चोडण पक्षी अभयारण्यातील विवरण केंद्राचे उद्या उद्घाटन

0
97
  • केंद्रासाठी जर्मन संस्थेची मदत
  • केंद्रात संपूर्ण माहितीचे संकलन
  • पर्यटन स्थळास चालना
  • पक्षी महोत्सव आयोजन करणार

चोडण येथील डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्यातील पक्ष्यांचा अभ्यास करून तेथील सर्व पक्ष्यांच्या जातींची माहिती संकलित करण्यासाठी या अभयारण्यात एक विवरण केंद्र सुरू करण्याचा वन व पर्यावरण खात्याने निर्णय घेतलेला असून या केंद्राचे उद्या १९ एप्रिल रोजी उद्घाटन करण्यात येणार असल्याचे वन व पर्यावरण मंत्री राजेंद्र आर्लेकर यांनी काल सांगितले. वरील कामासाठी जर्मनीस्थित जीआय्‌झेड् या पर्यावरणविषयक संस्थेची मदत घेण्यात येणार आहे. हे केंद्र सुरू करण्यासाठी आवश्यक ती सगळी मदत वरील संस्था करणार आहे. सलीम अली पक्षी अभयारण्यात स्थानिक जातीचे किती पक्षी आहेत. देशातील अन्य भागांतून किती जातीचे पक्षी तेथे येत असतात व विदेशांतून किती जातींचे पक्षी या अभयारण्यात येतात त्याविषयीची संपूर्ण माहिती गोळा करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. ही सगळी माहिती नंतर विवरण केंद्रात उपलब्ध होईल.
या अभयारण्यातील पक्ष्यांची माहिती संकलित करणे तसेच या अभयारण्यात जाण्यास तसेच पक्ष्यांचा अभ्यास करण्यास इच्छुक असलेल्यांना प्रवृत्त करणे या उद्देशाने या विवरण केंद्राची स्थापना करण्याचा निर्णय घेतला असल्याचे आर्लेकर यांनी या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. सलीम अली पक्षी अभयारण्यात एकदा हे विवरण केंद्र सुरू झाले की हे अभयारण्य पर्यटन स्थळ बनण्यास चालना मिळेल. पर्यटक, पक्षी निरीक्षक, पक्षी अभ्यासक बर्ड फोटोग्राफर्स यांची पावले आपसूकच या अभयारण्याकडे वळू लागतील, असे आर्लेकर म्हणाले.
पक्षी महोत्सवही आयोजित करणार
एकदा या अभयारण्यात हे विवरण केंद्र सुरू झाले की तेथे दरवर्षी पक्षी महोत्सवही आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती आर्लेकर यांनी दिली.
मात्र, पक्षी महोत्सव किती दिवसांचा असावा, विवरण केंद्र सुरू केल्यानंतर तेथे पर्यटक व स्थानिक लोकांना आकर्षित करण्यासाठी कोणकोणते कार्यक्रम आयोजित करावेत याचा निर्णय घेण्यासाठी आठवडाभरात एक बैठक होणार असल्याचे आर्लेकर यांनी सांगितले.
दि. १९ रोजी सभापती अनंत शेट यांच्या हस्ते या विवरण केंद्राचे उद्घाटन होणार असून वनमंत्री राजेंद्र आर्लेकर हेही उपस्थित असतील. त्याशिवाय केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाचे सचिव अशोक लवासा तसेच जर्मनीच्या निसर्ग संवर्धन खात्याचे उपमहासंचालक डॉ. क्रिस्टीन पावलुस हेही हजर असतील. उद्घाटनाचा कार्यक्रम संध्याकाळी ४ वा. होईल.