सिंजेंटाच्या निर्णयाविरोधात खोर्लीत ग्रामस्थांची निदर्शने

0
160

सिंजेंटा या कंपनीने खोर्ली येथील आपली इमारत व जमीन डेक्कन केमिकल्स या कंपनीला विकण्याचा जो निर्णय घेतला आहे त्याला विरोध करण्यासाठी काल खोर्ली गावातील ग्रामस्थांनी सिंजेंटा कंपनीसमोर निदर्शने केली. कुंभारजुवें मतदारसंघाचे आमदार पांडुरंग मडकईकर हेही यावेळी निदर्शनात सहभागी झाले होते. यावेळी बोलताना पांडुरंग मडकईकर यांनी सांगितले की सिंजेंटा कंपनी आपली मालमत्ता दुसर्‍या कंपनीला विकू शकत नाही. सरकारबरोबर त्यांचा तसा करार झालेला असल्याचे मडकईकर म्हणाले. सिंजेंटाला जर कंपनी चालवायची नसेल तर अशा वेळी त्यांना जमीन सरकारला परत द्यावी लागेल अशी अट करारात असल्याचे ते म्हणाले. सरकारने अत्यल्प किमतीत सिंजेंटाला ही जमीन दिली होती, असेही ते म्हणाले.
डेक्कन केमिकल्स ही अत्यंत प्रदूषणकारी अशी कंपनी आहे. खोर्ली येथे मोठी लोकवस्ती असून तेथे या प्रदूषणकारी कंपनीचा उद्योग सुरू झाल्यास स्थानिकांचे आरोग्य धोक्यात येईल, अशी भीती त्यांनी यावेळी व्यक्त केली. यासंबंधी खोर्लीचे ग्रामस्थ मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांना एक निवेदनही सादर करणार असल्याचे मडकईकर म्हणाले.