सिंधुदुर्ग-कोल्हापूर जोडणार्‍या नव्या घाटमार्गाची प्रतीक्षा

0
199

कुडाळ तालुक्यातील माणगाव आणि कोल्हापूर जिल्ह्यातील अंजिवडे दरम्यान नवा घाटरस्ता तयार झाला असून आता केवळ साडेतीन किलोमीटरचे अंतर पार करणे शिल्लक आहे. हा नवा घाटरस्ता पूर्ण होताच कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग हे जिल्हे एका हाकेच्या अंतराने जोडले जाणार आहेत. ह्या नव्या मार्गाने सावंतवाडी – कोल्हापूर हे अंतर फक्त ११५ किलोमीटर राहील, तर कोल्हापूर – वेंगुर्ला (माणगाव – झाराप – आडेली मार्गे) फक्त १२५ किलोमीटर होणार आहे. घाटमाथ्यावरून अवघ्या दहा मिनिटांत थेट तळकोकणात येणे शक्य होणार आहे. विशेष म्हणजे ह्या मार्गावर घाटात केवळ एकच वळण लागेल. कोल्हापूर – गारगोटी – पाटगाव – आजिवडे – महादेवाचे केरवडे – माणगाव – झाराप असा हा नवा मार्ग असेल.

शिवशाहीत रांगणागड आणि मनोहर मनसंतोष गडादरम्यान मावळे ये जा करण्यासाठी हाच मार्ग वापरत असत. शिवकालीन पाणंद असा त्या जुन्या मार्गाचा उल्लेख होतो. हा मार्ग उभारण्यासाठी केवळ ३२ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून सिंधुदुर्ग व कोल्हापूरदरम्यानचे अंतर शंभर कि. मी. नी कमी होणार आहे.