यांची सांगड घालून उत्तम चित्रपटांची निर्मिती केली. ‘दो आँखे बारह हाथ’ हा चित्रपट जागतिक पातळीवर वाखाणला गेला. मदिमांची कथा, वसंत देसाई यांचे संगीत आणि शांतारामबापूंचे दिग्दर्शन असा त्रिवेणी संगम या चित्रपटात जुळून आला. माझ्या कोवळ्या वयात हा चित्रपट पाहून मी एवढा प्रभावीत झालो की आजही त्या चित्रपटातील संवाद, प्रसंग, गाणी आणि नायकाची अखेरची प्राण पणाला लावून दिलेली झुंज आठवते. बापूंची एक अजरामर कलाकृती म्हणून ‘दो आँखें…’ रसिकांच्या मनात निरंतर ताजी आहे आणि राहील.
ऋत्विक घटक यांचे ‘मेघे ढाका तारा’, ‘सुबर्ण रेखा’, ‘अशानी संकेत’ हे चित्रपट पाहून मी या फकिरी बाण्याच्या दिग्दर्शकाच्या प्रेमात पडलो. मृणाल सेन यांचा ‘भुवन शोम’ पाहिला. एकदम स्लो- विलंबित लयीतला हा चित्रपट जमलेल्या बड्या ख्यालासारखा हळूहळू तुमच्या अंगप्रत्यंगात भिनत जातो. ‘भुवन शोम’वर विजय तेंडुलकरांचा लेख लाजवाब. ‘माणूस’ साप्ताहिकात तो वाचला आणि मृणाल सेन, उत्पल दत्त, सुहासिनी मुळे, साधू मेहेर ही मंडळी आप्त- सग्यासोयर्‍यांसारखी वाटायला लागली. हाच साधू मेहेर मला नंतर श्याम बेनेगल यांच्या ‘अंकुर’ या चित्रपटात भेटला. श्याम बेनेगल यांचा एकूण एक चित्रपट पाहायलाच हवा असं माझ्या मनानं घेतलं ते ‘अंकुर’ पाहिल्यापासून. ‘भूमिका’, ‘निशांत’, ‘मंथन’, ‘कलयुग’, ‘त्रिकाल’ हे त्यांचे चित्रपट मी अपूर्वाईने आणि झपाटल्यासारखे पाहिले. ऋषिकेश मुखर्जी यांचे चित्रपट मला सतत खुणावीत राहिले आहेत. ‘अनुराधा’, ‘अनुपमा’, ‘सत्यकाम’, ‘आशीर्वाद’, ‘आनंद’, ‘अभिमान’ या त्यांच्या चित्रपटांनी सत्य-शिव-सुंदराची उपासना करण्याचा कानमंत्रच जणू रसिकांना दिला. भारतीय संस्कृतीचा गंधच त्यांच्या कलाकृतींतून दरवळत असल्याचा भास मला नेहमीच त्यांचे चित्रपट पाहताना होत असतो. बासू भट्टाचार्य यांचे ‘तिसरी कसम’, ‘अनुभव’, ‘आविष्कार’ हे चित्रपट हवीहवीशी वाटणारी अतृप्ती तुम्हाला देऊन जातात. ‘तिसरी कसम’, ‘अनुपमा’, ‘आँधी’, ‘अपने पराये’, ‘मौसम’, ‘माचीस’, ‘ममता’, ‘खामोशी’ हे चित्रपट पुन्हा पुन्हा पाहण्याचा गिनीस वर्ल्ड रेकॉर्ड करायला मला आवडेल. बासू चॅटर्जींचे ‘रजनीगंधा’, ‘छोटीसी बात’ हे मनाला भुरळ घालणारे चित्रपट. राजिंदरसिंग बेदींचा ‘दस्तक’ आजही लख्ख आठवतो. बी. आर. चोप्रा, यश चोप्रा, विजय आनंद, सत्यदेव दुबे, अमोल पालेकर, जब्बार पटेल, चेतन आनंद, सई परांजपे, केतन मेहता, कुमार शहानी, मणी कौल, एम. एस. सत्थ्यू, मणीरत्नम्, गिरीश कर्नाड, गिरीश कासारवल्ली, मेहबूबखान, के. असिफ, कुंदन शाह, के. ए. अब्बास, रमेश सिप्पी, अदूर गोपालकृष्णन, मुझफ्फर अली, शेखर कपूर, महेश भट्ट, अपर्णा सेन, प्रकाश झा, बी. आर. कारंथ, परेश मोकाशी, भालजी पेंढारकर, राजा परांजपे, राजदत्त, गजेंद्र अहिरे, महेश मांजरेकर, शिवाजी पाटील, उमेश कुलकर्णी, मीरा नायर आणि ऋतुपर्णो घोष अशी ही आधुनिक विश्‍वामित्रांची मांदियाळी. अर्थातच ही सर्वसमावेशक नाही. आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलत मुक्तछंदात या समस्त महानुभावांना एक कृतज्ञतेचा नमस्कार करावासा वाटला म्हणून केलेले हे नामस्मरण. विश्‍वामित्र, प्रतिभावंत, दिग्दर्शक, महानुभाव अशा शब्दांची कितीही उधळण केली तरी मजिद माजिदी यांचा सिनेमा ही काय चीज आहे हे अनुभवण्यासाठी त्यांचे ‘चिल्ड्रन ऑफ हेवन’, ‘दि कलर ऑफ पॅरेडाईझ’, ‘बारान’ हे चित्रपट पाहायलाच हवेत. गोमंतभूमीत यंदा चव्वेचाळीसाव्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी होणार्‍या निमंत्रितांच्या मांदियाळीत मजिद माजिदी हे एक व्यक्तिमत्त्व आहे. मुले ही जर देवाघरची फुले तर त्यांचे बाल्य कुस्करून टाकण्याचा पुरुषार्थ गाजवायचा सोस कशापायी? ‘स्टॉप चाईल्ड अब्युज’ अशा घोषणा देणारा एक शाळकरी मुलामुलींचा मोर्चा आंचिमच्या उद्घाटनाच्या आदल्या दिवशी मी पणजी शहरात पाहिला. मानवी संस्कृतीला केवढे हे लांच्छन? निरागस मुलांच्या भावविश्‍वात संवेदनशील कोवळीकेने डोकावणार्‍या मजिद माजिदीला गोमंतभूमीत म्हणूनच भेटायला मी उत्सुक आहे. त्यांच्याशी हस्तांदोलन करायला मी मनापासून उतावीळ आहे. जमल्यास मी त्यांना सांगणार आहे- ‘सत्यजीत राय, अकिरा, कुरोसावा, इंगमार, बर्गमन, बर्मन यांच्या सिनेमाने मला चांगले संस्कार दिले. तुमच्याही सिनेमाचं असंच न फिटणारं ऋण माझ्या मस्तकावर आहे.’
हे जुळून येण्यासाठी वाचक हो- तुमच्या शुभेच्छांचा मी भुकेला आहे. ऑल दि बेस्ट वा बेस्ट ऑफ लक हे तुमचे शब्द ऐकायला मी खरंच व्याकुळलोय.