साहित्यपथिक

0
209

प्रा. रवींद्र घवी गेले. गोव्याच्या मराठी साहित्यविश्वाचा एक चालता बोलता इतिहास निमाला. मूळचे गोमंतकीय नसले, तरीही अस्सल गोवेकरासारखेच गोव्याशी समरस झालेले प्रा. घवी येथील सामाजिक, सांस्कृतिक जीवनात एवढे मिसळून गेले होते की आज गोमंतकीय मराठी साहित्यविश्वातील प्रत्येकाला त्यांच्या या आकस्मिक निधनाचा धक्का बसला आहे. गोव्याला आपली कर्मभूमी बनवून येथील साहित्य संस्कृतीच्या ऐतिहासिक पाऊलखुणांचा सतत धांडोळा घेत त्यांना शब्दरूप देत आलेल्या प्रा. घवी यांचे गोव्याबाहेर पुण्यात निधन व्हावे हा आणखी एक दैवदुर्विलास. प्रा. घवी यांचे बालपण अतिशय कष्टप्रद अशा स्थितीमध्ये गेले होते. ते स्वतः पुण्यात माधुकरी मागून शिकले. अर्थात, या माधुकरी मागण्याची त्यांना कधी लाज वाटली नाही, कारण ब्राह्मण कुटुंबातील मुलांपुढे त्या काळी घरच्या गरीब परिस्थितीशी मात करीत शिक्षण घेण्याचा दुसरा मार्गच उपलब्ध नसायचा. आपल्या त्या काळातील अनुभवांवर स्वतः घवी यांनीच ‘माधुकरीचे दिवस’ हा ह्रद्य असा लेख लिहिला होता हे स्मरते. प्रा. घवी यांचे समीक्षक म्हणून गोमंतकीय मराठी साहित्याच्या जडणघडणीमध्ये फार मौलिक योगदान होते. स्व. माधवराव गडकरी, प्रभाकर भुसारी आदींमुळे प्रा. घवी गोमंतकीय सांस्कृतिक जीवनाशी जोडले गेले आणि गोव्याचेच होऊन गेले. येथील मराठी साहित्याला मराठी साहित्यविश्वाच्या विशाल परिघाची द्वारे खुली करून देण्यात ते अग्रेसर होते. समीक्षक तर ते होतेच, परंतु कधीकाळी थोडी फार पत्रकारिताही केलेली असल्याने त्यांना साहित्य संशोधनामध्ये विलक्षण रुची होती. एखाद्या ध्यासासारखे ते अशा दुर्मीळ माहितीच्या, कागदपत्रांच्या शोधात असायचे. गोव्यातील मराठी साहित्याचा संपूर्ण इतिहास दोन खंडांमध्ये प्रसिद्ध करावा असे गोमंतक मराठी अकादमीने जेव्हा ठरवले, तेव्हा त्यांच्यापुढे संपादक म्हणून प्रा. घवी यांचे नाव येणे अपरिहार्य होते. प्रा. घवी यांनी या द्विखंडात्मक इतिहासाचा पहिला खंड तडीस नेला. गोमंतकीय मराठी ग्रंथकारांची सूची बनवण्याचे मौलिक कार्यही प्रा. घवी यांनी केले. गोव्यातील गोमंतक साहित्यसेवक मंडळासारख्या संस्थेशी ते दीर्घकाळ जोडलेले होते. गोव्याच्या साहित्यिक सांस्कृतिक इतिहासामध्ये एकेकाळी मौलिक कामगिरी बजावलेल्या या तेव्हाच्या महत्त्वपूर्ण संस्थेचा इतिहास लिहिण्याची जबाबदारी प्रा. घवी यांनी आपल्या शिरावर घेतली आणि ‘अमृतानुभव’च्या रूपाने ती पेलली. साहित्य सेवक मंडळाचे एक संस्थापक स्व. शिवा फटू पै आंगले यांचे पुत्र स्व. व्यंकटेश पै आंगले यांच्या घरी एकदा प्रा. घवी गेले असता त्यांनी आपल्या वडिलांच्या कागदपत्रांचे एक मोठे पुडके त्यांच्या हवाली केले होते. त्याचा त्यांना पुढे गोमंतक साहित्य सेवक मंडळासारख्या महत्त्वपूर्ण संस्थेचा इतिहास संकलित करण्यासाठी खूप उपयोग झाला. अशाच प्रकारे जुन्या कागदपत्रांच्या शोधात ते सतत असायचे. गोव्यातील मुक्तिपूर्व काळातील मराठी नियतकालिकांची माहिती त्यांनी परिश्रमपूर्वक गोळा केली होती. गोव्याचे एक पत्रमहर्षी कै. बा. द. सातोस्कर यांच्या गौरवग्रंथाचे संपादनही त्यांनी केले होते. साहित्य अकादमीसाठी निवडक चि. त्र्यं, खानोलकर ग्रंथ त्यांनी तडीस नेला होता. भारतकार गोविंद पुंडलिक हेगडे देसाईंच्या अग्रलेखांचा पहिला खंड कै. शशिकांत नार्वेकरांनी तडीस नेला, परंतु दुसरा खंड अप्रकाशित स्थितीत होता. ते तडीस नेताना त्या महत्त्वपूर्ण ग्रंथाचे त्यांनी सहसंपादन केले होते. प्रा. घवी हे समीक्षक असले तरी आपला मिस्कीलपणा त्यांनी जपला होता. एकदा ‘चकवा’ नावाचा एक कवितासंग्रह ‘रवींद्र दत्त’ या टोपणनावाने प्रकाशित करून त्यांनी गोव्याच्या मराठी साहित्यविश्वात खळबळ माजवून दिली होती. हे रवींद्र दत्त कोणी बंगाली गृहस्थ नसून आपलेच रवींद्र घवी आहेत हा रहस्यभेद झाल्यावर प्रा. घवी कविताही करू शकतात हा शोध गोमंतकाला लागला होता. प्रा. घवी यांना ह्रदयविकाराचा त्रास ते गोव्यात आले तेव्हाच नजरेस आला होता. त्यावर त्यानी गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील तत्कालीन ह्रदयरोगतज्ज्ञ डॉ. टिकारे यांच्याकडून उपचारही घेतले होते. परंतु त्यावर मात करीत त्यांनी जवळजवळ चार दशके गोव्यामध्ये साहित्यिक, सांस्कृतिक विश्वामध्ये चौफेर काम केले. तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांशी सतत संपर्क ठेवून असलेले प्रा. घवी आता आपल्यात नाहीत ही जाणीव दुःखदायक आहे. गोव्याचा नसूनही गोव्याचा झालेला, गोव्यावर आणि येथील मराठी संस्कृतीवर, साहित्यावर निःस्सीम प्रेम करणारा एक मनस्वी माणूस आपल्यातून कायमचा निघून गेला आहे.