सिंधुदुर्गातील नागरिकांचे पेडण्यात सीमा खुली करण्यासाठी आंदोलन

0
287

केंद्र सरकारच्या आदेशानुसार गोवा राज्यातील सर्व सीमा, तपासणी नाके गोवा सरकारने १ पासून पहाटेच सुरू केले. मात्र महाराष्ट्र सरकारने आपल्या भागातील सीमा खुली केली नसल्याने सिंधुदुर्ग भागातील नागरिकांनी आणि भाजप स्थानिक कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र भागातील सीमा खुल्या करण्यासाठी काल दि. १ रोजी सकाळी आंदोलन केले.

तपासणी नाक्यावरील पोलीस अधिकार्‍यांवर दबाव आणून गोवा राज्याने आपल्या सर्व सीमा खुल्या केल्या आहेत. त्यामुळे सिधुदुर्गातील सर्व सीमा खुल्या कराव्यात अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली. आंदोलन चिघळू नये यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी जिल्हाधिकार्‍यांकडे चर्चा करून व सरकारचे परिपत्रक आल्यावर लगेच सीमा खुले करण्याचे आश्वासन आंदोलनकर्त्यांना दिले.

दि. २२ मार्चपासून कोरोनामुळे लॉकडाऊनच्या काळात पेडणे तालुक्यातील महत्वाच्या पत्रादेवी-बांदा, न्हयबाग-सातार्डा, किरणपाणी-आरोंदा आणि तेरेखोल-रेडी या सीमा कडक पोलीस बंदोबस्तात काल दि. १ सप्टेंबरपर्यंत बंद होत्या. केवळ राष्ट्रीय महामार्ग ६५ वरील पत्रादेवी या तपासणी नाक्यावरून सरकारच्या लॉकडाऊन नियमानुसार वाहनांची कडक तपासणी करून वाहनांना प्रवेश दिला जात होता.
दरम्यान, महाराष्ट्र सरकारकडून जोपर्यंत लेखी परिपत्रक येत नाही तोपर्यंत सीमा खुल्या करणार नसल्याचे महाराष्ट्र पोलिसांनी सागितले.