साश्रुनयनांनी आबांना अखेरचा निरोप

0
82

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि तासगावचे सुपुत्र आर. आर. पाटील यांच्यावर काल दुपारी २ च्या दरम्यान त्यांच्या अंजनी या मूळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ‘आर. आर. आबा अमर रहे’, ‘आपला माणूस हरपला’ अशा भावना व्यक्त करत लाखोंच्या जनसमुदायाने आपल्या लाडक्या नेत्याला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप दिला.पोलीस कर्मचार्‍यांनी बंदुकीच्या फैरी झाडून त्यांना मानवंदना दिली. आबांच्या दोन्ही मुली व मुलाने एकत्रित मुखाग्नी दिला. या प्रसंगी आबांच्या कुटुंबीयांसह जनसागराला शोक अनावर झाला होता. अंजनी गावाजवळील हेलिपॅड मैदानावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
आर. आर. पाटील यांचे सोमवारी निधन झाले होते. काल सकाळी त्यांचे पार्थिव मुंबईहून तासगाव येेथे आणण्यात आले होते. तासगावमधील बेलवंडी नाक्यापासून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली होती. तीत हजारो नागरिक सहभागी झाले होते. तेथून त्यांचे पार्थिव अंजनी येथे आणण्यात आले. अंत्यसंस्काराला सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. त्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, माजी मुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, भाजप नेते विनोद तावडे, एकनाथ खडसे, शाहू महाराज, शिवसेनेचे एकनाथ खडसे, कॉंग्रेसचे नारायणराव राणे आदी प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती. दुखवट्यानिमित्त काल येथील बाजारपेठा व इतर व्यवहार उत्स्फूर्तपणे बंद होते.