साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या माधवी सरदेसाई यांचे निधन

0
183
माधवी सरदेसाई

‘मिठाची कणी हांव दर्याभेटेक गेली, दर्याक मेळटकच दर्यायेदी जाली’ अशी सुंदर कविता घेऊन कोंकणी साहित्य सरस्वतीच्या अंगणात उतरलेल्या प्रसिध्दी लेखिका, समिक्षक, अनुवादक व गोवा विद्यापीठाच्या प्राध्यापक डॉ. माधवी सरदेसाई (नायक) (५२) यांचे काल दीर्घ आजाराने निधन झाले.त्यांच्या ‘मंथन’ या लेख संग्रहास नुकताच साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला होता. ‘बिंब’ नेही त्यांना नुकतेच सन्मानित केले होते, ‘भासभास’ हे त्यांचे भाशा शास्त्रावरील पुस्तक तसेच ‘माणकुलो राजकंवर’ (बाल साहित्य) व ‘अशे आशिल्ले गांधीजी’ अशी पुस्तके प्रसिध्द आहेत. ‘अशे आशिल्ले गांधीजी’ या पुस्तकास साहित्य अकादमीचा अनुवादासाठीचा पुरस्कार प्राप्त झाला होता. संशोधनपर साहित्याकडे त्यांचा अधिक कल होता. कोंकणी साहित्य क्षेत्रात अत्यंत प्रेमळ व स्वच्छ व्यक्तिमत्व म्हणून त्यांची वेगळी ओळख आहे. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त लेखक रविंद्र केळेकर यांची माधवी भाची, दै. लोकमत गोवा आवृत्तीचे संपादक राजू नायक यांची पत्नी तर फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांची बहीण होत. गेल्या ६ जानेवारी रोजी त्यांना उपचारासाठी मुंबईत हलविण्यात आले होते. गेले दहा महिने त्या मृत्यूशी झुंज देत होत्या. गेल्या बावीस दिवसांपूर्वी त्यांना गोव्यात आणले होते. काल सकाळी त्यांनी अखेरचा श्‍वास सोडला. रविंद्र केळेकर यांच्या पट्टशिष्या म्हणूनच त्या साहित्यक्षेत्रात वावरल्या. गांधीवादी विचारांचा माधवी यांच्यावर बराच प्रभाव होता. केळेकर यांच्या निधनानंतर ‘जाग’ या कोकणी नियतकालिकाची धुरा त्यांनी सांभाळली. काल त्यांचे पार्थिव बंधू विजय सरदेसाई यांच्या निवासस्थानी दर्शनासाठी ठेवले गेले असून आज सकाळी ११ वाजता मडगांव येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होईल. माधवी यांच्या पश्‍चात वडिल जयवंतराव, मातोश्री लक्ष्मीबाई सरदेसाई, पती राजू नायक व आसावरी व अदिती या कन्या आहेत.
काल सकाळपासून माधवी यांच्या अंत्यदर्शनासाठी साहित्यिक, सामाजिक, पत्रकारिता तसेच राजकीय वर्तूळातील लोकांच्या रांगा लागल्या होत्या.
थोडक्यात परिचय
डॉ. माधवी सरदेसाई यांचा जन्म ७ जुलै १९६२ साली झाला. भाषा शास्त्रावर त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यानंतर पिएचडी केली. गेली कित्येक वर्षे त्या गोवा विद्यापीठात व्याख्यात्या होत्या. दै. लोकमत, गोवा आवृत्तीचे संपादक राजू नायक यांच्या त्या पत्नी होत. शांत स्वभावाच्या पण साहित्यिक क्षेत्रात त्यांचा अभ्यास दाणगा होता. गेल्या चार दिवसांमागे त्यांच्या ‘मंथन’ या वैचारिक साहित्यकृतीला भारतीय साहित्य अकादमीचा यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला होता. त्यांनी भासाभास, मंथन, माणकुलो राजकुंवर ही पुस्तके लिहिली असून ज्ञानपीठ पुरस्कार विजेते स्व. रवींद्र केळेकर यांनी हिंदीमधून लिहिलेल्या ‘गांधीजी एक जीवनीय’ या पुस्तकाचा कोकणी अनुवाद केलेला आहे.