सिंधूची विजयी सलामी

0
67

बीडब्ल्यूएफ वर्ल्ड सुपर सीरिज फायनल्सचा पहिला दिवस भारतासाठी संमिश्र ठरला. पी.व्ही. सिंधूने महिला एकेरीत विजयासह प्रारंभ केला तर किदांबी श्रीकांतला आपला पहिला सामना गमवावा लागला. चौथ्या मानांकित सिंधूने चीनच्या ही बिंगिजाव या सहाव्या मानांकित खेळाडूला ६४ मिनिटे चाललेल्या मॅरेथॉन लढतीत तीन गेममध्ये २१-११, १६-२१, २१-१८ असे पराजित केले. पहिला गेम सहजपणे जिंकल्यानंतर सिंधूचा सरळ गेममध्ये विजय अपेक्षित होता. परंतु, दुसर्‍या गेममध्ये बिंगिजावने जोरदार खेळ दाखवत सिंधूचा घामटा काढला. दुसरा गेम जिंकल्यामुळे बिंगिजावचा आत्वविश्‍वास उंचावला. याचा फायदा तिला तिसर्‍या गेममध्ये झाला. निर्णायक गेममध्ये तिने सिंधूला कडवी झुंज दिली.

परंतु, सिंधूने रोमहर्षक ठरलेला हा गेम जिंकत सामना आपल्या नावे केला. यंदा चार सुपर सीरिज जेतेपदे पटकावलेल्या भारताच्या किदांबी श्रीकांतचा खेळ मात्र डेन्मार्कच्या व्हिक्टर एक्लेलसनसमोर फिका पडला. एक्लेलसनने स्मॅशेसचा मारा करताना श्रीकांतला धारातीर्थी पाडले. केवळ ३८ मिनिटे चाललेल्या या सामन्यात एक्सेलसनने २१-१३, २१-१६ असा विजय संपादन केला. दुखापतीतून सावरल्यानंतर श्रीकांतही ही पहिलीच स्पर्धा आहे. या दीर्घ विश्रांतीचा परिणाम त्याच्या खेळावर काल दिसून आला. श्रीकांतला या स्पर्धेसाठी द्वितीय मानांकन असून एक्सेलसन आठवा मानांकित आहे. परंतु, ताज्या बॅडमिंटन क्रमवारीत एक्सेलसन पहिल्या स्थानी असून तो विद्यमान विश्‍वविजेता देखील आहे. आज दुसर्‍या दिवशी श्रीकांतचा सामना तैवानच्या चोव टिएन चेन याच्याशी तर सिंधूचा सामना जपानच्या सायाको साटो हिच्याशी होणार आहे. पहिल्या सामन्यातील पराभवामुळे श्रीकांतला दुसर्‍या सामन्यात आपला खेळ उंचवावा लागणार आहे,